केन विल्यम्सनचे तीन सामन्यातील दुसरे द्विशतक

Kane Williamson

न्यूझीलंडचा (New Zealand) कर्णधार केन विल्यम्सनबद्दल (Kane Williamson) एक व्टिट वाचले, ‘ जेवायचे, झोपायचे, सकाळी उठायचे आणि केन विल्यम्सनने शतक केल्याची बातमी वाचायची, पुन्हा जेवायचे, झोपायचे…असेच रुटीन सध्या सुरू आहे.’ हे व्टिट शब्दशः खरे ठरावे अशी सध्या केन विल्यम्सनची फलंदाजी सुरु आहे. कसोटी सामन्यांच्या गेल्या चार डावात त्याने तीन शतकं झळकावली आहेत. यात दोन द्विशतकांचा समावेश आहे. ताजी खेळी पाकिस्तानविरुध्दच्या (Pakistan) ख्राईस्टचर्च (Christchurch) कसोटीतील 238 धावांची आहे.

याच्या आदल्याच कसोटीत त्याने 129 व 21 धावांच्या खेळी केल्या तर त्याच्या आदल्या कसोटीत वेस्ट इंडिजविरुध्द 251 धावांची खेळी केली होती. याप्रकारे गेल्या लागोपाठ तीन सामन्यात त्याने शतक झळकावले आहे.

यासह तो नववर्षात जगातील नंबर वन फलंदाज तर बनलाच आहे शिवाय त्याने फलंदाजीच्या सरासरीत विराट कोहली व सचिन तेंडुलकरलासुध्दा मागे टाकले आहे. कोहलीची सरासरी 53.48 व सचिनची सरासरी 53.71 आहे तर विल्यम्सनची सरासरी आता 54.31 आहे.

अलीकडील 251 व 238 धावांच्या खेळीसह केन विल्यम्सनच्या नावावर आता चार द्विशतके आहेत आणि आपल्या विनयशील व संयमीत वर्तनाने आधीच भरपूर प्रशंसक मिळवलेल्या केन विल्यम्सनवर क्रिकेट जगतातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आपले चौथे द्विशतक त्याने शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर एक धाव घेऊन पूर्ण केले. आणि नेहमीप्रमाणे आपल्या स्वभावानुसार फारसा जल्लौष न करता त्याने संयमीत प्रतिक्रिया दिली. त्याआधी 177 धावांवर खेळत असताना त्याला अझहर अलीकडून जीवदान लाभले होते. त्याआधी पहिल्या दिवशी शान मसूदलाही त्याचा अवघड झेल टीपता आला नव्हता. हे दोन अपवाद सोडले तर त्याने पाकिस्तानी गोलंदाजांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले.

या खेळीत त्याने 7 हजार कसोटी धावासुध्दा पूर्ण केल्या आणि राॕस टेलर व स्टीफन फ्लेमिंग यांच्यानंतर हा टप्पा गाठणारा तो पहिला किवी फलंदाज ठरला.

विल्यम्सनची आता 24 कसोटी शतकं असून 13 मायदेशात आहेत. न्यूझीलंडमध्ये एका फलंदाजाने केलेली ही सर्वाधिक कसोटी शतकं आहेत. याशिवाय चार द्विशतक करणारा तो केवळ दुसरा (पहिला ब्रेंडन मॕक्क्युलम) किवी फलंदाज ठरला. न्यूझीलंडसाठी त्याने सर्वात जलद 7 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

त्याच्याप्रमाणेच न्यूझीलंडसाठी चार द्विशतके करणाऱ्या ब्रेंडन मॕक्क्युलमने म्हटलेय की, माझ्या मते केन जगात बेस्ट आहे. आणि त्याला बेस्ट म्हणण्यात जगातील इतर आघाडीच्या खेळाडूंचा काही अपमान आहे असे नाही. माझ्यासाठी त्याने स्वतःच्या फलंदाजीशिवाय न्यूझीलंड क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाचे फार वेगळे आणि महत्त्वाचे स्थान आहे. त्याने इतरांनाही आपल्याला सौबत घेतलेय आणि त्यांना चांगली कामगिरी करण्यास प्रेरीत केले आहे. हे एका चांगल्या खेळाडूचेच नाही तर चांगल्या कर्णधाराचे लक्षण आहे. आणि या बहुआयामी योगदानामुळेच तो माझ्यासाठी ‘दी बेस्ट’ आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये आता 200 पेक्षा अधिक धावांच्या खेळी करणारे फलंदाज असे…
12- डॉन ब्रॕडमन
11- कुमार संघकारा
9- ब्रायन लारा
7- महेला जयवर्धने, वाॕली हॕमंड, विराट कोहली
6- विरेंद्र सेहवाग, जावेद मियांदाद, युनूस खान, रिकी पोंटींग, सचिन तेंडुलकर, मार्व्हन अट्टापटू,
5- अॕलीस्टर कूक, ग्रॕमी स्मिथ, राहुल द्रविड

4- केन विल्यम्सन, मायकेल क्लार्क, लेन हटन, हाशिम आमला, झहीर अब्बास, ब्रेंडन मॕक्क्युलम, ग्रेग चॕपल, सुनील गावसकर, गाॕर्डन ग्रिनीज, मोहाम्मद युसूफ

केन विल्यम्सनची द्विशतकं

238 – वि. पाकिस्तान, ख्राईस्टचर्च- 2021
251- वि. वेस्ट इंडिज, हॕमिल्टन- 2020
200- वि. बांगलादेश, हॕमिल्टन- 2019
242- वि. श्रीलंका, वेलिंग्टन- 2015

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER