कपिल शर्मा, सुनील ग्रोव्हर पुन्हा एकत्र येणार

kapil-sharma-sunil-grover-will-be-reunited

लॉकडाऊनमध्ये कपिल शर्माचा (kapil Sharma) कॉमेडी शो बंद झाला होता. लॉकडाऊननंतर शूटिंगची परवानगी मिळताच कपिल शर्माने लाईव्ह ऑडियन्सविना शो ला पुन्हा सुरुवात केली होती. मात्र लाईव्ह ऑडियन्स नसल्याने शोमध्ये येणाऱ्या पाहुण्यांनाही मजा येत नव्हती आणि शोचा टीआरपीही दिवसेंदिवस घसरत चालला होता. त्यातच कपिल शर्मा दुसऱ्यांदा पिता बनणार असल्याने त्याला घरीही वेळ द्यायची होती. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कपिलचा शो 31 जानेवारीपासून बंद करण्यात आला. शो ला टीआरपी नसल्याने चॅनेलला खूप नुकसान होत होते आणि चॅनेलने शोचा निर्माता सलमान खानला (Salman Khan) याबाबत सविस्तर माहितीही दिली होती. यानंतर सलमानने शो बंद करण्यासोबतच कपिल आणि सुनील ग्रोव्हरची (Sunil Grover) जोडी पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरु केला आणि त्याला यात यश आल्याचे दिसत आहे. कपिलच्या शोमध्ये गुत्थीच्या भूमिकेने लोकप्रियता मिळवलेला सुनील ग्रोव्हर पुन्हा कपिल शर्मा शोमध्ये दिसणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान आणि कपिलमध्ये सविस्तर चर्चा झाली असून आता कपिल शर्माचा हा शो नव्या रंगात आणि ढंगात सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शोमध्ये सादर केले जाणारे अॅक्टसही तेच तेच असल्याने ते रटाळ झाले आहेत. त्यामुळे त्याच्यातही नाविन्य आणण्यास कपिलला सांगण्यात आले आहे. कपिलच्या सोबत भारती, कृष्णा असून आता त्यांच्यासोबत सुनील ग्रोव्हरही दिसणार आहे. सुनील आणि कपिलमध्ये काही कारणास्तव वाद निर्माण झाला होता. त्या वादामुळेच सुनीलने कपिल शर्मा शो सोडून दिला होता. तो पुन्हा शोमध्ये येणार अशा चर्चा होत्या पण तो कधीही शोमध्ये आला नव्हता. मात्र आता स्वतः सलमान खानने सुनीलशी बोलणे केले आणि त्याची कपिलशी पुन्हा मैत्री करून दिली. केवळ सलमानने सांगितल्यानेच सुनील पुन्हा शोमध्ये येण्यास तयार झाला आहे.

कपिल शर्मा शोच्या नव्या रुपाची आखणी करण्यास सुरुवात झाली असून जून किंवा जुलैमध्ये हा शो पुन्हा छोट्या पडद्यावर प्रसारित होईल अशी माहिती सलमान खान प्रॉडक्शनमधून देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER