जावेद अख्तर बदनामी खटल्यात कंगनाचा सत्र न्यायालयात अर्ज

Kangana Ranaut & Javed Akhtar - Maharastra Today
  • दंडाधिकार्‍यांनी काढलेल्या ‘वॉरन्ट’ला आक्षेप

मुंबई :- ‘बॉलिवूड’चे (Bollywood) प्रसिद्ध गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या खासगी फिर्यादीवरून फौजदारी खटला सुरू करण्यासाठी महानगर दंडाधिकाऱ्यांनी  जारी केलेल्या ‘प्रोसेस’विरुद्ध बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हिने सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

दंडाधिकार्‍यांच्या निर्णयाविरुद्ध कंगना हिने दिंडोशी येथील सत्र न्यायालयात फेरविचार याचिका (Revision Application) केली आहे. दंड प्रक्रिया संहितेच्या कलम २०४ अन्वये ‘प्रोसेस’ जारी करण्यापूर्वी दंडाधिकार्‍यांनी फिर्यादीखेरीज त्यांच्या साक्षीदारांचीही शपथेवर जबानी नोंदविणे बंधनकारक असते. प्रस्तुत प्रकरणात तसे न करताच ‘प्रोसेस’ जारी करण्यात आली आहे, असा कंगनाचा मुख्य आक्षेप आहे. कंगनाच्या या अर्जावर १५ मार्च रोजी सुनावणी अपेक्षित आहे.

आधी काढलेल्या समन्सनुसार न्यायालयात हजर न झाल्याबद्दल अंधेरी येथील महानगर दंडाधिकारी ए. ए. खान यांनी गेल्या तारखेला कंगनाविरुद्ध जामीनपात्र वॉरन्ट जारी केले होते. समन्स काढले आहे व हजेरीची तारीख हे माहीत असूनही कंगना मुद्दाम हजर झाली नाही, असे तिने केलेल्या एका ट्विटच्या आधारे अख्तर यांच्या वकिलाने निदर्शनास आणल्यानंतर वॉरन्ट काढले गेले होते.

कंगना हिने ‘रिपब्लिक टीव्ही’चे प्रधान संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना १९ जुलै रोजी दिलेल्या मुलाखतीत आपल्याविषयी केलेल्या काही आक्षेपार्ह विधानांबद्दल अख्तर यांनी भादंवि कलम ४९९ व ५०० अन्वये बदनामीची खासगी फिर्याद दाखल केली. गेल्या डिसेंबरमध्ये त्या फिर्यादीच्या अनुषंगाने अख्तर यांचे निवेदन नोंदवून घेतल्यानंतर दंडाधिकार्‍यांनी त्यातील तक्रारीचा तपास करण्यास जुहू पोलिसांना सांगितले होते. पोलिसांचा तपासी अहवाल आल्यावर अख्तर यांच्या फिर्यादीत सकृद्दर्शनी तथ्य दिसते असे मत नोंदवत दंडाधिकार्‍यांनी खटल्यासाठी ‘प्रोसेस’ जारी करत कंगनाविरुद्ध समन्स काढले होते.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER