ड्रग्ज प्रकरणी कंगना रणौतची चौकशी होणार – गृहमंत्री देशमुख

Kangana Ranaut-Anil Deshmukh

मुंबई: शिशिवसेनेशी (Shivsena) दोन हात करणा-या कंगना रणौतच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कंगना रणौत (Kangana Ranaut) हीदेखील ड्रग्ज घेत असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. राज्य सरकारने कंगनाच्या ड्रग्स कनेक्शनची चौकशी करायला सुरुवात केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी यासंदर्भात माहिती दिली.

तसेच अध्ययन सुमनच्या एका जुन्या मुलाखतीच्या आधारे कंगना ड्रग्ज घेत असल्याचे सागण्यात येत आहे. याच मुलाखतीच्या आधारावर कंगनाच्या ड्रग्ज कनेक्शनचा तपास करण्यात येणार आहे, असे गृृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. शिवसेना नेते सुनील प्रभू आणि प्रताप सरनाईक यांनी अध्ययन सुमनच्या एका जुन्या मुलाखतीची कॉपी महाराष्ट्र सरकारला सोपवली आहे. या मुलाखतीत अध्ययन सुमनने आरोप केला होता, की कंगना ड्रग घेते आणि ती त्यालाही बळजबरी करत होती. यानंतर सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र पोलीस या प्रकरणाची चौकशी करतील.

दरम्यान, एनसीबीने ड्रग्सप्रकरणी कंगनाची चौकशी करावी, अशी मागणी कॉंग्रेसने सोमवारीच केली होती. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने स्वतःच ड्रग घेत असल्याची कबुली एका व्हिडीओमध्ये दिली आहे. कंगना मित्रांनाही ड्रग्जसाठी जबरदस्ती करत होती, असे त्या व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे. या सर्वांची दखल घेत नार्कोटिक्स विभागाने कंगनाची ड्रग्ससंदर्भात चौकशी केली पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले होते. मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि कंगना रणौत यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे.

कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे, मग प्रखर विरोधानंतर मुंबईला माता यशोदा, महाराष्ट्र मला आवडतो असा यू टर्न घेणे. सोबतच मुबईत मी येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा, असे आव्हान देणे अशा प्रकरणामुळे शिवसेना-कंगना वाद वाढत गेला. त्यातच मुंबई महापालिकेनेही कंगनाच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली. कंगनाचे कार्यालय रहिवासी  स्थानी असल्याची नोटीसदेखील कंगनाच्या ऑफिसला लावली आहे. त्यानंतर आता कंगनाचे ड्रग्ज कनेक्शन तपासले जाणार असल्याचे आज विधानसभेत गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER