कन्हैया कुमार, इतरांविरुद्धचा देशद्रोहाचा खटला १५ मार्चपासून

Kanhaiya Kumar

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (Jawaharlal Nehru University) फेब्रुवारी २०१६ मध्ये आयोजित एका कार्यक्रमात भारतविरोधी घोषणा दिल्या गेल्याच्या आरोपावरून विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा त्या वेळचा नेता कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) व अन्य १० विद्यार्थ्यांवर दाखल केल्या गेलेल्या खटल्याचे कामकाज येत्या १५ मार्चपासून सुरू होणार आहे. या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेऊन सत्र न्यायालयाने कन्हैया कुमारसह इतर आरोपींना १५ मार्च रोजी न्यायालयात हजर होण्याचा समन्स जारी केला.

उमर खालिद, अनिर्बन भट्टाचार्य, अकिब हुसैन, मुजीब हुसैन गट्टू, मुनीब हुसैन गट्टू, उमर गूल, रईस रसूल, बशारत अली आणि खालिद बशीर भट्ट हे या खटल्यातील इतर आरोपी आहेत. संसदेवरील हल्ल्याबद्दल फाशी दिल्या गेलेल्या अफजल गुरू याच्या ‘पुण्यतिथी’ निमित्त विद्यापीठात ९ फेब्रुवारी, २०१६ रोजी विद्यार्थ्यांनी आयोजित कार्यक्रमात कन्हैया कुमारने दिलेल्या चिथावणीनंतर भारतविरोधी घोषणा दिल्या गेल्या, असा आरोप आहे.

या आरोपींवर भारतीय दंड विधानाच्या १२४ ए, ३२३, ४६५, ४७१, १४३, १४७, १४९ व १२० बी या कलमान्वये खटला चालविण्यात येणार आहे. त्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलचे कॉल रेकॉर्ड व अन्य पुराव्यांसह तपास पूर्ण करून पोलिसांनी जानेवारी २०१९ मध्ये महानगर दंडादिकाऱ्यांपुढे आरोपपत्र दाखल केले होते.

परंतु यापैकी देशद्रोहाच्या (कलम १२४-ए) खटल्यासाठी राज्य सरकारची पूर्वसंमती आवश्यक होती. आरोपपत्र दाखल करताना ती घेतली गेली नव्हती.  म्हणून दंडाधिकाऱ्यांनी ते आरोपपत्र स्वीकारले नव्हते. मात्र आता  फेब्रुवारीमध्ये दिल्ली सरकारने आवश्यक संमती दिल्यानंतर आरोपपत्र स्वीकारून खटल्याचे काम पुढे सुरू झाले होते.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER