प्रदूषणमुक्तीची काडसिद्धेश्वर महाराज यांची ” किचन गार्डन ” संकल्पना

Kadsiddheshwar Maharaj

कोल्हापूर : कणेरीवाडी येथील प्रसिद्ध प्राचीन सिद्धगिरी मठाच्यावतीने अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आता ” किचन गार्डन ” चा महत्त्वाकांक्षी प्रयोग करण्यात येत आहे. याद्वारे विषमुक्त व घरच्याघरी दैनंदिन लागणा-या भाज्यांचे उत्पादन करण्यासह प्रत्येकाला स्वयंपुर्ण व आत्मनिर्भर करण्याचा उद्देश आहे. नागरिकांच्या पुढाकारानेच कचरा- मुक्त व दुर्गंधीमुक्त घर आणि आपला परिसर करण्याची संकल्पनाही प्रत्यक्षात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर शहरात शंभर नागरिकांच्या घरी ” सेंद्रिय किचन गार्डन ” तर कायम दुर्गंधी असलेल्या दोन ठिकाणी हे प्रयोग करण्यात येत आहेत. कोल्हापुरचा हा पॅटर्न पुढे देशभरात वाढविण्याचा संकल्पही केंद्रीय कृषि विज्ञान विभागामार्फत करण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून कृषिक्षेत्रात अनेक बदल होत आहेत. उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा वारेमाप वापर आणि त्यातून लोकांच्या आरोग्यावर होत असलेले गंभीर परिणाम आजपर्यंत दिसून आले आहेत. त्यामुळे प्राचीन परंपरेनुसार नैसर्गिक पद्धतीने सेंद्रिय शेती उत्पादन करण्याचा कल आता वाढत आहे. करवीर तालुक्यातील कणेरीवाडी येथील प्राचीन सिद्धगिरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या दुरदृष्टी आणि मार्गदर्शनातुन यामध्ये अनेक नवनवीन प्रयोग लक्षवेधी ठरले आहेत. लहान शेतकऱ्यांसाठी लखपती शेतीचे प्रयोग सिद्धगिरीने यशस्वी करून दाखवले आहेत. याची दखल खुद्द केंद्र सरकार आणि केंद्रीय कृषी विज्ञान विभागाकडुन घेण्यात आली आहे.

कोरोना संसर्ग आणि लाॅकडाऊनच्या पार्श्र्वभूमीवर कित्येकांचे घरचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यामुळे कुटुंबांना टप्प्या टप्प्यटप्प्याने स्वयंपुर्ण बनविण्यासाठी घरोघरी ” सेंद्रीय किचन गार्डन ” ची संकल्पना करण्यात येणार आहे. विषमुक्त भाजी-पाल्याचे घरोघरी उत्पादन आणि कुटुंबाच्या आरोग्याला महत्त्व देण्यात आले आहे. सुर्यप्रकाश येईल, अशा वन बीएचके ते घराचे अंगण, गॅलरी, टेरेस आदी मोकळ्या जागेत, घरातील जुनी वापरात नसलेली भांड्यांचाही वापर करता येणे शक्य आहे. दररोज लागणा-या पालेभाजी, कंद वर्गीय, वेली वर्गीय भाजी, कडिपत्ता, कोथिंबीर, लिंबू जागा असेल तर केळीचे सुद्धा उत्पादन घेता येणार आहे. मधाची पेटीही ठेवता येईल.

वेली वर्गी मुळे टेरेसही तापण्याच्या समस्येतून मुक्त होणार आहे. विशेष म्हणजे सिद्धगिरी मठातर्फे यासाठी शेती तज्ज्ञाकडून मोफत मार्गदर्शन देण्यात येणार आहे. सेंद्रिय बी-बियाणे, खते, जीवामृत, औषध फवारणी ते तयार रोपांचाही मोफत पुरवठा करण्यात येणार आहे. भाजीपाल्यांचे उत्पादन अधिक झाल्यास ते खरेदीसुद्धा करण्याची तयारी आहे. अशा सेंद्रिय किचन गार्डनमुळे घरांघरांतील दैनंदिन भाजीपाला तसेच औषधांचाही खर्च कमी होऊन, बचत होणार आहे. काहींना विक्रीतुन फायदाही होणार आहे. तर घरांघरांतील कच-याचीही विल्हेवाट होऊन, कचरा प्रकल्पावर महानगरपालिकेचा होणारा कोट्यावधी रुपयांचा खर्चही वाचणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER