१७ कोटीची फसवणूक करून कलकाम रियल इन्फ्राने गाशा गुंडाळला

रत्नागिरी/प्रतिनिधी :  सुमारे चार हजार ग्राहकांची फसवणूक करत कलकाम रियल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंपनीने गाशा गुंडाळल्याने आठ जणांनी पोलीस स्थानकात तक्रार अर्ज दाखल केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. ग्राहकांकडून पैसे घेऊन कलकाम रियल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या

कंपनीने गुंतवणूक केली आहे. मात्र, सदर कंपनीने गुंतवलेले पैसे परत केले नसून कमिशनही दिलेले नाही. कंपनी चेअरमन विष्णू दळवी, संचालक विजय सुपेकर, सुनील वांद्रे, प्रकल्प संचालक महेंद्र संसारे, प्रशासकीय अधिकारी दिलीप शिंदे यांनी आम्हा सर्वांची सुमारे १७ कोटी ३३ लाख रूपयांची फसवणूक केलेली आहे. फसवणूक झाल्यानंतरही संबंधित दुर्लक्ष करीत असल्याने २६ जानेवारी रोजी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे या निवेदनात नमूद केले आहे. कंपनीचे कार्यालय हे चिपळुणात होते. गुंतवणूक केलेल्या सुमारे ४ हजाराहून अधिकजणांची फसवणूक झाली आहे. बुधवारी आठजणांनी आपली फसवणूक झाल्याचा तक्रार अर्ज येथील पोलीस स्थानकात दिला आहे. यामध्ये चिपळूण, गुहागर आणि दापोलीतील तक्रारदारांचा समावेश आहे.