1 जून World milk Day – आहार आणि औषध असे जीवनीय ओजवृद्धीकर दूध !

World Milk Day

Food and Agriculture Organization of United Nation व्दारे दूधाचे आहारातील महत्त्व कळावे याकरीता १ जून हा World Milk Day साजरा केला जातो. भारतीयांना दूध शरीराकरीता आरोग्याकरीता किती महत्त्वाचे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. कफ होऊ नये म्हणून हळदीचे दूध असो अथवा ताकद वाढविणारे शतावरी घातलेले दूध असो अनेक संयोग, संस्कार करून दूध हे नित्य आहाराचा घटक आपल्याकडे आहेच. अगदी बाळापासून ते वृद्धांपर्यंत दूध घेणे किती गरजेचे आहे हे घरात पटवून दिले जाते. गर्भिणी, बाळंतीणीला तर अवश्यमेव विविध युक्तीने दिल्या जाते. दूध घेत नसेल तर बासुंदी, खीर अशा विविध रुपात दूधाचा पदार्थ केला जातो.

आयुर्वेदात दूधाचे महत्त्व सांगतांना त्याला ओज (शरीरातील जीवनीय शक्ति) गुणांशी साम्य ठेवणारे सांगितले आहे. जीवनीय शक्ति, रसायन गुणांचे दूध शरीरातील सर्व रसरक्तादि सप्तधातुंचे पोषण करणारे, स्निग्ध, वीर्यवर्धन करणारे, गुरु, थंड वीर्याचे असते.

अष्टक्षीर म्हणजेच आठ प्रकारचे दूध आहे –

गव्यं माहिषमाजं च कारभं स्त्रैणमाविकम् ।
ऐभमैकशफं चेति क्षीरमष्टमिधं मतम् ॥

त्यापैकी गोदूग्ध श्रेष्ठ आहे. याचे पाचन लवकर होते. यात fat चे प्रमाण कमी असते त्यामुळे सर्वांना पचते. म्हशीचे दूध, ज्याचा जाठराग्नि अत्यंत प्रबल तीव्र आहे तसेच ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांनी घ्यावे. इतर दूधापेक्षा म्हशीचे दूध पचण्यास जड आणि कठीण आहे.

बकरीचे दूध हलके तर उंटणीचे दूध खारट उष्ण गुणाचे असते. मेंढीचे दूध हृदयाला अहितकर कफ वाढविणारे आहे तर हत्तिणीचे दूध स्थैर्यकर आहे.

आयुर्वेदात इतका सूक्ष्म विचार दुधाच्या ग्राह्यतेवर केला आहे ते खालील वर्णनावरून लक्षात येईल –

  • धारोष्ण दूध ( दूध दोहत असतांना पिणे ) अमृताप्रमाणे गुणकारी, कांती वाढविणारे, पौरुषत्व वाढविणारे, पुष्टीकर आहे.
  • तीळ जवस पदार्थाची ढेप खाणाऱ्या गाई म्हशीचे दूध अतिशय जड कफकर आहे. गाई म्हशीचे सकाळचे दूध अधिक जड तर सायंकाळी काढलेले दूध हलके असते. रात्री प्राणी एका जागी बसून असतात याउलट दिवसभर चरायला हिंडतात म्हणून व्यायाम झाल्याने सायंकाळचे काढलेले दूध हलके होते. (अर्थात असे गवळ्यांनी करणे अपेक्षित आहे)
  • दूध पचायला जड पडत असेल तर अर्धे दूध अर्धे पाणी घेऊन तापवावे, पाणी आटून दूधच शिल्लक राहिल्यावर ते हलके पचायला सुलभ होते.
  • दूध जेवढे आटवाल तेवढे पचायला जड आणि बल्य बनते.

आयुर्वेदात (Ayurveda) आचार्यांनी दूधाच्या इतक्या सूक्ष्म छटा वर्णित केल्या आहेत ते कोणत्याच वैद्यकिय शास्त्रात नाही. क्षय रोग्याला अजा क्षीर ( बकरीचे दूध ) हा औषध आणि आहार दोन्ही आहे. बाळाला मातृस्तन्य हा सात्म्य व पूर्णान्न आहे. काही व्याधींमधे केवळ दुग्धाहारावरच राहण्यास सांगितले आहे तर काही अवस्थांमधे दूध अपथ्य आहे. भूक नसतांना घेतलेले दूध अजीर्ण, कफ वाढविणारे ठरते तर कडकडीत भूक व तीव्र जाठराग्नी असणाऱ्यांना म्हशीचे जड दूध बल वाढवते.

हजारो वर्षापूर्वी दूधाचे इतके विविध प्रकार त्यांचे गुण, त्यांचा शरीरावर होणारा परीणाम, रुग्ण व्याधी वय अग्नि बल प्रकृती अवस्था सात्म्य यांचा विचार करून उपाय योजना यावर आचार्यांनी वर्णन केले आहे. या World Milk Day च्या निमित्ताने क्षीर महात्म्य आयुर्वेद ग्रंथातून.

ह्या बातम्या पण वाचा :

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button