कर्नाटकच्या मंत्र्यांनी मिळविला ६८  माध्यमांविरुद्ध मनाई आदेश

कर्नाटकच्या मंत्र्यांनी मिळविला ६८  माध्यमांविरुद्ध मनाई आदेश

बंगळुरु : कर्नाटकमधील बी.एस. येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांच्या नेतृत्वाखालील भाजपा (BJP) सरकारमधील सहा मंत्र्यांनी त्यांच्याविरुद्ध कोणताही बदनामीकारक मजकूर आणि बातम्या पूर्ण खातरजमा न करता प्रसिद्ध करण्यास ६८ माध्यमांना मनाई करणारा अंतरिम आदेश न्यायालयाकडून मिळविला आहे.

शिवराम हेब्बर, बी. सी. पाटील, एच.टी. सोमशेखर, के, सुधाकर, नारायण गौडा आणि भ्यारती बसवराज या सहा मंत्र्यांनी संयुक्तपणे दाखल केलेल्या दिवाणी दाव्यात अतिरिक्त न्यायाधीश डी. एस. विजयकुमार यांनी हा अंतरिम आदेश दिला. न्यायालयाने म्हटले की, माध्यमांनी कोणाही बद्दल कोणतीही माहिती व बातमी प्रसिद्ध वा प्रसारित करण्याआधी तिच्या खरेपणाची कायदेशीर मार्गांनी पूर्ण शहानिशा करून मगच प्रसिद्धी द्यायला हवी. असे केल्यानेच माध्यमांच अभिव्यक्ती स्वातंत्र्य व सार्वजनिक पदांवरील व्यक्तींविषयी माहिती जाणून घेण्याचा लोकांचा हक्क यांत सुयोग्य संतुलन राखले जाऊ शकेल.

कर्नाटकचे जलसंपदामंत्री रमेश जरकीहोळी यांनी एका महिलेला नोकरी लावण्याच्या बदल्यात तिच्याकडून शरीरसुखाची मागणी केल्याच्या कथित घोटाळ्याचा एक व्हिडिओ काही वृत्तावाहिन्या व समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारण वादळ उठले. जरकीहोळी यांनी या आरोपाचे खंडन केले. पण पक्षाची ‘नाचक्की होऊ नये म्हणून’ मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

यानंतर इतररही काही मंत्री व आमदारांच्या अशाच प्रकारच्या लैंगिक घोटाळ्याच्या आणखी १९ सीडीसुद्धा लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार अससल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या. त्या पार्श्वभूमीवर या सहा मंत्र्यांनी जरकीहोळी यांच्याप्रमाणे आपलीही ‘खोट्या बातम्या देऊन बदनामी केली जाईल’ या शक्यतेने माध्यमांविरुद्ध दिवाणी दावा दाखल केला. ‘डीप फेक टेक्नॉलॉजी’चा वापर करून हे बदनामीकारक व्हिडिओ तयार केले जात आहेत, असे या मंत्र्यांचे म्हणणे आहे. अशा प्रकारच्या कपोलकल्पित, अतिरंजित व निखालस खोट्या बातम्या पसरविणे ही केवळ त्यांचीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांचीही बदनामी आहे, असे या मंत्र्यांचे प्रतिपादन आहे.

हे सर्व मंत्री आधी जदयूमध्ये होते. आधीचे जदयू -काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी त्यांच्यासह इतरांनी जदयूचा व आमदारकीचाही राजीनामा दिला होता. त्यानंतर येदियुरप्पा सरकार स्थापन झाल्यावर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाच्या तिकिटावर आमदार होऊन ते सर्व आता मंत्री झाले आहेत.

– अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER