कंगनाच्या विधानाचे समर्थन नाही, मात्र… – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis & Kangana Ranaut

मुंबई : केंद्र सरकारने अभिनेत्री कंगना राणौतला (Kangana Ranaut) वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारचा हा निर्णय योग्यच आहे. मात्र एखाद्या व्यक्तीने चुकीचे वक्तव्य केले असेल, त्याचे विचार अयोग्य असतील तर आपण त्यावर आक्षेप नोंदवू शकतो. मात्र, त्या व्यक्तीचा जीव आणि मालमत्तेचे संरक्षण करणे, ही राज्य सरकार आणि संवैधानिक पदावर बसलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. तसे होत नसेल तर आपल्याला ‘बनाना रिपब्लिक’ होण्यास वेळ लागणार नाही. मग आपल्याकडे कायद्याचे राज्य उरणार नाही. असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले. ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी फडणवीस म्हणाले की, तुम्हाला एखाद्याचे मत पटत नसेल तर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करा. मात्र, संबंधित व्यक्तीचे रक्षण करणे हे संवैधानिक पदावरील व्यक्तींचे कर्तव्य आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कंगनाला सुरक्षा पुरवण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे.

ते पुढे म्हणाले की दहशतवाद्यांनासुद्धा त्यांच्यावर हल्ला होणार नाही यासाठी कायद्याच्या भूमीत सुरक्षा पुरवावी लागते, कंगना तर अजूनही एक कलावंत आहे.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देश्मुख यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा मिळत असेल तर हा निर्णय गंभीर, आश्चर्यकारक, दु:खद आहे. मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल वक्तव्य करणाऱ्यांचा सगळ्या पक्षांनीच निषेध करायला हवा, अस अनिल देशमुख म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER