कोल्हापूर : कागल ते सातारा रस्ता होणार महापदरी

sanjay Mandlik

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते सातारा रस्त्याच्या महापदरीकरण कामांची निविदा प्रसिद्ध करून लवकरात लवकर कामे सुरू करावीत, अशी सूचना खासदार संजय मंडलिक यांनी केली. दवगड ते निपाणी रस्त्याचे कामही तत्काळ सुरू करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. केंद्र सरकार पुरस्कृत विविध योजनांची अंमलबजावणी, प्रगती व सनियंत्रणची आढावा बैठक खासदार मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात शुक्रवारी झाली.

पुरामुळे ज्या भागातील रस्त्यांवर पाणी येऊन वाहतूक बंद होते, त्या ठिकाणी रस्त्यांची उंची वाढवण्यात यावी, तसेच पूरग्रस्त भागांतील लोकांना घरे देण्यासाठी केंद्र सरकारचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही खासदार मंडलिक यांनी सांगितले. प्रारंभी त्यांनी प्रधानमंत्री आवास शहरी व ग्रामीण योजनांचा आढावा घेतला. खासदार मंडलिक म्हणाले, गांधीनगरमध्ये पोस्ट ऑफिसच्या इमारतीसाठी पाठपुरावा करावा. विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्यासाठी विमान प्राधिकरणास आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात.

अतिग्रे इचलकरंजी रेव्ह मार्गावरील पुलाच्या कामाबाबतचा प्रस्ताव तसेच भुयारी रेल्वे मार्गाबाबतचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने सादर करावा. बीएसएनएल मोबाईलची रेंज गगनबावडा, भुदरगड, राधानगरी या भागामध्ये येत नाही. तिथे टॉवर उभे करावेत. यावळी समिती सहअध्यक्ष तथा खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषद अध्यक्ष जबर पाटील, आ. प्रकाश आवाडे, आ. प्रकाश आबिटकर, आ. राजेश पाटील, आ. चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत दसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल प्रकल्प संचालक अजयकुमार माने आदी उपस्थित होते.