नितेश राणेंच्या अडचणीत वाढ ; संदेश पारकरांचा सतीश सावंतांना पाठिंबा

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपूत्र नितेश राणे यांना उमेदवारी दिल्यामुळे कणकवलीत शिवसेना-भाजपा आमने-सामने आले आहे. आता कणकवलीत नितेश राणे यांना जबर धक्का बसला आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार संदेश पारकर यांनी माघार घेत शिवसेनेच्या सतीश सावंत यांना पाठिंबा दिला आहे. नितेश राणे हे महायुतीचे उमेदवार नसल्याने सतीश सावंतांच्या पाठिशी राहणार असल्याची भूमिका संदेश पारकर यांनी व्यक्त केली. पारकर यांनी नितेश राणे विरोधात घेतलेल्या भूमिकेने खासदार विनायक राऊत यांच्या शिष्टाईला यश आल्याचे दिसते .

एकिकडे भाजपने राणेंना उमेदवारी दिली असली तरीही दुसरीकडे मात्र शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली. त्यामुळे राणे विरुद्ध शिवसेना अशीच लढत होणार आहे .

यंदा विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजपामधील थेट सामना यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने रंगणार आहे. दरम्यान भाजपाने छोटेखानी समारंभात नितेश राणेंना पक्षात प्रवेश देऊन कणकवलीतून उमेदवारी दिली. शिवसेनेचा नारायण राणे आणि त्यांच्या मुलांच्या उमेदवारीला प्रखर विरोध आहे. त्यामुळे शिवसेनेने राणेंचेच एकेकाळचे सहकारी सतीश सावंत यांना एबी फॉर्म देऊन कणकवलीतून रिंगणात उतरवले आहे.

सतीश सावंत यांनी अलीकडेच राणेंची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला. ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. सतीश सावंत यांच्या उमेदवारीमुळे आता तळ कोकणात नारायण राणे विरुद्घ शिवसेना असा सामना रंगणार आहे. शिवसेनेच्या विरोधामुळेच नारायण राणेंचा अद्यापपर्यंत भाजपाप्रवेश होऊ शकलेला नाही.