काम बंद ठेवून सुप्रीम कोर्टाची न्या. शांतनागोदर यांना श्रद्धांजली

supreme court judge justice mm shantanagoudar - Maharastra Today

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सर्व न्यायालयीन कामकाज एक दिवसासाठी पूर्णपणे बंद ठेवून न्या. मोहन एम. शांतनागोदर या आपल्या दिवंगत न्यायाधीशास आदरांजली वाहिली. न्यायालयापुढे सोमवारी ज्या प्रकरणांची सुनावणी व्हायची होती ती आता मंगळवारी होईल, असे न्यायालयाच्या प्रशासनाने एका नोटिसद्वारे जाहीर केले.

सरन्यायाधीश न्या. एन. व्ही. रमण यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांनी दोन मिनिटांचे मौन पाळून आपल्या या दिवंगत सहकाºयास श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी सरन्यायाधीश न्या. रमण म्हणाले की, सहकारी बांधवाच्या अकाली निधनाने आम्हाला अतीव दु:ख झाले. आम्ही दोन मिनिटांचे मौन पाळून न्या. शांतनागोदर यांना श्रद्धांजली वाहत आहोत.

सरन्यायाधीशांनी रविवारी न्या. शांतनागोदर यांच्या मुलाला फोन करून स्वत:च्या आणि सर्व न्यायाधीशांच्या वतीने शोकाकूल परिवाराचे सांत्वन केले होते. न्या. शांतनागोदर यांच्या निधनानंतर पहिली प्रतिक्रिया देताना सरन्यायाधीश न्या. रमण म्हणाले, न्या. शांतनागोदर लवकर व पूर्ण बरे होऊन पुन्हा न्यायासनावर स्थानापन्न होतील, अशी मला आशा होती. त्यामुळे त्यांचे निधन हा माझ्यासाठी धक्का आहे. त्यांच्या रूपाने मी एक मौल्यवान सहकारी गमावला आहे. गेल्या चार वर्षांत सर्वोच्च न्यायालयातील सहवासाने त्यांच्या कायद्याच्या  प्रगाढ ज्ञानाचा मला खूप  फायदा झाला.

अलाहाबाद, कर्नाटक, पंजाब व हरियाणा, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयेही न्या. शांतनागोदर यांच्या निधनामुळे सोमवारी बंद राहिली. राजस्थान, हिमाचल प्रदेश व पंजाब आणि हरियाणा या राज्यांमधील कनिष्ठ न्यायालयेही बंद राहिली. मात्र न्या. शांतनागोदर मूळचे जेथील होते ते कर्नाटक उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात येण्यापूर्वी ते जेथे मुख्य न्यायाधीश होते तेथे मात्र सुट्टी दिली गेली नाही. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी मिळून न्या. शांतनागोदर यांना श्रद्धांजली वाहिली.

बरेच दिवस आजारी असलेल्या न्या. शांतनागोदर यांचे गुरुग्राममधील मेदान्त इस्पितळात शुक्रवारी रात्री निधन झाले. ते लिंगायत समाजाचे होते. त्या समाजातील प्रथेनुसार व त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा दफनविधी त्यांच्या आईच्या दफनभूमीच्या शेजारी करण्यात आला. न्या. शांतनागोदूर फेब्रुवारी २०१७ पासून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होते व नियत वयोमानानुसार त्यांचा कालावधी मे २०२३ पर्यंत होता.

सुप्रीम कोर्टाची उन्हाळी सुट्टी एक आठवडा आधी

कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेचा जोर लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने उन्हाळी सुट्टी नियोजित वेळापत्रकाऐवजी एक आठवडा आधी सुरु करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाची उन्हाळी सुट्टी आता ७ मेपासून सुरु होईल व ती नेहमीपेक्षा आठवडाभर आधी संपून न्यायालयाचे नियमित कामकाज बहुधा २८ जूनपासून पुन्हा सुरु होईल. ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’, ‘सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन’ आणि ‘सुप्रीम कोर्ट अ‍ॅडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड्स असोसिएसन’च्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत सरन्यायाधीश न्या. एन. व्ही. रमण यांनी हा निर्णय घेतला, असे ‘अ‍ॅडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड्स असोसिएसन’चे  सचिव डॉ. जोसेफ अ‍ॅरिस्टॉटल यांनी समाजमाध्यमांत सदेश टाकून कळविले. ‘सु्प्रीम कोर्ट बार असोसिएशन’ने उन्हाळी सुट्टी लवकर सुरु करण्याची विंनती रविवारी केली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आवारातच ६० खाटांचे ‘कोविड उपचार केंद्र’ उभारण्यासाठी आणि ‘आरटी पीसीआर’ चाचण्या तसे लसीकरण करण्यासाठी सुयोग्य जागा उपलब्ध करून दिली जाईल, हेही सरन्यायाधीशांनी मान्य केल्याचे डॉ. अ‍ॅरिस्टॉटल यांनी म्हटले.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button