कपिल देव कुणाबद्दल म्हणाले, फलंदाजांची भंबेरी उडवणारी गोलंदाजी त्याचीच!

Kapil Dev-Jaspreet Bumrah

आपल्या काळातील आघाडीचे गोलंदाज राहिलेले अष्टपैलू कपिल देव(Kapil Dev) यांनी आताच्या पिढीच्या एका भारतीय गोलंदाजाची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. ते म्हणता की त्याची गोलंदाजी बघण्यात मजा आहे. इतर कोणत्याही गोलंदाजापेक्षा सद्यस्थितीत तोच फलंदाजांची अधिक भंबेरी उडवतोय. कपिल ‘पाजी’ यांच्याकडून अशा कौतुकास पात्र ठरलेला गोलंदाज म्हणजे आपला जसप्रीत बुमरा (Jaspreet Bumrah). कामगिरी अतिशय चांगली असली तरी त्याने स्वतःच्या शरीराकडेही लक्ष द्यायला हवे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

बुमराबद्दल कपिल म्हणतात की, चार ते आठ षटके ठीक आहे पण कसोटी सामन्यांमध्ये जेंव्हा तो 20 ते 25 षटके दिवसाला गोलंदाजी करतो तेंव्हा तर त्याच्या छोट्याशा रन अपने जलद गोलंदाजी हा चिंतेचा विषय ठरु शकतो. आताच्या पिढीतील कोणत्या गोलंदाजाची गोलंदाजी बघायला तुम्हाला आवडेल या प्रश्नाच्या उत्तरात कपिलदेव यांनी हा अभिप्राय दिला.

वेस्ट इंडिजचे महान जलद गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनीसुध्दा बुमराची गोलंदाजी शैली बघून चिंता व्यक्त केली होती. त्यांनासुध्दा बुमरा छोट्या रनअपने गोलंदाजी करुनही ज्या गतीने चेंडू टाकतो ते पाहाता त्याचे शरीर दीर्घकाळ हाच जोम राखू शकेल का, याबद्दल शंका आहे.

कपिल म्हणाले की होल्डिंग जे म्हणतात ते ठीकच आहे. त्याच्या शरीरावर खूप ताण पडणार आहे. तो आपली तंदुरुस्ती दीर्घकाळ राखू शकेल अशी आशा करतो. पण सद्यस्थितीत छोट्या रन अपने गोलंदाजी करुनसुध्दा त्याच्याएवढा फलंदाजांना नाचवू शकणारा दुसरा गोलंदाज नाही.

बुमराच्या उदयापासून भारताची जलद गोलंदाजी भक्कम बनली असून अलीकडे जलद गोलंदाजीत भारतीय मारा सर्वोत्तम असल्याचे मानले जाते. बुमराशिवाय मोहम्मद शामी, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव व नवदीप सैनी असे गोलंदाज आपल्याकडे आहेत आणि त्यांनी द. आफ्रिका, न्यूझीलंड व आॕस्ट्रेलियात आपले प्रभुत्व दाखवून दिले आहे. हा आपला मारा प्रतिस्पर्धी संघाच्या छातीत धडक भरवतोय ही आनंदाची बाब असल्याचे कपिल यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की ब्रायन लारासारखा फलंदाज म्हणतो की त्याला एकवेळ कपिल देवचा सामना करायला अडचण नाही पण बुमरा नको. शामी आहे तर आपले जलद गोलंदाज छानच आहेत. आता आपली मदार फिरकीवर नाही तर जलद गोलंदाजांवर आहे हे सांगताना फार आनंद होतो. सामन्यातल्या 20 विकेट काढण्याची ताकद आता आपल्याकडे आहे. पूर्वी फिरकी गोलंदाजी हा आपला किल्ला होता . आता त्यांना उसळत्या व टणक खेळपट्ट्या देऊ नका असे प्रतिस्पर्धि संघ म्हणू लागले आहेत हा फार मोठा बदल आहे असे कपिल देव यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER