संजय दत्तची भेट घेतल्याने कंगना झाली ट्रोल

Kangana Ranaut - Sanjay Dutt

सुशांत सिंहच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर कंगना रनौतने (Kangana Ranaut) बॉलिवुडमधील (Bollywood) ड्रग्सच्या वापराबाबत चिंता व्यक्त करीत बॉलिवुडमध्ये कलाकार सर्रास ड्रग्स घेतात असा आरोप केला होता. तसेच बॉलिवुडमधील वंशवादावरही कंगनाने चांगलेच तोंडसुख घेतले होते. बॉलिवुडमध्ये नव्या कलाकारांना लगेच संधी मिळत नाही. वंशवाद चालतो असे म्हटले होते. असे असतानाही कंगनाने हैदराबादमध्ये संजय दत्तची (Sanjay Dutt) भेट घेतल्याने कंगनाला आता ड्रग्स घेणाऱ्याची आणि वंशवादावर टीका करीत असतानाही दत्त वंशांतून पुढे आलेल्या संजय दत्तची भेट कशी चालते असा प्रश्न सोशल मीडियावर कंगनाला केला जात आहे. मात्र कंगनाचे काही फॅन्स तिच्या समर्थनार्थही पुढे आले आहेत.

कंगना सध्या हैदराबादमध्ये प्रख्यात अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर तयार होत असलेल्या थलाइवी चित्रपटाचे शूटिंग करीत आहे. या चित्रपटात कंगना जयललिता यांची भूमिका साकारीत आहे. संजय दत्तही हैदराबादमध्ये त्याच्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी पोहोचलेला आहे. कंगनाने संजय दत्तबरोबरच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करीत, संजय दत्त पूर्वीपेक्षा अधिक सुंदर आणि फिट दिसत असल्याचे म्हटले. त्यावरूनच ती ट्रोल होऊ लागली आहे.

कंगनाने पोस्टमध्ये लिहिले आहे, मला जेव्हा समजले की संजय दत्तही हैदराबादमध्ये शूटिंगसाठी आला असून तो मी ज्या हॉटेलमध्ये राहात आहे तेथेच राहात आहे, तेव्हा मला त्याला भेटल्याशिवाय राहवेना. सकाळी मी संजू सरांना भेटली आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. संजय दत्त पूर्वीपेक्षा सुंदर आणि फिट दिसत असल्याचे पाहून मला खूपच आश्चर्य वाटले. आम्ही तुझ्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो असेही कंगनाने पोस्टमध्ये लिहिले आहे.

यावर एका फॅनने, तुझा दुहेरी चेहरा उघड झाला असून ड्रग्सबाबत तू बोलत असतानाच संजय दत्त यांची भेट घेतलेली कशी चालते असे म्हटले आहे. तर आणखी एका फॅनने वंशवादावर टीका करणारी तू संजय दत्तची भेट कशी घेऊ शकतेस. संजय दत्तप्रमाणे अभिनय तू करूच शकणार नाही असेही एका फॅनने म्हटले आहे. तर कंगनाच्या एका प्रशंसकाने, एखाद्या आजारी माणसाला भेटायला जाण्यात गैर काय असा प्रश्न कंगनाला ट्रोल करणाऱ्यांना विचारला आहे.

एकूणच सध्या कंगना सोशल मीडियवरचीही क्वीन झाली असून तिच्या प्रत्येक पोस्टवर प्रचंड प्रमाणात प्रतिक्रिया येत असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER