कर्नाटक विधानपरिषदेचे उपसभापती एसएल धर्मे गौडा यांची आत्महत्या

S. L. Dharmegowda

बंगळुरू : कर्नाटक विधानपरिषदेचे उपसभापती एसएल धर्मेगौडा (S. L. Dharmegowda) यांचा मृतदेह रेल्वे रुळांवर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दक्षिण कर्नाटकातील चिकमगळुर या धर्मेगौडांच्या मूळगावात हा प्रकार घडला. धर्मे गौडा यांचा मृतदेह हा त्यांच्या घरापासून निकमगलूरजवळील रेल्वे ट्रॅकवर छिन्नविछन्न अवस्थेत आढळून आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मे गौडा यांचा मृतदेह आज पहाटे 2 वाजेच्या सुमारास जंगलमय भाग असलेल्या रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. 64 वर्षीय धर्मेगौडा हे लो प्रोफाईल आमदार म्हणून प्रसिद्ध होते. मात्र कर्नाटक विधानपरिषदेत झालेल्या राड्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यांना अलीकडेच विधानसभेत काँग्रेसच्या नेत्यांनी घेराव घातला होता. सभागृहातच काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार गोंधळ घातला होता. काही काँग्रेसच्या सदस्यांनी त्यांना खुर्चीवरून खाली खेचले होते. गौडा यांनी सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या सभागृहातील अध्यक्ष प्रताप चंद्र शेट्टी यांना मदत केली होती, असा आरोपही काँग्रेस नेत्यांनी केला होता.

कर्नाटक विधानपरिषेदत 15 डिसेंबरला गोरक्षा कायद्यावरुन जोरदार राडा झाला होता. यावेळी काँग्रेसच्या आमदारांनी विधानपरिषेदच्या उपसभापतींना अक्षरश: सभागृहातून खेचून नेत बाहेर काढले. भाजप आणि जनता दलाने (सेक्युलर) असंवैधानिक पद्धतीने उपसभापतींना खुर्चीत बसवले. हा प्रकार दुर्दैवी आहे. काँग्रेसने त्यांना आसनावरुन खाली उतरायला सांगितले. ते अवैधरित्या सभापतींच्या आसनावर बसल्यामुळे आम्ही त्यांना सभागृहाबाहेर काढले, अशी प्रतिक्रिया काँग्रेस (Congress) आमदार प्रकाश राठोड (Prakash Rathod) यांनी दिली होती.

त्यानंतर आज धर्मे गौडा यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राजकीय वातावरण सुद्धा तापले आहे. कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण पेटले असून काँग्रेस अडचणीत येण्याची शक्यता आहे. धर्मे गौडा यांचे भाऊ एसएल भोजे गौडा हे आमदार असून माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचे निकटवृतीय समजले जात आहे.

दरम्यान, उपसभापती धर्मे गौडा यांची सुसाईड नोट सापडली आहे. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या नोटमध्ये गौडा यांनी आपल्या घरच्यांची माफी मागितली आहे. घराच अर्धवट बांधकाम मुलाने पूर्ण करावे, असं भावनिक आवाहन गौडा यांनी केले आहे. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER