न्या.एन. व्ही.रमण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश

N. V. Ramana
  • मावळत्या सरन्यायाधीशांनी केली शिफारस

नवी दिल्ली : सरन्यायाधीश न्या. शरद अरविंद बोबडे (Sharad Bobde) यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून न्या. नुथलापती व्यंकट रमण (N. V. Ramana)यांच्या नावाची शिफारस सरकारकडे केली आहे. न्या. रमण हे सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांनंतरचे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत.

सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) न्यायाधीशांच्या नेमणुकीसाठी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पाच ज्येष्ठ न्यायाधीशांचे ‘कॉलेजियम’ नावांची शिफारस करते. परंतु सरन्यायाधीशपदासाठी असे करणे अनुचित होईल म्हणून सरन्यायाधीशांनीच आपल्या उत्तराधिकाºयाची शिफारस करण्याची प्रथा रुढ झाली आहे.  गेली ७० वर्षे, केवळ दोन अपवाद वगळता, सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशांना सरन्यायाधीश नेमण्याचा प्रघात पाळला गेला आहे.

सरन्यायाधीशांनी केलेली शिफारस बव्हंशी मान्य केली जाते. त्यामुळे न्या. बोबडे येत्या २३ एप्रिल रोजी सरन्यायाधीश पदावरून पायउतार झाल्यानंतर न्या. रमण यांची त्या पदावर नेमणूक होईल. ते देशाचे ४८ वे सरन्यायाधीश असतील. न्या. रमण एक वर्ष पाच महिने म्हणजे २६ ऑगस्ट, २०२२ पर्यंत सरन्यायाधीश पदावर राहतील.

मूळचे आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील असलले न्या. रमण १३ वर्षे तेथील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व काही काळ प्रभारी मुख्य न्यायाधीश होते. त्यानंतर १३ महिने दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राहिल्यानंतर फेब्रुवारी २०१४ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयावर नेमणूक झाली होती.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER