फ्लॅशबॅक ; करीना- कपूर खानदानातील हुशार मुलगी

Chandrakant Shindeकरीना कपूरने तिच्यापेक्षा दहा वर्ष मोठ्या असलेल्या सैफ अलीबरोबर लग्न केले तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटले होते. परंतु असे आश्चर्यकारक निर्णय घेण्यास तिने आपल्या पहिल्या चित्रपटापासूनच सुरुवात केली होती. रितिक रोशनपेक्षा अभिषेक बच्चनचे नाव मोठे असल्याने तिने रितिकबरोबरचा पहिला चित्रपट कहो ना प्यार है सोडला होता आणि अभिषेकबरोबर रिफ्यूजी केला होता. लग्न झाले असले तरी करीना आज यशस्वी अभिनेत्री म्हणून कार्यरत आहेच.

ही बातमी पण वाचा:- सोनू सूदकडे जाहिरात जगताचे लक्ष

१९९५-९६ चा काळ असेल. गोविंदा-करिश्मा कपूर अभिनीत हीरो नंबर वनचे उटी येथे शूटिंग सुरु होते. चित्रिकरण कव्हर करण्यासाठी मी तेथे गेलो होतो. एका गाण्याचे चित्रिकरण सुरु होते. सकाळी ९ ची शिफ्ट होती परंतु गोविंदा कधीही वेळेवर येत नसल्याने शूटिंग अकराच्या दरम्यान सुरु झाले. गोविंदासोबतच सेटवर गेलो तेव्हा करिश्मा कपूरबरोबर एक १३-१४ वर्षांची लहान मुलगी बसलेली दिसली.करिश्माच्या सोबत तिची आई बबिताही होती. मला वाटले ती मुलगी करिश्माची एखादी प्रशंसक असेल आणि तिला भेटायला आली असेल. गाण्याचे चित्रिकरण सुरु झाल्यानंतर ती मुलगी बबितासोबतच बसली होती. आणि सुरु असलेल्या चित्रिकरणाकडे लक्ष देऊन बघत होती. मध्येच बबिताला काही विचारत होती. लंच ब्रेक झाला आणि दिग्दर्शक डेव्हिड धवनने त्या मुलीची ओळख करून दिली करीना कपूर. करिश्माची लहान बहिण. मात्र गोलमटोल करीनाकडे पाहाताना स्वप्नातही वाटले नव्हते की ही पुढे बॉलीवुडवर राज्य करेल आणि आपल्या फिगरमुळे चर्चेत राहील. तिच्याशी बोलताना चित्रपटाबद्दल तिला काही आकर्षण आहे असेही जाणवले नव्हते. परंतु आज करीना कपूरने बॉलीवुडमध्ये आपले स्वतःचे एक वेगळे स्थान तर निर्माण केले आहेच सैफबरोबर तिचा संसारही सुखाने सुरु आहे. बहिण करिश्मा प्रमाणे ती संसारात अयशस्वी ठरली नाही.

त्यानंतर करीनाची थेट भेट झाली पाच वर्षानंतर म्हणजे १९९९ मध्ये अभिषेक बच्चन अभिनीत रिफ्यूजी चित्रपटातील नायिकेच्या रुपात. करीनाची उंची तोपर्यंत चांगलीच वाढली होती आणि ती बारीकही झाली होती. तिच्याशी बोलताना आपण एखाद्या नवख्या नायिकेबरोबर बोलत आहोत असे जराही वाटले नाही. मात्र पहिल्या चित्रपटाचे टेंशन मात्र तिच्या चेह-यावर दिसत होते. त्यानंतर अनेक वेळा करीनाबरोबर भेटी झाल्या आणि प्रत्येक वेळी ती एका वेगळ्याच रुपात दिसली होती. खरे तर करीना कपूर ऋतिक रोशनची नायिका म्हणून रुपेरी पडद्यावर अवतरणार होती. प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन यांनी आपल्या मुलाला ऋतिकला लाँच करण्यासाठी कहो ना प्यार है चित्रपटाची सुरुवात केली होती. या चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी करीना कपूरलाच साईन करण्यात आले होते. वर्सोवा बीच येथे करीनाने ऋतिकसोबत एका गाण्याचे चित्रिकरणही केले होते. परंतु पुढील विचार करून करीनाने हा चित्रपट सोडला. यामुळे ऋतिक रोशन आणि करीना कपूर यांच्यात दुरावाही निर्माण झाला होता परंतु करीनााने करिअरच्या भल्याचा विचार करून ऋतिकबरोबर काम करण्याचा निणय घेतला आणि या दोघांनी कभी खुशी कभी गम, यादें मध्ये एकत्र काम करीत दुरावा संपवला.

करीनाने पहिल्या चित्रपटादरम्यान हुशारी दाखवली त्याचे उदाहरण म्हणजे रिफ्यूजी. बॉलीवुडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या मुलाला म्हणजेच अभिषेकला लाँच करण्याचे प्रयत्न सुरु झाले होते. प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक जे.पी. दत्ता यांनी अभिषेकला रिफ्यूजीमधून लाँच करण्याची तयारी सुरु केली. चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीचा शोध सुरु असल्याचे कळताच बबिता यांनी जे. पी. दत्ता यांच्याशी संपर्क केला आणि नायिका म्हणून करीना कपूरची वर्णी लावली. हा चित्रपट मिळताच नवख्या ऋतिकपेक्षा अभिषेकचे वलय मोठे असल्याने करीनाची आई बबिताने विविध कारणांवरून निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन यांच्याशी भांडण उकरून काढले आणि अखेर कहो ना प्यार है मधून करीनाने माघार घेतली. करीनाने माघार घेताच राकेश रोशन यांनी अमिषा पटेलला साईन केले आणि चित्रपट पूर्ण केला. कहो ना प्यार है तिकिट खिडकीवर सुपरहिट झाला तर ज्या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होती तो रिफ्यूजी मात्र तिकिट खिडकीवर आपटला. अपयशाने करीनाची सुरुवात झाली असली तरी तीने नंतर अनेक यशस्वी चित्रपट तर दिलेच सर्वच मोठ्या नायकांची नायिकाही ती झाली.

२१ सप्टेंबर १९८० मध्ये जन्मलेल्या करीना कपूरचे जमनाबाई नरसी आणि डेहरडून येथील वेलहम गर्ल्स स्कूल शाळेत शिक्षण झाले. मिठीबाई कॉलेजमधून पदवी प्राप्त करीनाचे पहिले प्रेम प्रकरण शाहिद कपूरबरोबर झाले. मात्र या दोघांचे खाजगी मधुर क्षणांचे चित्रिकरण सोशल मडियावर व्हायरल झाले आणि करीना एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली. शाहिदने मुद्दाम चित्रिकरण लीक केले असा संशय करीनाला होता आणि त्यामुळेच शाहीदपासून दूर राहाण्याचा निर्णय तीने घेतला. त्यातच तिचे काही चित्रपट तिकिट खिडकीवर अपयशी ठरल्याने ती चिंतेत होती. त्याचवेळी टशन चित्रपटाच्या सेटवर सैफ अलीबरोबर तिचे सूर जुळले. अभिनेत्री पत्नी अमृता सिंहला घटस्फोट दिल्याने सैफही एकटाच होता. खरे तर या दोघांनी टशनपूर्वी एलओसी आणि ओमकारामध्ये काम केले होते परंतु तेव्हा त्या दोघांमध्ये तसे काही संबंध जमले नव्हते. टशनच्या वेळेसच सैफने करिनाला मागणी घातली आणि दोघांचे नवे आयुष्य सुरु झाले. सैफने मग हातावर करीनाच्या नावाचा टॅटूही गोंदवला होता. परंतु करीना सैफबरोबर लग्न करण्यास थोडीशी कां कू करीत होती. त्यांच्या लग्नाच्या बातम्या येत असतानाच एकदा मी सैफ अलीला फोन करून लग्न खरोखर झाले का असे विचारले होते तेव्हा तो म्हणाला होता अजून झाले नाही परंतु लवकरच लग्न करू. आई बबिताने करीनाला समजावले आणि करीनानेही भविष्याचा विचार करून तिच्यापेक्षा दहा वर्ष मोठ्या वयाच्या असलेल्या सैफबरोबर १६ ऑक्टोबर २०१० मध्ये लग्न केले.

करीनाला आता तैमूर नावाचा मुलगा असून तैमूरला सांभाळण्याबरोबरच सावत्र मुलगी साराला तिच्या करिअरमध्ये मदत तर करीत आहेच, तसेच स्वतःच्या फिगर आणि करिअरकडेही लक्ष देत आहे. आजही करीनाकडे अनेक चित्रपट आणि जाहिराती आहेत. बहिण करिश्मापेक्षा तरी करीनाने आपल्या हुशारीने प्रचंड यश मिळवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER