जस्ट लिव्ह इट !

Just live it

हाय फ्रेंड्स ! दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचदा आपल्याला अशा व्यक्ती भेटतात की त्यांना खूप गोतावळा ,मित्रमंडळी आवडत असतात .सगळ्यांमध्ये मिसळायला आवडतं .एकत्र सण समारंभ साजरे करायला, ट्रीप एन्जॉय करायला पण आवडतं. अशा व्यक्ती या बोलघेवड्या ,मनमोकळ्या आणि हसतमुख अशा सगळ्यांना हव्याहव्याशा वाटतात .पण हे सगळं त्या दोन-तीन दिवस करू शकतात. नंतर काहीतरी त्यांना ते खटकते ,आवडत नाही आणि ते प्रसंग व त्या व्यक्तींशी त्यास जुळवून घेऊ शकत नाही .बरेचदा या व्यक्ती हे बाहेर दाखवत नाहीत ,पण त्यांचा अंतर्गत संघर्ष त्यांना स्वतःला देखील खूप त्रासदायक होऊन बसतो .म्हणजे इच्छा आणि प्रत्यक्ष जमण हा फरक त्यांच्या सोशल ओरिएंटेशन म्हणजे (सामाजिक कल किंवा आवड) आणि सोशल स्किल म्हणजे (सामाजिक कौशल्य )यांच्यामध्ये असतो. त्या समाजाभिमुख असतात .पण सामाजिक कौशल्य मात्र त्यांच्यात कमी असतात.

सामाजिक कल, आवड अनुभवातून बरेचदा जमत जाते. सामाजिक कौशल्य ही मात्र विशेष प्रशिक्षणातून बदलल्या जातात. समाजात मिळून-मिसळून राहताना, संवादाला खूप महत्त्व असतेच. इतरही बर्‍याच गोष्टी जबाबदार असतात. या महत्वपूर्ण संवाद कौशल्यामध्ये अडचणी येण्यामागे ,अनेक गृहीतक, समज-गैरसमज असतात. देहबोली ,चेहऱ्यावरील हावभाव, यावरून काढले जाणारे अर्थ, आवाजातील चढ-उतार, ठेहराव, चौकशी करण्याची पद्धत, टाळण्याची पद्धत ,बिटवीन दी लाईन यातून अनेक गोष्टी न बोलताही कळत जातात. हे खरं असलं तरी बरेचदा एखाद्याच्या बोलण्याचा, वागण्याचा आपण लावलेला अर्थ हा आपल्या आपल्या म्हणजे प्रत्येकाच्या वैयक्तिक दृष्टिकोनातूनच आलेला असतो. त्या त्या व्यक्तीचा स्वभाव, त्याची घडण ,व्यक्तिमत्व व विकासाची पार्श्वभूमी, आलेले अनुभव ,यातून प्रत्येक जण त्याकडे बघत असल्याने ,बरेचदा प्रत्येकाच्या मनात स्वतःबद्दल आणि स्वतःच्या परिस्थितीबद्दल काहीएक वाटत असतंच आणि त्याच बरोबर ,त्याचवेळी त्याला दुसऱ्याबद्दलही काहीतरी वाटत असतं.

“मला वाटलं म्हणून ! “अशा पालुपदाने सुरुवात होणारी अनेक वाक्य ,आपल्याला प्रसंगा प्रसंगातून ऐकू येतात. तुम्हालाही अशी वाक्य आठवत असतील .त्यामुळे तो केवळ एक संवाद किंवा प्रसंग न राहता त्याची “मोठ्ठी घटना” बनते. असे काही अनुभव आले आहेत का तुम्हाला ?

अशी बरीच वाक्य अनेकांकडून बोलली जात असतात .ती सरळ सोपी एक वाक्य ( sentence) म्हणून घेतली तर खूप सोपी आणि साधी असतात .परंतु तीच “मला असं वाटलं” ते वाटण लावून आपण इतकी मसालेदार बनवतो ही त्याचा” एक चमचमीत चटकदार” प्रसंग बनतो.

असे प्रसंग सोडवताना लक्षात येत की ,अरेच्चा ! हे तर डोंगर पोखरून अगदी उंदीर निघाला !” इतकी शुल्लक गोष्ट ,त्याला इतके मोठे रूप प्राप्त होऊ शकते. ते केवळ” मला वाटलं म्हणून” आणि “त्यात माझं काय चुकलं ?” या गृहितकाचा हस्तक्षेप असल्यामुळे ! याची काही एक-दोन उदाहरणे बघू ! या !

” सासू म्हणजे सारख्या सूचना असं म्हणतात. मला वाटतं माझ्याच सासुबाईं कडून हे सुचलं की काय? आता त्यांनी काहीही सांगितलं की माझ्या डोक्यातच राग जातो.”

“मला वाटतं आम्ही ठेचा खात शिकलो, ती नवीन आहे, तिला सोपं जावं म्हणून मी सांगत असते.”

“फोनवर किती जोरजोरात बोलत होता .जोक्स करत होता .मला वाटतं आजूबाजूला बरीच मंडळी असणार ! त्याला आवडतं असा माहोल क्रिएट करायला ! काही गोष्टी सगळ्यांसमोर बोलणं मला नाही आवडत.”

“मला समजत नाही का कुठे काय बोलायचं ? की मी वेडा आहे ?. मला वाटलं दिवसभराची हालहवाल विचारायला म्हणून मी फोन केला ! तुला बरं वाटेल तेवढच म्हणून !”

“मला वाटतं मुलगा काय हेकटपणा करतो आहे ,लग्न नकोच म्हणतो .त्यांनी एकट आयुष्य काढावं याने मला वाईट वाटतं..”

” माझ्या आईचा स्वभाव इतका पुरातन वादीं आहे की तिच्याशी कोणतीच मुलगी जमवून घेऊ शकणार नाही असं मला वाटतं !”

विसंवादाचे असे दोन खांब असताना दिसतात .एक म्हणजे मला असं वाटतं आणि माझं कुठे चुकले?

यात माझं म्हणणं बरोबर हा अट्टाहास अडथळा घालताना दिसतो. अशा या विसंवादाची सुरुवात थोडी असते. पण वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे ,आपल्या अपेक्षा व्यक्तीकडून पूर्ण न होणे ,आपला हेतू समजून न घेतला जाणे यामुळे मने दुखावतात आणि मग माझं बरोबरच आहे आणि ते समोरच्याने मान्य करायलाच हवं हा अट्टाहास सोबत असतो .त्याच बरोबर मी सांगतो तसं त्याने वागावं हेही अध्याहृत असत.

तसं बघितलं तर दोन्ही बाजू आपापल्या ठिकाणी बरोबर असतात .पण हळूहळू दुखावलेल्या इगोमुळे आपलंच मत त्रिकालाबाधित सत्य वाटायला लागतं आणि मला काय वाटतंय यालाच सगळं महत्व येऊन केवळ “हो ! तुझच बरोबर आहे !” हीच मान्यता केवळ मिळायला हवी वाटते. समोरचा पटकन बोलेल मला सहन होणार नाही किंवा माझ्याकडून उलट-सुलट बोलले जाईल म्हणून नकोचं तो संवाद हा मार्ग स्वीकारला जातो.

कसं पडणार या कचाट्यातून बाहेर ?

  • या परिस्थितीत माझा मित्र किंवा मैत्रीण असतील तर माझा सल्ला काय असता ? स्वतःकडे तटस्थतेने पाहणे.
  • असं कसं वागू शकता कोणी ऐवजी कशामुळे असं वागावं असं वाटलं तुला ?
  • कोण चूक ? कोण बरोबर ?याच्या ऐवजी या परिस्थितीत काय योग्य ? विचारांना योग्य दिशा .
  • मला नेमकं काय हवंय? मनस्ताप कि मोकळे होणे ? त्यामुळे कमी करू शकतो.
  • परिस्थितीबद्दल तक्रार करीत राहणं की समंजस स्वीकार करणे. ताण कमी होईल.

आणि फ्रेंड्स, काही जखमा या कायम चिघळणार अशा असतात ,काही न सुटणाऱ्या गाठी असतात. अशावेळी काय करायचं, तर मला जर यापासून मुक्त व्हायचं असेल तर पूर्ण मनाची एकाग्रता साधून, डोळे बंद करून मनाला सूचना द्यायची आहे की,” हे मना ! जस्ट लिव्ह इट ! ”

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER