मुंबईतील खटले हिमाचलमध्ये चालविण्यासाठी कंगनाची याचिका

Kangana Ranaut - Shivsena
  • शिवसेनेकडून जीवाला धोका असल्याचा आरोप

नवी दिल्ली :- बॉलिवूडची (Bollywood) अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) आणि तिची बहिण रंगोली चंदेल यांनी समाजमाध्यमांतील टीकात्मक पोस्टवरून त्यांच्याविरुद्ध मुंबईत दाखल केले गेलेले चार फौजदारी खटले हिमाचल प्रदेशातील सिमला या त्यांच्या मूळ शहरात चालविण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या दोन्ही बहिणींनी अ‍ॅड. नीरज शेखर यांच्यामार्फत ही याचिका २४ फेब्रुवारी रोजी दाखल केली असून सध्या ती कार्यालयाने निदर्शनास आणलेल्या त्रुटी व उणिवा दूर करण्याच्या टप्प्यात आहे. यासाठी ९० दिवसांचा वेळ असून या औपचारिकता पूर्ण झाल्यावरच याचिका सुनावणीसाठी लावली जाऊ शकेल.

राज्यातील सत्ताधारी शिवनेच्या नेत्यांचा आमच्यावर व्यक्तिश: डूख असल्याने हे खटले मुंबईत चालले तर आमच्या जीवाला धोका संभवू शकतो, असे या दोन्ही बहिणींनी खटले हिमालच प्रदेशात स्थानांतरीत करण्यासाठी प्रमुख कारण दिले आहे. या संदर्भात त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनाचा उल्लेख ‘हरामखोर लडकी’ असा करणे आणि शिवसेनेच्या ताब्यातील बृहन्मुंबई महापालिकेने कंगनाच्या बंगल्याचे बांधकाम पाडण्याची कारवाई ‘आकसा’ने करणे यांचा संदर्भ दिला गेला आहे.

जे खटले मुंबईबाहेर चालविण्यासाठी ही याचिका केली गेली आहे त्यात अ‍ॅड. अली काशिफ खान देशमुख, ख्यातनाम गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर व मुनव्वर अली यांनी दाखल केलेल्या खटल्यांचा समावेश आहे. समाजमाध्यमांतील पोस्टवरून या तिघांनी खासगी फौजदारी फिर्यादी केल्या आहेत व ती प्रकरणे महानगर दंडाधिकारी न्यायालयांमध्ये विविध टप्प्यांवर प्रलंबित आहेत. यापैकी जावेद अख्तर यांची फिर्याद व्यक्तिगत बदनामीची आहे तर अन्य दोन फिर्यादींवरून देशद्रोहासह अन्य गुन्हे नोंदविले गेले आहेत. मुनव्वर अली यांची फिर्याद दोन्ही बहिणींविरुद्ध आहे तर अन्य दोन फिर्यादी एकट्या कंगनाविरुद्ध आहेत. अली काशिफ देशमुख यांनी एकाच पोस्टवरून अंबोली पोलीस ठाण्यात व महानगर दंडाधिकार्‍यांकडे फिर्याद केली आहे. या फिर्यादींवरून नोंदलेले गुन्हे रद्द करावेत यासाठी दोन्ही बहिणींनी उच्च न्यायालयात याचिका केल्या. पण त्यावर अद्याप निकाल झालेला नाही.

कर्नाटक हायकोर्टाचा स्थगितीस नकार

मोदी सरकारने केलेल्या तीन नव्या कृषीविषयक कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीच्या सीमांवर धेरणे धरलेल्या शेतकºयांविषयी केलेल्या ट्वीटवरून कर्नाटकमधील एक वकील रमेश नायक यांनी कंगनाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. त्यावर तुमकूर येथील न्याय  दंडाधिकार्‍यांनी संबंधित पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचा आदेश दिला. तो रद्द करण्यासाठी कंगनाने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका केली आहे. ही याचिका मंगळवारी न्या. एच. पी. संदेश यांच्यापुढे आली. कंगनाच्या वतीने अ‍ॅड. रिझ्वान सिद्दिकी यांनी अंतरिम स्थगितीची विनंती केली. परंतु याचिकेतील त्रुटी व उणिवांद्दल न्यायालायच्या कार्यालयाने घेतलेले आक्षेप आधी दूर करा, मगच तुमचे म्हणणे ऐकू, असे सांगून न्यायालयाने त्यासाठी सिद्दिकी यांना एक आठवड्याचा वेळ दिला.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER