ओंकार ग्रुपचे कमल गुप्ता आणि बाबुलाल वर्मा यांना शनिवारपर्यंत ईडी कस्टडी

ED - Babu Lal Verma - Kamal Gupta

मुंबई : मुंबईचे (Mumbai) सुप्रसिद्ध आणि मोठे बांधकाम व्यावसायिक, ओंकार ग्रुपचे (Omkar Group) अध्यक्ष कमल गुप्ता (Kamal Gupta) आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा (Babu Lal Verma) याना ईडीने (Enforcement Directorate) अटक केली आहे. त्यांना शनिवारपर्यंत ईडीची कस्टडी देण्यात आली आहे.

हे प्रकरण २२ हजार कोटी रुपयांच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) व्यवहारातील फसवणुकीचे आहे. ओंकार ग्रुपवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी येस बँकेकडून ४५० कोटींच्या गुंतवणुकीसह अनेक बँकांकडून हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे.

दरम्यान, ओंकार ग्रुपने २२ हजार कोटी रुपयांच्या अनियमिततेचा आरोप नाकारला आहे. औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेत (ईडब्ल्यू) दाखल केलेल्या एफआयआरशी संबंधित ४१० कोटी रुपयांच्या एफआयआरशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी आणि बुधवारी इडीने ओंकार ग्रुपच्या १० ठिकाणांवर धाडी टाकल्या.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी शोध घेतल्यानंतर संबंधित संस्थेची कार्यालये आणि गुप्ता-वर्मा यांच्या निवासस्थानांमधून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराशी निगडित अनेक कागदपत्रे सापडली आहेत. २७ जानेवारी रोजी दुपारी बाबूलाल वर्मा आणि कमल गुप्ता यांची ईडीने चौकशी केली. हे दोघेही तपासात सहकार्य करत नव्हते, त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.

ओंकार ग्रुप आणि गोल्डन एज ग्रुप ऑफ कंपनीजच्या विरोधात २०१९ ला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आरोप होता की, या दोन कंपन्यांनी झोपडपट्टीवासीयांच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करुन मोठा घोटाळा केला.

ओंकार ग्रुपच्या अधिकाऱ्यांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या विकासासाठी लेटर ऑफ इंटेन्ट (एलओआय) मिळवण्यास मदत केल्याचा आरोपही याचिकेत केला आहे. या एलओआयचा उपयोग विविध बँकांकडून सुमारे २२ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी केला जात असल्याचा आरोप आहे.

मुंबईतील सर्वात मोठी रिअल इस्टेट संस्था ओंकार ग्रुप ही मुंबई उपनगरातील प्रिमियम रियल इस्टेट प्रोजेक्टमध्ये काम करते. ही संस्था वरळी येथील प्रतिष्ठित ओंकार १९७३ प्रोजेक्टसाठी ओळखले जाते. या इमारतीत अनेक बड्या व्यक्तिंनी फ्लॅट विकत घेतले आहेत. ओंकार ग्रुप ही एसआरए प्रकल्पातील सर्वात मोठी रियल इस्टेट कंपनी आहे.

ओंकार बिल्डरविरोधात तक्रार करणाऱ्या महेंद्र सुराना यांचे वकील यश आनंद सिंह यांचा दावा आहे की, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हा २२ हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER