कर्मवीर भाऊराव पाटलांनी डांबर प्रकरणामुळं दोनदा आत्महत्येचा केला होता प्रयत्न

Maharashtra Today

भारतात बहूजन विद्यार्थ्यांसाठी अधूनिक शिक्षणाची दारं उघडली ती कर्मवीर भाऊराव पाटलांनी. त्यांची विद्वत्ता आणि दातृत्वाची क्षमता असामान्य होती. त्यांनी रुजवलेल्या रयत शिक्षण संस्थेनं आता विक्राळ वटवृक्षाचं रुप घेतलंय. महाराष्ट्रील मोठ्या असामींनी तिथून शालेय शिक्षण घेतलंय.

कर्मवीर भाऊराव पाटलांचा (Karmaveer Bhaurao Patil) जन्म दिंगबर जैन मुनींची परंपरा लाभलेल्या जैन कुटुंबात २२ सप्टेंबर १८८७ला झाला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातल्या कुंभोज गावी. भाऊरावांचे वडील पिलीवच्या घाटात रोड कारकुन म्हणून काम करायचे. त्यांनी जंगली कुत्र्यांचा धोका ध्यानात घेवून भाऊरावांना कुंभोजला ठेवले.

सत्त्यापाच्या बंडातून मिळाली लढायची शक्ती

कर्मवीरांच्या बालपणी कुंभोजमध्ये सत्त्याप्पाचे बंड हे प्रकरण खूप गाजले. कुंपनाच्या काट्या तोडणाऱ्या एका दलित महिलेला एकानं जनावरासारखी मारहाण केली. सत्त्याप्पाला हे पहावलं नाही. त्याचा राग आनावर झाला. महिलेला मारहाण करणाऱ्याला त्यानं जबरदस्त मारहाण केली की त्यात त्या माणसाचा जीव गेला. हा सत्त्याप्पा कर्मवीरांच्या ऊसातच लपला होता.

बालपणी या सत्त्यप्पानं कर्मवीरांना अंगा खांद्यावर खेळवलं होतं. वावगं खपवून घ्यायचं नाही. प्रतिकार करायचा ही शिकवण भाऊरावांना याच घटनेतून मिळाली होती.

शाहू महाराजांकडून घेतली प्रेरणा

१० फेब्रुवारील १८९६ला वयाच्या आठव्या वर्षी भाऊरावांना शाळेत घालण्यात आलं. भाऊरावांचे वडील विट्यात नोकरीला होते. त्यांचे शेजारी पारसी होते. त्यांचा सल्ला ध्यानात घेवून भाऊरावांना कोल्हापूरच्या इंग्रजी शाळेत प्रवेश दिला. १९०२ ते १९०६ भाऊरावांचे राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षण झालं. तिथं त्यांचा परिचय शाहू महाराजांच्या कार्याशी झाला. राजर्षी शाहू महाराजांकडून प्रेरणा घेत त्यांनी समाज उपयोगी कामं करायला सुरुवात केली.

डांबर प्रकरण

कोल्हापूर संस्थानात १९१४च्या दरम्यान दोन गट परस्परविरोधी कार्यरत होते. त्यातला एक होता कल्लप्पा भरमप्पा निटवे आणि गायकवाड बंधूचा ‘पंडीत गट’ आणि अण्णासाहेब लठ्ठे, बळवंतराव धावते, भाऊसाहेब कुदळे इत्यादी लोकांचा ‘बाबू ‘ नावाचा गट.

१४ फेब्रुवारी १९१४ च्या रात्री शिवाजी क्लबच्या काही सदस्यांनी इंग्लंडच्या राजघराण्यातील एडवर्ड बादशाह, राणी अलेक्झांड्रा इत्यादींच्या पुतळ्याला डांबर फासण्यात आलं. हे प्रकरण इतकं गाजलं की इंग्लंडच्या संसदेत याचे पडसाद उमटले. राजद्रोहाची घटना असल्यामुळं शाहू महाराज अस्वस्थ होते.

निटव्यांनी शाहू महाराजांचे अण्णासाहेब लठ्ठेंविरुद्ध कान भरले. लठ्ठ्यांविरुद्ध भाऊरावांनी साक्ष द्यावेत म्हणून भाऊरावांना कोल्हापूरात बोलावलं गेलं. भाऊरावांनी नकार दिला म्हणून त्यांच्यावर जैनेंद्र प्रेसला आग लावली आणि २ हजारांची चोरी केली हे आरोप लावून त्यांना तुरुंगात टाकलं.

भाऊरावांना हे प्रकरण जिव्हारी लागलं त्यांनी तुरुंगात दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला. पुढं पुराव्या अभावी त्यांची सुटका झाली.

जेवत्या ताटावरुन सोडलं होतं घर

भाऊरावांचे वयाच्या २५व्या वर्षी लक्ष्मीबाईंशी लग्न झाले. त्यावेळी त्या १२ वर्षांच्या होत्या. माहेरचे नाव अदाक्का होतं. त्या प्रतिष्ठीत आणि श्रीमंत घरातल्या असल्यामुळं लग्नात त्यांच्या अंगावर १२० तोळे सोने घालण्यात आले होते. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर ते कोरेगावला आले होते. त्यावेळी काही पाहूणे त्यांच्या घरी जेवायला आले होते.

पाहूण्यांनी विचारणा केली की मुलगा काय करतो. तेव्हा भाऊरावांचे वडील म्हणाले दोन वेळा जेवण करतो आणि दिवसभर हिंडतो. भाऊराव जेवायला बसले होते. लक्ष्मीबाई जेवण वाढत होत्या. हे वाक्य त्यांचा मनाला खूप लागलं. त्यांना अश्रू अनावर झाले. अश्रूचा एक थेंब भाऊरावांच्या ताटात पडला. भाऊरावांना क्रोध अनावर झाला. त्यांनी जेवतं ताट सोडलं आणि काही तरी करुन दाखवीन या निश्चयानं घर सोडलं. त्यांचा एक गुण होता की निश्चय केला की ते मागे हटत नसत. त्यांनी मुलांची शिकवणी घ्यायला सुरुवात केली. मुलांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली. बघता बघता त्यांचे उत्पन्न ९०- ९५रुपयांपर्यंत प्रतिमाह वाढले.

सामाजिक कार्य

सामाजिक कार्य करताना त्यांच्या मनावर महात्मा फुलेंचा जबरदस्त प्रभाव होता. भाऊराव पाटील यांनी सर्व जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी ३८ वसतिगृहे असलेल्या शाळा आणि हायस्कूल सुरू केली, तसेच ५७८ शाळा, सहा ट्रेनिंग कॉलेज, १०८ हायस्कूल आणि तीन महाविद्यालये सुरू केली. महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना “कर्मवीर’ ही पदवी दिली. कृतिशील राजा असाच त्याचा अर्थ आहे. रयत शिक्षण संस्था ही तिच्या बोधचिन्हांसारखीच आपली पाळेमुळे खोलवर असणारया एखाद्या विस्तीर्ण वटवृक्षासारखी महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रावर आपली विशाल छत्रछाया देत आजही उभी आहे.

१९५९ मध्ये कर्मवीर भाऊरावांना पुणे विद्यापीठानं डी.लिट. पदवी देऊन सन्मानित केलं. त्याचवर्षी भारत सरकारने पद्‌मभूषण देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अनेकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवन प्रकाशमय केले.

कर्मवीर भाऊराव पाटीलांनी ९ मे १९५९ ला जगाचा निरोप घेतला. गाव खेड्यातील, ग्रामीण भागातील शैक्षणिक कार्यामुळं कर्मवीर भाऊराव पाटील आजही बहूजनांच्या प्रेरणेचे स्त्रोत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER