करोना ते म्यूकर, तहान लागली की….

coronavirus - mucormycosis - Maharashtra Today

Shailendra Paranjapeकरोनाची दुसरी लाट कमी होत चालल्याचे दिसून येत आहे. पण काळी बुरशी किंवा म्यूकरमायकोसिस नावाच्या संसर्गानं काही भागांमधे थैमान घातले आहे. त्यामुळे एकीकडे करोना (Corona) झाला तर काय करावे, उपाययोजना काय, हे माहीत आहे आणि जनमानसातली भीतीही कमी होत आहे. पण म्यूकरमायकोसिस ही नवी भीती जन्माला आली आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे म्यूकरमायकोसिसवरचा इलाज माहीत असला तरी त्यावरचे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने या रोगानं ग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांना रोजच्या रोज धावपळ करावी लागत आहे. पुण्यात म्हणजे संपूर्ण पुणे जिल्ह्यात चारशेच्या घरात म्यूकरमायकोसिसचे रुग्ण असताना जेमतेम सत्तर ऐंशी रुग्णांपुरतीच इंजेक्शन्स उपलब्ध होती. त्यामुळे त्याबद्दलची चिंता भेडसावते आहे.

करोना आला तेव्हा उपलब्ध खाटा, मग आयसीयूच्या खाटा, मग रेमडिसिव्हर (Remdesivir) आणि नंतर प्राणवायू या सगळ्या गोष्टींच्या तुटवड्यानंतर आणि काही काहींच्या काळ्या बाजाराच्या नंतर सारं काही सुरळीत होत आलंय. करोनाच्या दुसऱ्या लाटेतही दैनंदिन रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मृत्यूदरही अटोक्यात आलाय आणि म्यूकरमायकोसिसचे रुग्ण पुण्यात (Pune) असले तरीही मुंबईत त्यांचे प्रमाण अत्यल्प आढळले आहे, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे.

पण म्यूकरमायकोसिस (Mucormycosis) किंवा तत्सम करोनाचे फॉल आऊट्स आपण आधीच गृहीत धरून उपयायोजना करायला नको होत्या का…किंवा संकट आले तर त्याच्याशी झुंझायचे, त्यातून उद्भवणाऱ्या उपसंकटांचा मुकाबला एक संकट संपल्याशिवाय करायचाच नाही, असं काही ठरवलं गेलंय का…कारण मुळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि त्यातल्या मर्यादा करोनाच्या पहिल्या लाटेनंच स्पष्ट् केल्या होत्या. तरीही आपण मधल्या सात आठ महिन्यात पुरेश्या प्रमाणात रुग्णालये किंवा अन्य सुविधा उभ्या करू शकलो नाहीत, हे वास्तव आहे. तहान लागल्यावर विहीर खणण्याची आपली जुनीच सवय आहे. विज्ञान-तंत्रज्ञानातल्या प्रगतीच्या परिणामस्वरूप काही पावलं वेगानं टाकता येतात आणि त्याचा फायदा आपल्याला नक्कीच झालाय. अर्थात, त्यात आपलं म्हणावं, असं कर्तृत्व किती, हाही एक प्रश्नच आहे.

त्यामुळे बेड, ऑक्सिजनेटेड बेड याची उणीव वा अनुपलब्धता आपण भरून काढू शकलो तरी रेमडिसिव्हरचा काळा बाजार अगदी काल परवापर्यंत सुरू होता. आता तीच गोष्ट म्यूकरमायकोसिसच्या इंजेक्शनची होऊ लागलीय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी करोनासाठी स्थापित तज्ज्ञ डॉक्टरांच्या कृती दलाच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम राज्यातल्या डॉक्टरांसाठी केला. त्या पाठोपाठ तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून बालरोगतज्ज्ञांचाही कृती गट तयार केला असून कालच्या रविवारी राज्यभरातल्या डॉक्टरांसह पालकांसाठीही या बालरोगतज्ज्ञांच्या कृती दलाचे मार्गदर्शन ठेवले होते. पण त्याआधी गरज होती ती म्यूकरमायकोसिसने एकही प्राण जाणार नाही, हा संकल्प करून तो प्रथम प्राधान्यक्रम करण्याची. किमान आता येणाऱ्या नजीकच्या काळात म्यूकरमायकोसिसचे इंजेक्शन युद्धपातळीवर काम करून उपलब्ध कसे होईल, यासाठीही काही मार्गदर्शन करावे.

हे सुचवण्याचे कारण म्हणजे म्यूकरमायकोसिसचे इंजेक्शन मिळत नसल्याने आणि पुण्यासारख्या ठिकाणी दोन अडीच हजार इंजेक्शनची गरज असताना चार पाचशेच इंजेक्शन्स उपलब्ध होत असतील तर रुग्णाला रुग्णालयात ठेवणे धोकादायकच आहे. या कारणासाठी जर रुग्णालयातून घरी पाठवले जात असेल आणि ते बरे झालेले रुग्ण आहेत, असे दाखवले जात असेल तर आपणच आपली पाठ थोपटल्यासारखे होईल. तसे केलेही जात आहे. पण तसे केल्याने ना समाजाचे भले होणार आहे, ना सरकारचे ना संबंधित रुग्णालयांचे.

करोनाच्या रुग्णांच्या तुलनेत म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांची (Mucormycosis Patient) संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे त्या इंजेक्शनचे उत्पादन युद्धपातळीवर प्रयत्न करून वाढवायला लावणे आणि जिथे रुग्ण तेथे इंजेक्शन आणि हवे तितके, हवे त्या वेळी इंजेक्शन ही स्थिती यायला हवी. तसे झाले तरच तहान लागल्यावर खणलेली विहीत कदाचित पुढच्या तहानेच्या वेळीही उपयोगी पडू शकेल. अर्थात तहान लागले की….ही वृत्ती कशी घालवणार कारण त्यावरच्या उपायाचे, इलाजाचे इंजेक्शन कुणी शोधले असल्यास आम्हाला तरी माहिती नाही.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button