
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हिने खार येथील तिच्या तीन राहत्या प्लॅटच्या रचनेत फेरबदल करताना इमारतीच्या मंजूर आराखड्याचे उल्लंघन केले, असे मत दिंडोशी येथील नगर दिवाणी न्यायालयाने व्यक्त केले आहे.
खार येथील एका १६ मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कंगनीचे तीन फ्लॅट आहेत. त्या फ्लॅटचे एकत्रीकरण व फेररचना करताना बेकायदा बांधकाम केले गेल्याची व ते पाडून टाकण्याची नोटीस महापालिकेने कंगनास बजावली होती. त्याविरुद्ध कंगनाने दिवाणी दावा दाखल करून त्यात महापालिकेस प्रस्तावित कारवाई करण्यास मनाई करावी, असा अर्ज कंगना हिने केला होता. तो फेटाळताना दिवाणी न्यायाधीश एल. एस. चव्हाण यांनी वरीलप्रमाणे मत नोंदविले. न्यायाधीश चव्हाण यांनी गेल्या गुरुवारी दिलेले सविस्तर निकालपत्र आता उपलब्ध झाले आहे. या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी कंगनाला सहा आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. त्या दरम्यान कंगना मनाई हुकूम मिळवू शकली नाही तर महापालिका कंगनाने केलेले कथित ‘बेकायदा’ बांधकाम पाडू शकेल.
कंगनाने खार येथील हे तीन फ्लॅट अंतर्गत रचना बदलून एकत्र केले. ते करत असताना तिने इमारतीच्या ‘संक एरिया’वर, ‘डक्ट एरिया’वर तसेच सामायिक पॅसेजवर छत टाकून ‘एफएसआय’च्या हिशेबातून वगळलेला भाग निवासयोग्य केला. सक्षम प्राधिकाºयांची पूर्वसंमती न घेता असे फेरबदल करणे हे इमारतीच्या मंजूर आराखड्याचे गंभीर स्वरूपाचे उल्लंघन आहे, असे न्यायालयाने म्हटले.
गेल्या ९ सप्टेंबर रोजी महापालिकेने वांद्रे येथील पाली हिलवरील कंगनाच्या बंगल्यात केल्या गेलेल्या अशाच कथित ‘बेकायदा बांधकामा’विरुद्ध कारवाई सुरु केली होती. त्यावेळी कंगनाने उच्च न्यायालयात दाद मागितली होती व न्यायालयाने महापालिकेची कारवाई बेकायदा ठरवून रद्द केली होती.
अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला