फक्त एक सही

Swapnali Patil

सेलिब्रिटींचं लग्न म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग (Destination Wedding) हे समीकरण अगदी घट्ट झालं आहे. लॉकडाऊनच्या आधी ज्यांचं जमलं होतं त्यांनी कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर धूमधडाक्यात लग्नाचा बार उडवून दिला हे गेल्या काही दिवसांतील कलाकारांच्या सोशल मीडिया पेजवर नजर टाकली तर दिसून येईल. अभिनेता आस्ताद काळे (Actor Astad Kale) आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील (Actress Swapnali Patil) यांचं लग्न कधी होणार ही चर्चा गेल्या आठवड्यात त्यांनीच जाहीर केलेल्या तारखेमुळे सुरू  होती. १४ फेब्रुवारी या व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे हे तर चाहत्यांपर्यंत पोहचलं; पण यांचं लग्न कुठल्या पारंपरिक वाड्यात होणार की आलिशान हॉटेलमध्ये होणार या प्रश्नानं  त्यांच्या चाहत्यांना भंडावून सोडलं होतं. आता आस्ताद आणि स्वप्नाली हे रजिस्टर लग्न करून त्यांच्या सहजीवनाची सुरुवात करणार असल्याचे त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केल्यामुळे चाहत्यांच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. फक्त एक सही करून आस्ताद आणि स्वप्नाली आयुष्यभराचे जोडीदार बनणार आहेत. लग्नावर अनाठायी खर्च करायचा नाही हे या दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या तेव्हाच ठरवलं होतं. शिवाय लग्नाचे कोणतेही पारंपरिक विधीही ते करणार नाहीत. त्याच निर्णयावर ठाम राहात ही जोडी रजिस्टर पद्धतीने १४ फेब्रुवारीला लग्न करणार आहे.

अर्थात लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय आणि आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे आस्ताद आणि स्वप्नाली हे जरी कुठलाही डामडौल किंवा सोहळा न करता लग्न करणार असले तरी गेल्या आठवड्यापासूनच या दोघांच्या लग्नाच्या शॉपिंगचे फोटो व्हायरल होत आहेत. गेल्या महिन्यात आस्ताद आणि स्वप्नाली यांना त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींनी केळवण केलं आणि त्यानंतरच आस्ताद आणि स्वप्नालीच्या लग्नाची चर्चा ऑनलाईन सोशल मीडिया (Social Media) वर्तुळात सुरू झाली. बिग बॉस शोमध्ये आस्तादसोबत असलेल्या मेघा घाडगे आणि त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी या जोडीला केळवण केलं होतं. त्याचे फोटो स्वप्नालीने सोशल मीडिया पेजवर शेअर केले होते. आता या दोघांच्या चाहत्यांना वेध लागले होते ते या दोघांचं लग्न कोणत्या खास ठिकाणी होणार आहे आणि या लग्नासाठी कुठली कुठली तयारी केली आहे याचे. पण आता हे लग्नच रजिस्टर पद्धतीने होणार असल्यामुळे दोन हार, दोन साक्षीदार आणि दोन सह्या एवढाच लवाजमा आस्ताद व स्वप्नालीच्या लग्नाला हजर असेल. पण आस्ताद आणि स्वप्नालीने घेतलेल्या निर्णयावर त्यांचे चाहते खूश असून कसेही करा पण दोघं लग्न करून सुखी संसार करा, अशा शुभेच्छा या दोघांच्या चाहत्यांनी त्यांना दिल्या आहेत.

‘पुढचं पाऊल’ या मालिकेत आस्ताद आणि स्वप्नाली एकत्र काम करत होते. या मालिकेत स्वप्नाली आस्तादच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका करत होती. या मालिकेमध्ये त्याची पहिली पत्नी हिचं निधन झाल्यानंतर स्वप्नाली त्याच्या आयुष्यात आली होती. वास्तविक जीवनातही थोड्याफार फरकाने त्याच्या आयुष्यात स्वप्नालीची एंट्री अशीच झाली आहे. आस्ताद एका दुसऱ्याच मुलीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. त्या प्रेयसीचे कॅन्सरने काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्या धक्क्यातून आस्ताद बराच काळ बाहेर आला नव्हता आणि त्याच दरम्यान आस्ताद आणि स्वप्नाली एकमेकांचे मित्र बनले. आस्तादला त्या मानसिक अस्वस्थतेच्या काळात स्वप्नालीने फार मोठी साथ दिली आणि त्यातूनच या दोघांचे सूर जुळले.

बिग बॉस हा शो सुरू असतानाच आस्तादने स्वप्नालीसोबतच्या रिलेशनशिपची जाहीर कबुली दिली होती आणि जेव्हा तो बिग बॉसच्या घरातून बाहेर आला त्यानंतर खऱ्या अर्थाने यांच्या लव्हलाइफला सुरुवात झाली. ‘सिंगिंग स्टार’ या रियालिटी शोमध्ये आस्ताद सहभागी झाला होता. आस्ताद एक उत्तम शास्त्रीय गायक असल्याने या शोमध्ये त्याने त्याच्या गायकीचे दर्शन घडवत प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. या शोमध्ये त्याने ‘नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो’  हे गाणं गात परीक्षकांची वाहवा मिळवली होती. त्याच वेळी स्वप्नालीशी काही भांडण झाल्यामुळे या दोघांमध्ये दुरावा आला होता आणि त्याच उत्कट भावनेतून आस्तादनं हे गाणं गायलं होतं. हा किस्सादेखील त्याने ‘सिंगिंग स्टार’ या शोच्या मंचावरून सांगितला होता. त्यानंतर स्वप्नाली पुन्हा त्याच्या आयुष्यात आली आणि या दोघांमधील सगळे गैरसमज दूर झाले. आता या दोघांच्या लग्नाचा दिवस जवळ आला आहे. त्यासाठी गेल्याच आठवड्यात स्वप्नालीने साड्या खरेदीचा आनंद लुटला. लग्नासाठी जरी ही जोडी फार आर्थिक उधळपट्टी करणार नसली तरी लग्नानंतर काही दिवस शांत ठिकाणी फिरायला जाण्याचे मात्र या दोघांनी नियोजन केलेले आहे. सध्या तरी ही जोडी कुठे फिरायला जाणार आहे हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवलं असून त्यासाठी त्या दोघांच्या चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER