हा विक्रम करणारे कपिल देव बहुधा पहिले आणि शेवटचेच!

KapilDev

भारतीय क्रिकेटचे सर्वोत्तम खेळाडू म्हणून ज्यांचे वर्णन केले जाते अशा कपिल देव (Kapil Dev) यांचा आज वाढदिवस. कपिल देव यांच्या नावावर असलेले असंख्य विक्रम आणि त्यांनी गाजवलेल्या सामन्यांची चर्चा आहे. मात्र कपिल देव यांचा एक विक्रम असा आहे जो फारच थोड्या लोकांना माहीत असेल आणि विशेष म्हणजे हा विक्रम करणारे कपिल देव हे एकटेच आहेत. इतर कुणालाही हा विक्रम जमलेला नाही आणि भविष्यातही तो कुणाला जमेल का, याबद्दल शंकाच आहे. आतापर्यंत २८ वेगवेगळे संघ आणि त्यांचे हजारो खेळाडू एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले आहेत; पण कपिल देव यांनी जी कामगिरी केली आहे ती कुणालाच जमलेली नाही.

ही अद्वितीय कामगिरी म्हणजे कपिल देव हे एकमेव असे खेळाडू आहेत ज्यांनी वन डे इंटरनॅशनलमध्ये आपल्या देशासाठी सर्वांत पहिले शतक केले आहे आणि वन डे सामन्यातही पाच विकेट काढणारे ते पहिलेच गोलंदाज आहेत. १९८३ मध्ये कपिल देव यांच्याच नेतृत्वात जेव्हा भारतीय संघ कुणाच्या ध्यानीमनीसुद्धा नसताना विश्वविजेता ठरला होता, त्या स्पर्धेत १३ जूनला ट्रेंट ब्रिज येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कपिल देव यांनी १२ षटकांत ४३ धावांत ५ बळी मिळवले होते. या प्रकारे वन डे सामन्यात प्रथमच कुण्या भारतीय गोलंदाजाने ५ विकेट कमावल्या होत्या.

त्याच स्पर्धेत १६ जून रोजी टनब्रिज वेल्स येथे त्यांनी नाबाद १७५ धावांची ती झिम्बाब्वेविरुद्धची ऐतिहासिक अविस्मरणीय खेळी केली होती. वन डे इंटरनॅशनलमधील भारतातर्फे हे पहिलेच शतक होते. या प्रकारे वन डे क्रिकेटच्या इतिहासात एखाद्या संघासाठीचे पहिले शतक आणि पहिल्यांदा ५ विकेट काढणारा एकच खेळाडू असणारे कपिल देव हे एकटेच आहेत. आता वन डे इंटरनॅशनलमध्ये नेपाळपासून पापुआ न्यू गिनीपर्यंत, हाँगकाँगपासून अमेरिकेपर्यंत असे २८ वेगवेगळे संघ खेळलेले आहेत; पण इतर कोणत्याही संघाच्या खेळाडूला अशी कामगिरी करणे जमलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER