“…. जस्ट द वे यू आर ! “

Mansamvad -Just the way you are

सध्या सध्या पुन:प्रसारित होत असलेल्या ‘होणार सून मी या घरची’ (Honar Sun Me Hya Gharchi) या मालिकेतील नायिकेच्या, जान्हवीच्या तोंडी एक वाक्य नेहमी घातलंय, “मन मोठं असलं की सगळं काही सामावलं जातं!” कसं असतं हे मोठं मन ? आपण नेहमीच कुठल्याही गोष्टीकडे , घटनेकडे काही एका दृष्टिकोनातून बघतो. आपल्याकडे असते ‘एक समजुतीचे गाठोडे !’ त्या समजुतीनुसार प्रत्येक गोष्ट बघितली तर ती तशीच दिसते . यात्रेमध्ये ज्याप्रमाणे रंगीत चष्मे मिळतात लाल, पिवळे, त्यातून बघितलं हे सगळे जग त्याच रंगाचे दिसते. काल आपण बघितलं त्याप्रमाणे काही नाती कायम बदनाम झालेली असतात .

विनाकारण! सासू-सुनेचं नातं (Mother-in Law- Daugher in-law relation) हेही त्यातीलच एक! त्यामुळे समजुतीच्या गाठोड्यातील चिरगूट कधीच संपत नाहीत आणि ‘मन मोठं’ होण्याची संधीच राहात नाही. असाच एक अनुभव! शैलाताई (Shailatai) जुन्या वातावरणात वावरलेल्या .

ऋतुजा (Rutuja) त्यांची सून नावीन्याची ओढ असलेली. कपबशा पालथ्या घालायला त्यांना कामठीचं टोपलं सोपं ,सोयीस्कर वाटतं! याउलट ऋतुजाला ॲमेझॉनवरून मागितलेलं आकर्षक स्टॅन्ड आवडतं. मग ती त्यांच्याशी चर्चा करून, त्याचे फायदे वगैरे पटवून ,ते स्टँड मागवते. शैलाताईंना पण ठीक वाटते आणि नवीन स्टॅन्ड ओट्यावर विराजमान होते! बघा ! मुळात शैलाताईंना ते आवडलेलं आहे. पण ऋतुजाच्या लक्षात येतं, की अजूनही दररोज तो नवीन स्टॅन्ड अर्धवट रिकामा राहतो आणि तेच जुने टोपले परत सिंकजवळ आरूढ होते. त्यावर घासलेल्या भांड्यांचे पाणी उडते! हे बघून ऋतुजाचा पारा चढतो. स्टँडबद्दल मी त्यांना विचारलं, त्यांना पसंतही पडलं आणि तरी हेच !

“त्या मुद्दाम मला चिडवण्यासाठीच, त्या अशा गोष्टी परत परत करत रहातात !” असं ऋतुजाला वाटे आणि असेच हे प्रसंग वारंवार घडत राहात! आता मुलेही चांगली मोठी झालेली ! बरेचदा मुलेही खूप चांगली न्यायाधीश असतात. आईची चिडचिड बघून तिचा मुलगा अर्णव तिला समजावतो, “आई तुला वाटतंय तसं नाहीये ! आजी तुला चिडवण्यासाठी असं करत नाही ,तर तिची ती सवय आहे .ती सवयीप्रमाणे करते .तुला दुखावण्याचा तिचा हेतू नाही आणि आता तिच्या सवयीत ती बदल करू शकत नाही.” ऋतुजा रागातून बाहेर येते आणि आता त्यांच्या भूमिकेत जाऊन विचार करते.

आपल्याही काही अशा सवयी आहेत. चादरीच्या घड्या केल्यावर त्याची बंद बाजू आपण एका बाजूने करून ठेवतो, व्यवस्थित दिसण्यासाठी! पुढे माझ्याही या सवयी कदाचित मुलांना त्रास देतील आणि मी त्याला सोडू शकणार नाही. अनेक वर्षांची झालेली ही सवय, त्याही कदाचित मोडू शकत नसतील! हीच ती Empathy ! म्हणजे एखाद्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याच्या दृष्टिकोनातून विचार करणे. हेच ते ‘मन मोठं करणं’ मनाच्या या चौकटीतून किंवा खिडकीतून आपण जगाकडे बघतो त्याऐवजी मनाची कवाडे, दारे खुली करायची आणि स्वतः त्या समोरच्या जागी उभे राहून त्या परिस्थितीकडे बघण्याचा, त्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा! हीच तदनुभूती ! कुठलंही नातं समृद्ध करण्यासाठी हिचीच मदत होते .

मग हे सासू-सुनेचं नातं तरी अपवाद कसं असेल?

अर्थात हे दोन्ही बाजूंनी व्हायला हवं. मोठ्यांनीही नवीन पिढी ,त्यांचे नवीन विचार ,आवडीनिवडी, इच्छा-आकांक्षा , हौस मौज ,पद्धती विचारात घेताना ,घरात नव्याने येणाऱ्या मुलीची लाईफस्टाईल, अॅपियरन्स ,तिचे करिअरचे निर्णय घेण्याचा अधिकार , तिला असू द्यावा ! मिळणार्‍या संधी पकडण्याचे स्वातंत्र्य तिला पाहिजे . म्हणजेच “काही बाबतीत आपला आब राखून दोन पावले मागे येणे!” (ग्रॅसिफुली स्टेपिंग बॅक) हे केव्हाही डौलदार असणार! कारण पूर्वी मुली लहान होत्या . त्यांच्यावर संस्कारही तसेच आज्ञाधारकपणाचे होते. आज त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य बऱ्याच प्रमाणात असतं . त्यांच्या आवडीनिवडी, मतं पक्की झालेली असतात आणि त्या मानाने लवचीकता कमी पडते .

म्हणूनच अहंकाराची लढाई थांबवायची असेल तर “समोरची व्यक्ती जशी आहे तसा तिचा स्वीकार” उपयोगी ठरतो . (Unconditional acceptance of others) नातेसंबंध जोपासण्याची ही पहिली पायरी आहे! जी तदनुभूतीने ( empathi ) शक्य होते. मी दुसऱ्याला बदलू शकत नाही; पण मी माझ्या स्वभावाकडे डोकावून नक्कीच बघू शकते. स्वभाव बदलणे म्हणजे काय ? आपल्यातील एखादे वैशिष्ट्य आपल्याला तापदायक ठरते, त्याचे वाईट परिणाम आपण भोगतो. उदाहरणार्थ, धांदरट स्वभाव! एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार करून घोटाळा करणे किंवा अनावश्यक हालचालींचे जास्त प्रमाण , महत्त्वाच्या गोष्टींचा पडणारा विसर, अनेक कामे अर्धवट आणि अपूर्ण राहणे. इ.शोधणे. परंतु याबाबत डॉ. आनंद नाडकर्णी ,(आयपीएच ठाणे) हे म्हणतात , “बदलाची इच्छा असावी, हेका नसावा .प्रत्येक वेळी, प्रत्येक व्यक्तीचे शंभर टक्के समाधान करण्याचा अट्टहास नसावा.

इतरांना न दुखवण्याचा प्रयत्न करावा; पण अगदी बिनचूक व आदर्श असण्याचा आग्रह नसावा.” म्हणूनच माझ्यात जसे दोष आहेत तसेच समोरच्यातही असू शकतात हे समजून, जमेल तेवढे स्वतःला बदलणे; पण आपण सगळ्याच बाबतीत सगळ्यांना खूश करू शकत नाही हेही लक्षात ठेवणे सोपे!मग नक्कीच म्हणता येते की, “मन मोठं केलं की सगळं काही सामावलं जातं !”जेनिफर रीड ही थॉर्न यांची ‘जस्ट द वे यू आर’ ही गोष्ट खूप छान आहे .

लेखक सांगतो, त्याचा मार्क नावाचा मित्र, एक प्रेझेंटेशन सादर करत असतो. त्या वेळी एक स्त्री येऊन म्हणते की, तुमच्या प्रेझेंटेशनसाठी माझ्या मुलाचे संगीत वापरू शकता . आणि ज्या वेळेला ती त्याचे नाव बिली जोएल आहे असे सांगते आणि एका विशिष्ट गाण्याची मागणी करते, त्या वेळेला मित्राला धक्का बसतो. बिली लहान असताना त्याला सगळ्यांपेक्षा वेगळे काहीतरी व्हायचे होते. कारण तो सगळ्यांपेक्षा ठेंगणा होता.

घरीदारी, मैदानावर सर्वत्र मुले त्याला खूप चिडवत . तो नाराज होऊन घरी येई व कुरकुर करी! आईचा मात्र यावर विश्वास बसत नसे; कारण तिच्या दृष्टीने तो परिपूर्ण होता. तो जेव्हा कुरकुर करी, तेव्हा आई त्याला म्हणे , “काळजी करू नकोस. लोकांच्या म्हणण्याला विशेष महत्त्व नाही . कारण तू आत्ताच परिपूर्ण आहेस .तसाच मला आवडतो !” बिली जोएल मोठा होऊन जगाला मोहून टाकणारे संगीत व शब्दांचा धनी झाला. आईने प्रेमाने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरले, हेच त्याचे अवॉर्ड विनर गाणे ! ज्यांनी कोटी लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं ते त्याच्या आईचे शब्द आहेत !

” Don’t go changing,
To try to please me,I love you just the way you are ! “

मानसी फडके
एम ए मानसशास्त्र,
एम. एस. समुपदेशन आणि सायको थेरपी
एम .ए. मराठी

 

ह्या बातम्या पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER