
शीर्षक वाचून तुम्ही चकित झाला असाल. म्हणाल हे काय? करीनाच (Kareena Kapoor) तर पटौदी खानदानाची क्वीन आहे, तिच्याच डोक्यावर तर क्वीनचा मुकुट आहे. मध्येच कंगना कुठून आली? तुमचे बरोबर आहे. मात्र ही क्वीन आणि मुकुट खरा नसून सिनेमातील आहे. बॉलिवूडमध्ये यशासाठी धडपडणाऱ्या कंगनाला (Kangana Ranaut) ‘क्वीन’ सिनेमाने हात दिला होता. २०१४ मध्ये आलेल्या या सिनेमातील कंगनाच्या अभिनयाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आणि तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. पण क्वीनमधील ही भूमिका अगोदर करीना कपूरला ऑफर करण्यात आली होती. पण करीनाने नकार दिल्याने ही भूमिका कंगनाच्या झोळीत पडली आणि तिच्या करिअरने आकार घेतला. स्वतः करीनानेच ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली.
करीना कपूर आता दुसऱ्यांदा आई झाली असून बाळंतपणानंतर आराम केल्यानंतर करीनाने पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. करीना सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह असून सतत ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. एवढेच नव्हे तर मुलाखतीतही ती जुन्या आठवणी सांगत असते. अशाच एका मुलाखतीत करीनाने ‘क्वीन’ सिनेमा तिला ऑफर झाला होता असे सांगितले. तिच्या या वक्तव्याने बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. कंगनाच्या जागी करीना स्वतःला पाहू लागली आहे की काय असा प्रश्नही आता विचारला जाऊ लागला आहे.
करीनाने मुलाखतीत बोलताना सांगितले, २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ सिनेमातील राणी मेहराची भूमिका साकारण्यासाठी मला विचारण्यात आले होते. परंतु त्यावेळी मी त्या भूमिकेसाठी स्वतःला योग्य मानत नव्हते. मला वाटत होते की, ती भूमिका मला सूट होणार नाही. त्यामुळे मी तो सिनेमा नाकारला होता. पण आता मागे वळून पाहाण्यात काहीही अर्थ नाही. मी एखाद्या सिनेमाला नकार दिला असेल तर तो केवळ ती भूमिका मला सूट होत नसल्याचे वाटत असल्याने मी नकार दिला होता. योग्य कारण दिल्याशिवाय मी सिनेमे नाकारत नाही असेही करीनाने या मुलाखतीत म्हटले आहे. करीनाने सोडलेल्या या सिनेमात कंगनाची वर्णी लागली आणि नंतर कंगनाची गाडी सुसाट धावू लागली जी आजही फास्ट ट्रॅकवर आहे. हे पाहून तर करीनाला क्वीन सिनेमा सोडल्याचा पश्चाताप होत नाही ना असेही बॉलिवूडमध्ये म्हटले जाऊ लागले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला