कलबुर्गी पोलिसांकडून ‘त्या’ वक्तव्यावरून वारिस पठाण यांना नोटीस

Waris Pathan-Notice

कलबुर्गी : एआयएमआयएमचे प्रवक्ते आणि भायखळ्याचे माजी आमदार वारिस पठाण यांना वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कलबुर्गी पोलिसांकडून नोटीस पाठविण्यात आली असून 29 फेब्रुवारी रोजी त्यांना तपास अधिका-यासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

आम्ही वारिस पठाण यांना त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल नोटीस बजावली असल्याचे कलबुर्गीचे पोलिस आयुक्त एम एन नागराज यांनी याबात माहिती देताना सांगितले.

कर्नाटकमधील गुलबर्गा येथील सभेत बोलताना, वारीस पठाण यांनी आम्ही “१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा“ असे धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. कलबुर्गी पोलिसात त्यांच्याविरोधात गुन्हा देखील नोंद करण्यात आला.

दिल्लीतील हिंसाचाराला एमआयएमचे नेते वारिस पठाण कारणीभूत-शिया वक्फ बोर्ड

हक-ए-हिंदुस्थान मोर्चा या मुस्लीम संघटनेकडूनही वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांचा शिरच्छेद करा, ही कृती करणाऱ्याला आम्ही ११ लाखांचे इनाम देऊ अशी घोषणा केली गेली. वारीस पठाण देशद्रोही आहेत असे हक-ए-हिंदुस्थानच्या राष्ट्रीय संयोजक तमन्ना हाश्मी यांनी म्हटले आहे.

एआयएमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देखील वारीस पठाण यांच्यावर कारवाई केलेली आहे. वारीस पठाण यांना माध्यमांवर बोलण्यास पक्षाकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता पक्ष परवानगी देत नाही तोपर्यंत वारीस पठाण हे कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करू शकणार नाहीत.

दरम्यान माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असून माझे ते वक्तव्य हिंदूविरोधी नसल्याचे वारिस पठाण यांनी म्हटले आहे. आपली बाजू माध्यमांसमोर मांडताना ते म्हणाले, मला आणि माझ्या पक्षाला बदनाम केले जात आहे. 100 कोटी भारतीयांच्या विरोधात नाही तर 14 कोटी मुस्लिम हे 100 नेत्यांच्या विरोधात असल्याचे आपण बोललो होतो. ते 100 लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा यांच्यातील असून त्यात काही पत्रकारही असल्याचे आपण म्हटल्याचे पठाण म्हणाले.