मराठी चित्रपट महामंडळात राजकारणाला कलाटणी : अध्यक्ष विरोधात अविश्वास ठराव मंजूर

Meghraj Bhosale

कोल्हापूर : चित्रपट व्यावसायिकांची सर्वोच्च संस्था समजल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात गेले काही महिने धुमसत असलेल्या राजकारणाने गुरुवारी वेगळीच कलाटणी घेतली. अध्यक्ष मेघराज भोसले यांच्यावर मनमानी व घटनाबाह्य कामकाजाचा आरोप करत संचालकांनी आठ विरुद्ध चार मतांनी अविश्वास ठराव मंजूर केला. अध्यक्ष भोसले यांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या आठपैकी सात संचालक हे सत्तारुढ गटाचे आहेत.

दरम्यान मेघराज भोसले यांनी ‘माझ्या विरोधात मांडलेला हा ठराव बेकायदेशीर आहे. यासंबंधी कोर्टात दाद मागू. तसेच अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही’ अशी भूमिका घेतली आहे. चित्रपट महामंडळ गेल्या काही महिन्यात या ना त्या कारणानी सतत चर्चेंत आहे. महामंडळातील धनादेश चोरी प्रकरण, सभासदांना मिळालेली साखर काही जणांनी घराकडे नेणे या प्रकारामुळे महामंडळाचे धिंडवडे निघाले होते. चित्रपट महामंडळाची निवडणूक सहा महिन्यावर येऊन ठेपल्याने आरोप प्रत्यारोप वाढले होते. सत्तारुढ गटातच अध्यक्ष भोसले विरुद्ध उपाध्यक्ष धनाजी यमकर, रणजित जाधव असे चित्र निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी, संचालक मंडळाची बैठक बोलावली होती. दसरा चौक परिसरातील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक झाली. बैठकीला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच संचालक रणजित जाधव यांनी अध्यक्ष भोसले यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला. या ठरावाला अध्यक्ष भोसले यांच्या बाजूकडील संचालक संजय ठुबे, चैत्राली डोंगरे,विजय खोचीकर व खजानिस शरद चव्हाण यांनी आक्षेप घेतला. अध्यक्ष भोसले यांनी अशा पद्धतीने अविश्वास ठराव मांडता येणार नाही असे सांगितले. यावरुन संचालक मंडळात वादावादी झाली. बैठकीत सत्तारुढ गटाच्या अनेक संचालकांनी अध्यक्ष भोसले यांच्या कामकाजाचे वाभाडे काढले. महामंडळाचे एकूण चौदा संचालक आहेत. त्यापैकी सातारा जिल्ह्यातील अण्णा देशपांडे यांचे नुकतेच निधन झाले आहे. उर्वरित तेरा संचालकांपैकी आठ जणांनी अध्यक्ष भोसले यांच्या विरोधात मांडलेल्या ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतला.

महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, संचालक रणजित जाधव, सतीश रणदिवे, सुशांत शेलार, पितांबर काळे, निकिता मोघे आणि विरोधी गटातून निवडून आलेले संचालक सतीश बीडकर अशा आठ जणांनी अध्यक्षांच्या कामकाजाला विरोध करत अविश्वास ठरावाच्या बाजूनी मतदान केले. अध्यक्ष या नात्याने भोसले यांना मतदान करता आले नाही. तर भोसले यांच्या बाजूने संजय ठुबे, चैत्राली डोंगरे, शरद चव्हाण, विजय खोचीकर यांनी मतदान केले. आठ विरुद्ध चार मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER