
कंगना रनौत (Kangana Ranaut) एकाच वेळेला अनेक कामे करताना दिसत आहे. एकीकडे सोशल मीडियावर (Social media) ती आपल्या प्रतिक्रिया देत असतानाच तिच्यावर दाखल खटल्यांना सामोरे जाण्याचेही काम करीत आहे. हे सगळे करीत असताना सिनेमाचे शूटिंगही अथकपणे करताना दिसत आहे. गेल्या महिन्यात कंगनाने तिच्या नव्या ‘धाकड’ (Dhakad) सिनेमाची माहिती दिली होती आणि आता या सिनेमाचे शूटिंग मध्य प्रदेशमध्ये जोमात सुरु झालेले आहे. कंगना ‘धाकड’च्या सेटवर नुकतीच अॅक्शन सीन करताना दिसली. कंगनाने सिनेमाच्या सेटवरील एक व्हीडियो सोशल मीडियावर शेअर करीत सिनेमाच्या टीमचे अभिनंदन केले आहे.
तामिळनाडूच्या स्वर्गीय अभिनेत्री मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावरील सिनेमाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर कंगनाने लगेचच धाकड या तिच्या नव्या अॅक्शन सिनेमाची घोषणा केली होती. या सिनेमाचे दिग्दर्शन रजनीश घईवर सोपवण्यात आलेले असून या सिनेमात अर्जुन रामपाल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात कंगना अॅक्शन करताना दिसणार आहे. सिनेमाचे पहिले पोस्टर जेव्हा कंगनाने सोशल मीडियावर शेअर केले होते तेव्हाच हा सिनेमा काय असेल याची कल्पना आली होती. आता कंगनाने तिच्या ऑफिशियल ट्वीटर अकाउंट वर सिनेमाच्या सेटवरील शूटिंगचा व्हीडियो शेअर केला आहे. यात ती अॅक्शन करताना दिसत आहे. कंगनाने या सिनेमाच्या रिलीजची डेटही जाहीर केली असून हा सिनेमा 1 ऑक्टोबर 2021 रोजी भारतभरात रिलीज केला जाणार आहे.
या व्हीडियोत कंगना एका अॅक्शन सीनची रिहर्सल करताना दिसत आहे. त्यानंतर कंगनाने तिच्या टीमचे अभिनंदन करताना लिहिले आहे, ‘माझ्या टीमची प्रशंसा करण्यासाठी हे ट्विट मी करीत आहे. माझी टीम कोळसा खाणीतील अॅक्शन दृश्यांवर महिन्यांपासून तयारी करीत आहे. आणि मी मात्र गेस्ट अपियरंस करीत फक्त रिहर्सल करीत आहे. अशा प्रकारची मेहनत आणि कामाप्रती एकरुपता तंत्रज्ञ जेव्हा दाखवतात, तेव्हा ते फक्त पैशांसाठी नसते. कलाकार त्यांची ही मेहनत लक्षात घेत नाहीत. त्यांना माहितीही नसते परंतु हे ठीक आहे असेही कंगनाने व्हीडियोसोबत लिहिले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला