कोरोनामुळे कार्तिक आर्यनने 10 दिवसात केले ‘धमाका’चे शूटिंग पूर्ण

Karthik Aryan

कोरोनामुळे (Corona) सिनेमाच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात झाली असून काही मोठ्या सिनेमांचे तर या काळात शूटिंगही पूर्ण करण्यात आले आहे. नेमाच्या सेटवर कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून परिपूर्ण काळजीही घेतली जात आहे. यासोबतच सिनेमाचे शूटिंग लवकरात लवकर पूर्ण करण्याकडेही निर्माता आणि कलाकार लक्ष देत आहेत. शूटिंग लवकर पूर्ण केल्यास खर्चातही बचत होते आणि सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनलाही जास्त वेळ मिळतो. कलाकारही लवकर फ्री होऊन दुसऱ्या सिनेमाच्या शूटिंगला जाऊ शकतात. अक्षय कुमारने (Akshay Kumar) कोरोनानंतर कमी वेळात शूटिंग पूर्ण करण्यास सुरुवात केली होती. त्याने दोन सिनेमांचे शूटिंग पूर्ण केले. कार्तिक आर्यननेही त्याच्या सिनेमाचे फक्त दहा दिवसात शूटिंग पूर्ण करून अक्षयच्या पावलावर पाऊल टाकले आहे.

‘प्यार का पंचनामा 2’, ‘पति पत्नी और वो’, ‘लुका छुप्पी’ या सिनेमांमध्ये काम करून कार्तिक आर्यनने (Karthik Aryan) चांगलीच लोकप्रियता मिळवलेली आहे. कोरोनाचा प्रसार होण्यापूर्वी कार्तिकने राम माधवानीचा ‘धमाका’ सिनेमा साईन केला होता. पण कोरोनामुळे या सिनेमाचे शूटिंग होऊ शकले नव्हते. शूटिंगला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर या सिनेमाचे 40 ते 45 दिवसांचे शेड्यूल तयार करण्यात आले होते. मात्र इतके दिवस शूटिंग सुरु ठेवल्यास खर्च वाढण्याची शक्यताही होती. त्यामुळे कार्तिक आणि निर्माता यांनी कार्तिकचे काम 10 ते 15 दिवसात पूर्ण करण्याची योजना आखली आणि त्यादृष्टीने शूटिंगची आखणी केली. कार्तिकनेही 10 दिवसात सिनेमा पूर्ण केल्याने निर्माता राम माधवानी प्रचंड खुश झाले असून त्यांनी कार्तिकला त्याच्या 5 कोटी या मानधनापेक्षा जास्त रक्कम अदा केल्याचे सांगितले जात आहे.

‘धमाका’मध्ये कार्तिक आर्यन त्याच्या लव्हर बॉय या इमेजच्या विपरीत एका वेगळ्या रुपात दिसणार आहे. या सिनेमाचे जास्तीत जास्त शूटिंग इनडोअरच करण्यात आले आहे. काही सीन मात्र आउटडोअर शूट करण्यात आले आहे. काही सीन क्रोमावर शूट करण्यात आले आहेत. आता पोस्ट प्रॉडक्शनमध्ये त्याच्यात वास्तविकता आणली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी कार्तिकने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी या सिनेमाचे पोस्टर शेअर करीत सांगितले होते की, तो या सिनेमात एका टीव्ही चॅनेलच्या पत्रकाराची भूमिका साकारीत आहे. संकटाच्या काळात टीव्ही चॅनेलच्या ऑफिसमध्ये काम कसे चालते ते दाखवले जाणार आहे. या सिनेमांशिवाय कार्तिक आर्यन ‘भूल भुलैया 2’ आणि ‘दोस्ताना 2’ सिनेमात काम करीत असून दोस्ताना 2 मध्ये जान्हवी कपूर त्याच्या नायिकेची भूमिका साकारणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER