जून्या नथीचा नवा ट्रेंड ‘नोझ पिन’..

nose pin

सध्या आपल्या पारंपरिक नथ, चमकी आणि कुड्यांसह नोझ पीननं युवतींना भुरळ पाडली आहे. झोकात मिरवण्याच्या या अॅक्सेसरीजचा ट्रेंड कॉलेजपासून ते सणसमारंभापर्यंत सगळीकडे दिसून येतो आहे. आपल्या आई-आजीनं वापरलेल्या कुड्या हल्ली पुन्हा बाजारात पाहायला मिळतात. तशीच आता नोझ पिन आणि नवीन लूकमधल्या नथींची फॅशन जोरात आहे. नथीला झोला देणं, म्हणजे काय हे आजच्या पिढीला माहिती नसलं, तरी या नथी वापरताना ते समजू शकतं. राउंड नथीचीही सध्या चलती आहे. त्यासह छोट्या-मोठ्या आकाराच्या, विविध रंगाच्या नोझ पिन पुण्यात बऱ्याच ठिकाणी मिळतात. जुन्या पद्धतीच्या नथीमध्ये थोडा बदल करून या नव्या लूकच्या नथी तरुणी आवडीनं वापरत आहेत. या नथींचा आकार चंद्रकोरीसारखा असतो आणि त्या चांदीत बनलेल्या असतात. थोडा आधुनिक लूक असल्यामुळे फक्त साडीवरच नाही, तर कुर्तीवरही त्या उठून दिसतात. चंद्रनथ, कुडीनथ, घुमटनथ या कलेक्शनमध्ये तुम्ही आवडीनुसार खरेदी करू शकता. सध्या बाजारात दाखल झालेल्या नोझ पिनही खूप सुंदर आहेत. कुंदन, मोर, फुल, पान, कुडी, चांदणी अशा अनेक आकार आणि रंगाच्या चांदीच्या नोझ पिन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. नोझ पिन हे एकदम बजेटेमध्ये बसणारं प्रकरण आहे. साधारणतः चाळीस ते पन्नास रुपयांपासून चारशे रुपयांपर्यंत या विविध रंगाचे खडे असणाऱ्या नोझ पिन उपलब्ध आहेत. सोन्याच्या नोझ पिनमध्येही खूप वेगळ्या डिझाइन उपलब्ध आहेत. केरळी आणि मराठी प्रकारातल्या नोझ पिन्सची सध्या फार चलती आहे. फक्त सणच नाही, तर रोजची फॅशन म्हणूनही नोझ पिन वापरण्याचा ट्रेंड सध्या आला आहे. गंमत म्हणजे, अभिनेता आमिर खाननं त्याच्या चित्रपटात घातलेल्या नोझ पिनमुळेही पुन्हा एकदा ही फॅशन चर्चेत आहे.

nose pin