‘कंबाला’ निशांतने मोडला श्रीनिवासचा विक्रम

- चौघांनी टाकले उसेन बोल्टला मागे !

नवी दिल्ली : रविवारी वेणूर भागात झालेल्या रेड्यांच्या ‘कंबाला’ शर्यतीत निशांत शेट्टीने रेड्यांच्या जोडीसोबत धावताना ९.५१ सेकंदात १०० मीटर अंतर पार केले. काही दिवसांपूर्वी श्रीनिवासच्या नावे (९. ५५ सेकंड) हा विक्रम झाला होता.

कर्नाटक राज्यात रेड्यासोबत शेतामध्ये पळण्याच्या शर्यतीत श्रीनिवास गौडा हा तरुण ९.५५ सेकंदात १०० मी. धावल्यानंतर देशभरात सोशल मीडियावर तो चर्चेत आला. प्रसारमाध्यमांनी श्रीनिवासला भारताचा उसेन बोल्ट म्हटल होत. उसेन बोल्ट हा ऑलम्पिक मधील १०० मीटर धावण्याच्या शर्यतीतल सुवर्णपदक विजेता आहे. त्याने हा विश्व विक्रम ९. ५८ वेळेची नोंद करून केला आहे.

शशी थरुर, आनंद महिंद्रा यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी सोशल मीडियावर श्रीनिवासचं कौतुक करत, केंद्रीय क्रीडा मंत्र्यांना श्रीनिवासला ऑलिम्पिकसाठी मदत करण्याचं आवाहन केले होते. आणि काही दिवसांतच याच कंबाला शर्यतीत निशांत शेट्टी नावाच्या तरुणाने श्रीनिवासचा विक्रम मोडला आहे.

श्रीनिवासच्या कामगिरीची दखल घेत, केंद्रीय क्रीडा मंत्रि किरेन रिजिजू यांनी त्याच्यासाठी ‘साई’ (Sports Authority of India) मध्ये चाचणीची व्यवस्था केली होती. मात्र श्रीनिवासने मला अ‍ॅथलिट बनण्यात रस नाही, असे सांगून पारंपरिक कंबाला शर्यतच खेळणार असल्याचे सांगितले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या हस्ते श्रीनिवासचा सत्कार करण्यात आला होता.

आता, वेणूर भागात झालेल्या कंबालाच्या आयोजकांनी सांगितले की, निशांत शेट्टीसोबत इरुवाथुर आनंद आणि अकेरी सुरेश शेट्टी (दोघेही ९. ५७ सेकंद) आणि श्रीनिवास गौड़ा (९. ५७ सेकंद) हे देखील १० सेकंद पेक्षा कमी वेळेत १०० मीटर अंतर धावले आहेत!