न्या. मनोज कुमार मुखर्जी यांचे वृद्धापकाळाने निधन

Manoj Kumar Mukherjee

कोलकाता : सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) माजी न्यायाधीश आणि अलाहाबाद व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्या. मनोज कुमार मुखर्जी (Manoj Kumar Mukherjee) यांचे कोलकाता येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात वकिली व्यवसायात नसलेले तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. न्या. मुखर्जी ९ जानेवारी १९९३ ते १४ डिसेंबर, १९९३ असे वर्षभर मुंबई उच्च न्यायालयाचे २७ वे मुख्य न्यायाधीश होते.

कोलकता उच्च न्यायालयात (Calcutta High Court) सोमवारी झालेल्या ‘फूल कोर्ट रेफरन्स’मध्ये न्या. मुखर्जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी मुख्य न्यायाधीश न्या. यांच्यासह उच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश उपस्थित होते. वर्षभरापूर्वी पर्यंत कलकत्ता उच्च न्यायालयात न्यायाधीश राहिलेले व आता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असलेले न्या. दीपंकर दत्ता हेही या श्रद्धांजली सभेस ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने हजर होते.

न्या. मुखर्जी १९७७ ते १९९१ अशी १४ वर्षे कोलकता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. नंतर ते एक वर्ष अलाहाबाद उच्च न्यायालयाचे व एक वर्षे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राहिले. डिसेंबर १९९३ ते डिसेंबर १९९८ अशी पाच वर्षे न्या. मुखर्जी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यानंतर लगेगच सन १९९९  मध्ये भारत सरकारने न्या. मुखर्जी यांना नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या बेपत्ता होण्यामागचे रहस्य उलगडण्यासाठी नेमलेल्या न्यायिक चौकशी आयोगाचे अध्यक्ष नेमले. जसे सांगितले जाते त्याप्रमाणे नेताजींना तैवानमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला नाही व जपानमधील एका बौद्ध मंदिरात जतन करून ठेवलेल्या अस्ती नेताजींच्या नाहीत, असा निष्कर्ष नोंदविणारा अहवाल न्या. मुखर्जी यांनी सादर केला. अर्थात राजकीयदृष्ट्या गैरसोयीचा असलेला तो अहवाल भारत सरकारने स्वीकारला नाही.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button