कॉंग्रेसचा किंग मेकर म्हणून प्रसिद्ध पावलेल्या कामराज यांनी दोनवेळेस पंतप्रधान पद नाकारलं होतं!

Maharashtra Today

“तुम्ही ते पद स्वीकरता कामा नये, ज्याला तुम्ही पुर्ण क्षमतेनं न्याय देऊ शकत नाही” हे शब्द होते के. कामराज (k.kamaraj)यांचे. ज्यांना आजही त्यांच्या सिद्धांत अधारित राजकारणाचे दाखले दिले जातात. राजकारण नेहमी संबध बनत बिघडत असतात. के. कामराज यांना या गोष्टीतला सर्वात कुशल राजकारणी म्हणलं जातं. भारतीय राजकारणतल्या अनेक महत्त्वपुर्ण घटनाचे ते साक्षीदार आहेत. तर काही घटना घडवून आणण्या मागे त्यांचा हात. ज्यामुळं अधुनिक भारताच्या राजकीय इतिहासाचा चेहरा मोहरा बदलला.

नेहरुंनंतर कॉंग्रेसची धुरा सांभाळली

के. कामराज हे भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यसेनानी राहिलेले कामराज भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते होते. ते संविधान सभेचे सदस्य होते. १९५४ ते १९६३ दरम्यान तमिळनाडूचे मुख्यमंत्रीपद व जवाहरलाल नेहरूंच्या(Jawaharlal Nehru) मृत्यूनंतर पक्षाची धुरा सांभाळणार्‍या कामराजांनी १९६७ साली इंदिरा गांधींनी (Indira Gandhi)कॉंग्रेस (आय) हा नवा पक्ष स्थापन केल्यानंतर उर्वरित कॉंग्रेस पक्षाचे नेतेपद सांभाळले. त्यांच्या मृत्यूनंतर १९७६ साली भारत सरकारने त्यांना भारतरत्‍न पुरस्कार दिला. तमिळनाडूमध्ये प्रचंड लोकप्रियता कमावलेल्या कामराज ह्यांच्या आदराप्रित्यर्थ चेन्नईच्‍या अंतर्देशीय टर्मिनलला त्यांचे नाव देण्यात आलंय.

३ हजार दिवसांचा तुरुंगवास

के. कामराज यांचा जन्म १५ जुलै १९०३ साली तामिळनाडूच्या विरदुनगरमध्ये झाला. व्यावसायिक पार्श्वभूमि असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या के. कामराज यांचं पुर्ण नाव होतं ‘कुमारास्वामी कामराज.’ तरुणपणातच त्यांनी भारतीय स्वातंत्रता आंदोलनात सहभाग घेतला. जालिनवाला बाग गोळीबारानंतर त्यांनी स्वातंत्र्यासाठी सर्वस्वपणाला लावण्याची शपथ घेतली होती. गांधी विचारांचा त्यांच्यावर भरपूर प्रभाव होता. गांधींनी जेव्हा असहकार आंदोलनाची हाक दिली तेव्हा के. कामराज फक्त १८ वर्षांचे होते.

त्यांनी १९३०च्या मीठाच्या सत्याग्रहातही सहभाग नोंदवला. तेव्हाच पहिल्यांदा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यांच्या कारकिर्दीत ६ वेळा त्यांना तुरुंगवास झाला. तुरुंगावस झाल्यानंतर त्यांना महानगर पाहिलकेचं महापौर करण्यात आलं होतं. पदाबद्दल कोणतीच आसक्ती नसल्यामुळं त्यांनी तात्काळ राजीनामा दिला.

‘कामराज प्लॅन’

स्वातंत्र्यानंतर कामराज १३ एप्रिल १९५४ ला मद्रास राज्याचे मुख्ममंत्री बनले. त्यांच्या शासन काळात त्यांनी शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी भरघोस योगदान दिलं. मद्रास राज्यातल्या गाव खेड्यात प्रथामिक शाळा आणि तालुकास्तरावर मोठ्या प्रमाणात शाळा उभ्या करण्याचं काम कामराज यांनी केलं. मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या योजनेचा पाया घालण्याचं श्रेय कामराज यांना जातं.

पंतप्रधान नेहरुंच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी नेहरुंना राजीनामा देऊन जनतेत फिरण्याचा, जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचता येईल आणि कॉंग्रेस अधिक मजबूत होईल असा त्यांचा विचार होता. नेहरुंना हा सल्ला पटला नाही परंतू त्यांच्या कॅबिनेटच्या सहा मंत्र्यांनी राजीनामा देत या सल्ल्यावर काम करायला सुरुवात केली.

कॉंग्रेस पक्षाला याचा सर्वाधिक फायदा झाला. सामान्यांच्या सुख दुखाची जाण असलेली पार्टी म्हणून कॉंग्रेसकडे पाहिलं गेलं. यामुळं भारतीय राजकारणाला नवं सकारात्मक वळण प्राप्त झालं. पुढं चालून कामराज यांचा सल्ला ‘कामराज प्लॅन’ म्हणून देशभर प्रसिद्ध झाला.

इंदिरांना बनवलं प्रधानमंत्री

स्वातंत्र्य प्राप्तीच्या १६ वर्षानंतर नेहरुंनी देशाचं सारथ्य केलं. यानंतर १९६४ साली नेहरुंचे निधनं झाले. यानंतर सर्वात मोठा प्रश्न होता देशाची धुरा कोण सांभाळेल? कॉंग्रेसमध्ये अंतर्गतवादाला तोंड फुटलं. रिकाम्या जागेवर अनेकांनी दावा ठोकला. यात मोरारजी देसाई आणि शेतकऱ्यांचे नेते लालबहादूर शास्त्री यांचं नाव सामाविष्ट होतं.

मोरारजी आणि लालबहादूर शास्त्रींसारखे दिग्गज नेते कॉंग्रेसमध्ये असताना इंदिरांना पंतप्रधान बनवणं शक्य नव्हतं. कामराज यांच्या गटानं जो सिंडीकेट म्हणून ओळखला जायचा त्यांनी शास्त्रींच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि मोरारजींचा पत्ता कट करत शास्त्री पंतप्रधान बनले. पुढं १९६६ साली लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू झाला. यावेळी मोरारजी देसाईंना कसल्याही परिस्थीतीत पंतप्रधान पदाची खुर्ची जिंकायची होती.

यानंतर मतदानातून पंतप्रधान निवडण्याची तयारी झाली. पुन्हा कामराज यांनी इंदिरांच्या बाजूनं सर्व ताकद पणाला लावली. यात ३३५ खासदारांचे समर्थन प्राप्त केल्यानंतर इंदिरा देशाच्या पंतप्रधान बनल्या. कामराज यांनी कधीच पंतप्रधान पदाची लालसा धरली नाही. शास्त्री आणि इंदिरा दोघांना पंतप्रधान करण्यात मोठी भूमिका निभावणाऱ्या कामराज यांना स्वतःला पंतप्रधान बनवण्यात काहीच परिश्रम घ्यावे लागले नसते. “ज्या नेत्याला व्यस्थीत हिंदी आणि इंग्रजी येत नाही तो पंतप्रधान पदाच्या पात्र नाही” असं म्हणत त्यांनी स्वतःच स्वतःच्या नावाची दावेदारी संपवली होती.

कॉंग्रेसच्या प्रत्येक चढउतारात कामराज यांनी महत्त्वपुर्ण भूमिका निभावली. केंद्राच्या राजकारणातून आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातून त्यांनी माघार घेतली. ते तामिळनाडूला परतले. २ ऑक्टोबर १९७५ साली त्यांचा हृदय विकाराने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना भारत रत्न या सर्वोच्च नागरी सन्मानानं सन्मानित करण्यात आलं.

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button