कर्नाटक पोलिसांनी जप्त केलेली तांदळाची ९ हजार पोती परत करण्याचा आदेश

Nagpur Bench - Karnataka Police - Maharashtra Today
  • नागपूरच्या दोन व्यापार्‍यांना हायकोर्टाकडून दिलासा

नागपूर : कर्नाटकच्या कोप्पाळ जिल्ह्यातील गंगावती पोलिसांनी गेल्या डिसेंबरमध्ये नागपूरमधील दोन व्यापार्‍यांच्या गोदामांवर धाडी टाकून जप्त करून नेलेली तांदळाची ९,१३९ पोती जेथून नेली तेथे दोन आठवड्यांत परत आणून देण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

‘एंजल क्लिक’चे मालक मोहन महादेवराव डफ व ‘नाहटा ट्रेडिंग कंपनी’चे मालक आनंद लालचंद नाहटा या नागपूरमधील दोन व्यापार्‍यांनी केलेली याचिका मंजूर करून न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अविनाश घारोटे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. कर्नाटकच्या गंगावती पोलिसांनी ही धाड टाकताना आणि धाडीत मिळालेला माल जप्त करून नेताना दंड प्रक्रिया संहितेमधील तरतुदींचे पालन केले नाही, या कारणावरून न्यायालयाने ही धाड व जप्ती बेकायदा ठरवून रद्द केली. गंगावती पोलीस त्यांना वाटल्यास तेथील न्यायालयाकडून नवे ‘सर्च वॉरन्ट’ घेऊन पुनहा धाड टाकू शकतात, अशी  मुभाही न्यायालयाने दिली.

गेल्या २४ डिसेंबर रोजी गंगावती पोलिसांनी डाक यांच्या उमिया इंडस्ट्रियल एरिया, तरोडी-नागपूर येथील गोदामातून ‘हेरिटेज ब्रँड’ तांदळाची ६,१४० पोती तर नाहटा यांच्या लिहिगाव, कामटी येथील गोदामातून त्याच ब्रँडच्या तांदळाची २,९९९ पोती धाड टाकून जप्त करून नेली होती. गंगावती येथील मे. संगम एंटरप्रायजेसचे मालक प्रकाशचंद्र कन्हैयालाल चोपडा यांनी पाच व्यक्तिंविरुद्ध भादंवि कलम ४०६ व ४२० कलमान्वये विश्वासघात व फसवणुकीची फिर्याद नोंदविली होती. त्यात गंगावती येथील दंडाधिकारी न्यायालयाकडून ‘सर्च वॉरन्ट’ घेऊन तेथील पोलिसांनी नागपूरमध्ये ही जप्तीची कारवाई केली होती.

डफ आणि नाहटा यांनी खंडपीठास सांगितले की, गंगावती पोलिसांकडे जो गुन्हा नोंदला आहे त्यात आरोपी म्हणून आमची नावे नाहीत. फिर्यादी चोपडा यांच्याशी आम्ही कधीही तांदळाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार केलेले नाहीत. तरी कर्नाटक पोलिसांनी गुन्ह्यातील मुद्देमाल म्हणून आमच्या गोदामांमधील तांदळाची पोती जप्त करून नेली. तांदळाची ती सर्व पोती आम्ही इतरांशी रीतसर व्यवहार करून खरेदी केलेली होती. शिवाय गंगावती पोलिसांनी धाड व जप्तीची कारवाई करताना दंड प्रक्रिया संहितेचे पालन केले नाही. खंडपीठाने यातील दुसरा मुद्दा मान्य केला. पहिल्या मुद्द्यांसाठी डफ व नाहटा यांनी गंगावती येथील न्यायालयात जाऊन योग्य ती कारवाई करावी, असे खंडपीठाने त्यांना सांगितले.

हा गुन्हा कर्नाटकमध्ये घेडलेला असल्याने व ‘सर्च वॉरन्ट’ही कर्नाटकमधील न्यायालयाने काढलेले असल्याने त्याविरुद्धची याचिका ऐकण्याचा नागपूर खंडपीठास अधिकार नाही, असा प्राथमिक आक्षेप गंगावती पोलीस व चोपडा यांनी घेतला. परंतु तो फेटाळताना खंडपीठाने म्हटले की, धाड व जप्तीची कारवाई नागपूरमध्ये झालेली असल्याने आम्हाला याचिका ऐकण्याचा अधिकार आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button