कपिल, सचिन आणि विराट सर्वोत्तम; ‘विस्डेन’ने लावली मोहोर

Kapil Dev - Virat Kohli - Sachin Tendulkar

क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेचे नियतकालिक मानले जाणाऱ्या ‘विस्डेन’ने (Wisden) वन डे इंटरनॅशनल क्रिकेटला 50 वर्षे (ODI 50 Years) पूर्ण झाल्याबद्दल प्रत्येक दशकातील सर्वोत्तम अशा पाच खेळाडूंची निवड केली आहे आणि या पाच खेळाडूंमध्ये कपिल देव (Kapil Dev) , सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहली (Virat Kohli). हे तीन भारतीय आहेत. याप्रकारे जागतिक क्रिकेटवर भारतियांचे वर्चस्व असण्यावर ही एक मोहोरच आहे.

विस्डेनने शतकनिहाय निवडलेले सर्वश्रेष्ठ वन डे खेळाडू असे

1970 ते 79- विव्ह रिचर्डस् (वेस्ट इंडिज)
1980 ते 89- कपिल देव (भारत)
1990 ते 99- सचिन तेंडूलकर ( भारत)
2000 ते 10- मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) आणि
2010 ते 19- विराट कोहली

विस्डेन’ने ही निवड केली असली तरी यावर वेगळी मते व्यक्त होणार नाहीत असे नाही पण बहुमत ह्याच खेळाडूंना असेल याबद्दल शंका नाही.

दुसरीकडे ‘विस्डेन’ जे वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू निवडते त्यांच्यामध्ये इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) याची सलग दुसऱ्या वर्षी निवड करण्यात आली आहे. त्याच्याशिवाय ‘विस्डेन’ने वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून झॕक क्रॉली, जेसन होल्डर, मोहम्मद रिझवान, डॉमिनिक सिब्ली आणि डॕरेन स्टिव्हन्स यांचीसुध्दा निवड करण्यात आली आहे.

बेन स्टोक्स सलग दुसऱ्या वर्षी ‘बेस्ट’

स्टोक्सने गेल्या कॕलेंडर वर्षात कसोटी सामन्यात सर्वाधिक 641 धावा 58.27 च्या सरासरीने केल्या शिवाय केवळ 18.73 च्या सरासरीने 19 गडीसुध्दा बाद केले. 2019 मध्यें इंग्लंडच्या विश्वविजयात महत्त्वाची भूमिका पार पाडल्याबद्दलही विस्डेनने 2020 च्या वार्षिकांकात त्याला सर्वोत्तम खेळाडूचा मान दिला होता.त्यावर्षी विश्वचषक अंतिम सामन्याशिवाय बेन स्टोक्सने हेडिंग्लेच्या अॕशेस कसोटीतही विजयी खेळी केली होती.

यासह त्याने विराट कोहलीची सलग तीन वर्षे सर्वोत्तम ठरण्याची मालिका खंडीत केली होती आणि विस्डेनचा हा सन्मान मिळवणारा तौ 2005 नंतरचा पहिला इंग्लिश क्रिकेटपटू ठरला होता. 2005मध्ये अँड्र्यू फ्लिंटाॕफ हा विस्डेनचा सर्वोत्तम क्रिकेटपटू होता. एकापेक्षा अधिक वेळा विस्डेनचा सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरलेला तो पहिलाच इंग्लिश क्रिकेटपटू आहे. त्याचे वडील गेड यांचे डिसेंबरमध्ये निधन झाल्यानंतर वैयक्तिक दुःखात असतानाही त्याने लक्षणीय कामगिरी केली आहे असे ‘विस्डेन’चे संपादक लॉरेन्स बूथ यांनी म्हटले आहे.

डॕरेन स्टिव्हन्सला 44 वर्षे वयात मान

डॕरेन स्टिव्हन्स या केंटच्या अष्टपैलूने 44 वर्षे वयात ‘विस्डेन’ च्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. या वयात हा सन्मान मिळवणारा तो चौथा सर्वाधिक वयाचा खेळाडू आहे. त्याने बॉब विलीस ट्रॉफी स्पर्धेत 15 च्या सरासरीने 29 विकेट काढल्या.1933 मध्ये लिसेस्टरशायरच्या एवार्ट एस्टील यांच्यानंतर सर्वाधिक वयात हा सन्मान मिळवणारा तो खेळाडू ठरला आहे.

होल्डरच्या ब्लॕक लाईव्हज मॕटरची दखल

केंटचाच झॕक क्रॉली याने पाकिस्तानविरुध्दच्या कसोटीत 267 धावांची खेळी केली होती. डॉम सिल्बी याने विंडीजविरुध्द नऊ तासांपेक्षा अधिक काळ पाय रोवून खेळताना 120 धावांची खेळी करत इंग्लंडला मालिका बरोबरीत सोडवण्यात यश मिळवून दिले होते. जेसन होल्डर याने कोविडच्या भीतीत विंडीज संघ इंग्लंड दौऱ्यावर आणला आणि रोझ बोल कसोटीत 42 धावात सहा बळींची कामगिरी करत विंडीजच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. ‘ब्लॕक लाईव्हज मॕटर’ चळवळीतही त्याने ठोस भूमिका घेतली. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने मँचेस्टर कसोटीत आपल्या डावीकडे झेपावत बेन स्टोक्सचा घेतलेला झेल अविस्मरणीय होता आणि त्याने पाकिस्तानी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारीही उचलली.

बेथ मूनी महिलांत सर्वोत्कृष्ट

महिला क्रिकेटपटूंमध्ये बेथ मूनी सर्वोत्तम ठरली. टी-20 स्पर्धेतही ती सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली होती आणि अंतीम सामन्यात भारताविरुध्द तिने 54 चेंडूतच 78 धावा फटकावल्या होत्या. महिलांच्या बिग बॕश लीगमध्येही तिच्या धावा सर्वाधिक होत्या.

पोलार्ड टी-20 मध्ये बेस्ट

वेस्ट इंडिजचा किरोन पोलार्ड हा टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याने विविध स्पर्धांमध्ये प्रत्येक 5.5 चेंडूंमागे एक असे 59 षटकार लगावले. त्याचा स्ट्राईक रेटही जवळपास दोनशेचा आणि सरासरी 53.58 ची राहिली. त्याच्या नेतृत्वात ट्रिन्बागो नाईट रायडर्सने सीपीएल स्पर्धा जिंकली आणि आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सच्या संघातही तो होता.

स्टिव्ह वाॕ उत्कृष्ट छायाचित्रकार

आॕस्ट्रेलियाचा माजी कर्णधार, विश्वविजेता स्टीव्ह वाॕ याला वर्षातील सर्वोत्कृष्ट छायाचित्रकाराचा पुरस्कार मिळाला. भारतातील वाळवंटात सर्वत्र रेतीतही क्रिकेट खेळणाऱ्या मुलांच्या छायाचित्राने त्याला हा सन्मान मिळवून दिला. गेल्या वर्षी एका वृत्तचित्रासाठी त्याने भारत भ्रमंती केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button