चांगला प्रोजेक्ट असल्यास काजोलची गोविंदाबरोबर काम करण्याची इच्छा

Kajol - Govinda

बॉलिवुडमध्ये (Bollywood) जेव्हा एखादा नायक यशाच्या शिखरावर असतो तेव्हा प्रत्येक नायिका त्याच्याबरोबर काम करण्यास उत्सुक असते. नायक यशस्वी होत असल्याने त्याच्यासोबत काम केल्यास आपणही यशाच्या शिखरावर पोहोचू असे नायिकांना वाटत असते. 90 च्या दशकात गोविंदा (Govinda) बॉलिवुडचा सुपरस्टार होता. त्याचा जवळ जवळ प्रत्येक सिनेमा हिट होत असे. एकाच वेळेस तो 14 ते 15 सिनेमात काम करीत असे आणि तीन-तीन शिफ्टमध्ये त्याला काम करावे लागत असे. निर्मातेही त्याच्या वेळेनुसार शूटिंगची योजना आखत असत. यशाच्या शिखरावर असताना गोविंदाने प्रत्येक नायिकेबरोबर काम केले होते. करिश्मा आणि रविनाबरोबर त्याची जोडी खूपच लोकप्रिय होती. नंतर तर त्याने ऐश्वर्या आणि कॅटरीनासोबतही काम केले होते. पण त्याच काळात यशस्वी असलेल्या काजोलबरोबर (Kajol) मात्र त्याने एकही सिनेमा केला नव्हता. काजोलने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गोविंदासोबतच्या सिनेमाबाबत बोलताना, चांगला प्रोजेक्ट असेल तर गोविंदाबरोबर काम करायला आवडेल असे म्हटले आहे.

काजोलही बॉलिवूजची हिट नायिका होती. अगदी जॅकी श्रॉफपासून ते सलमान, शाहरुख,, आमिरपर्यंत सगळ्या नायकांबरोबर तिने काम केलेले आहे. काजोलने सगळ्यात जास्त काम शाहरुख खानसोबतच केले आहे. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. मुलाखतीत तिला गोविंदाबरोबर काम का केले नाही असे विचारले असता, काजोलने सांगितले, प्रत्येक काळात यशस्वी नायक आणि यशस्वी नायिकेची जोडी जमवली जाते. आम्हा दोघांना घेऊन ‘जंगली’ नावाच्या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन राहुल रवैल करणार होते. सिनेमासाठी आम्ही दोघांनी फोटोशूटही केले होते. परंतु सुरु होण्यापूर्वीच काही कारणामुळे सिनेमा डब्यात बंद झाला. त्यानंतर मात्र आम्हा दोघांंना एकत्र आणण्याचा प्रयत्न कोणत्याही निर्मात्याने केला नाही.

गोविंदाबरोबर मी काम केले नाही, पण तो एक खूप चांगला अभिनेता आहे असे सांगून काजोल म्हणाली, मी नेहमी म्हणत असते की, लोकांना हसवणे खूप कठिण काम आहे. मात्र गोविंदा ते काम खूपच चांगल्या प्रकारे आणि सहज करतो. गोविंदाबरोबर काम करण्याची इच्छा आहे का? असे विचारता काजोल म्हणाली, भविष्यात काय होईल ते आत्ताच सांगता येत नाही. पण गोविंदा एक चांगला अभिनेता असून जर काही चांगला प्रोजेक्ट तयार झाला तर आम्ही अवश्य एकत्र काम करू.

गोविंदा आणि काजोल अजूनही सिनेमात काम करीत असल्याने आणि काजोलची इच्छा पाहून या दोघांना घेऊन एखाद्या निर्मात्याने सिनेमा सुरु करण्याची घोषणा केल्यास आश्चर्य वाटणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER