शेतकरी आंदोलनावरील एका ट्विटसाठी रिहानाला 100 कोटी रुपये दिल्याचा कंगनाचा आरोप

केंद्र सरकारने (Central Government) लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधीत गेल्या 70 दिवसांपासून पंजाब आणि हरयाणातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. सरकारने आंदोलनकर्त्यांशी बोलणी करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु केला होता पण आता आंदोलक कायदे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी आक्रमक झालेले आहेत. त्यातूनच 26 जानेवारी या आपल्या प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर या शेतकऱ्यांनी धडक दिली. तोडफोड केली. त्यानंतर अचानक परदेशातील पॉप गायिका रिहाना, पॉर्न स्टार मिया खलिफा यांनी शेतकरी आंदोलनाला समर्थन देणारे ट्विट केले. त्यांच्या या ट्विटवर बॉलिवूडकरांनी या दोघींचा चांगलाच समाचार घेत आमच्या अंतर्गत गोष्टीत ढवळाढवळ करू नका असा सल्ला त्यांना दिला. कंगनानेही (Kangana Ranaut) त्यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. मात्र आता एका मुलाखतीत कंगनाने, शेतकरी आंदोलनाच्या एका ट्विटसाठी रिहानाला 100 कोटी रुपये दिल्याचा आरोप केला आहे.

कंगनाने नुकताच एक इंटरव्ह्यू दिला. यात रिहानाबाबत बोलताना कंगनाने, जगभरात जेव्हा कोरोनाने थैमान घातले होते तेव्हा एक शब्दही न बोलणाऱ्या रिहाना आता अचानक भारतातील शेतकरी आंदोलनाबाबत का बोलावेसे वाटले? असा प्रश्न केला. यासाठी तिला 100 कोटी रुपये देण्यात आले आहेत. हे पैसे तिला कोणी आणि कसे दिले याचा तपास आता पोलिसांनी केला पाहिजे. असेही कंगनाने या मुलाखतीत म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER