जंपिंग जॅक जितेंद्रचा आज ७९ वा वाढदिवस

jitendra - Maharastra Today
jitendra - Maharastra Today

बॉलिवूडमध्ये मेहनत केली तर यश मिळतेच असे म्हटले जाते. आणि याची अनेक उदाहरणेही दिली जातात. अर्थात आता अशी उदाहरणे मिळणे कठिण झाले आहे. आता तुम्ही बॉलिवूडमधील एखाद्या घराण्याचे सदस्य असाल तरच तुम्हाला यश मिळते. पण पूर्वी असे नव्हते. त्यामुळेच धर्मेंद्र, जितेंद्र, गोविंदा, जॅकी श्रॉफ असे अनेक बाहेरचे नायक येथे आले आणि त्यांनी यश मिळवले. जितेंद्रने (Jitendra) तर जवळ-जवळ ४ दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केले. जंपिंग जॅक म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या जितेंद्रचा आज ७९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या कारकिर्दीवर एक छोटीसी नजर-

जितेंद्रचा जन्म ७ एप्रिल १९४२ ला पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्याचे खरे नाव रवी कपूर. जितेंद्रच्या जन्मानंतर त्याचे कुटुंब मुंबईला आले आणि गिरगाव येथाल श्याम सदन नावाच्या एका चाळीत राहू लागले. जवळ जवळ २० वर्षे जितेंद्र या चाळीतील खोलीत राहात होता. जितेंद्रचा सिनेमात प्रवेश योगायोगानेच झाला. सिनेमाच्या शूटिंगसाठी इमिटेशन ज्वेलरी पुरवण्याचे काम जितेंद्रचे वडिल करीत असत. एकदा व्ही. शांताराम यांच्यासाठी इमिटेशन ज्लेवरी घेऊन जितेंद्र गेला असता व्ही. शांताराम यांनी त्याला ‘नवरंग’ सिनेमात अभिनेत्री संध्याच्या डुप्लीकेटचे काम केले. त्यानंतर व्ही. शांताराम यांची सगळे काम मी करीत गेलो आणि त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न मी करू लागलो असे जितेंद्रना एकदा एका मुलाखतीत सांगितले होते. जितेंद्रचे कामाप्रती प्रेम पाहून व्ही. शांताराम यांनी त्याला १९६४ मध्ये ‘गीत गाया पत्थरो’ ने सिनेमात नायकाची भूमिका दिली. त्यानंतर जितेंद्रला कामे मिळण्यास सुरुवात झाली आणि त्याने स्वतःचे वेगळे असे स्थान बॉलिवूडमध्ये निर्माण केले.

जितेंद्रने आतापर्यत ३०० च्या आसपास सिनेमांमध्ये काम केले असून यापैकी अनेक सिनेमे सुपरहिट झालेले आहेत. साऊथमधील सिनेमे हिंदीत रिमेक करण्याची सुरुवात जितेंद्रनेच केली होती. साऊथचे निर्माचे जितेंद्रवर प्रचंड खुश होते. त्यामुळे जितेंद्रने साऊथचे अनेक सिनेमे बॉलिवूडमध्ये आणले आणि ते बॉक्स ऑफिसवर यशस्वीही झाले. फॅमिली ड्रामा ते अॅक्शन पॅक्ड असे सर्व प्रकारचे सिनेमे जितेंद्रने केले. ‘फर्ज’ सिनेमात त्याने गुप्तहेराची भूमिका साकारली होती. या सिनेमानेच त्याला जंपिंग जॅक असे बिरूद दिले. यानंतर त्याने ‘वारीस’, ‘खिलौना’, ‘धरम वीर’, ‘हिम्मतवाला’, ‘हमजोली’, ‘बिदाई’ हे जितेंद्रचे काही गाजलेले सिनेमे.

जितेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यात एकत्र काम करताना प्रेम जुळले होते. जितेंद्र आणि हेमा मालिनी लग्नही करणार होते. मात्र त्याचवेळी जितेंद्र त्याची गर्लफ्रेंड शोभासोबतही रोमांस करीत होता. धर्मैंद्र आणि हेमा मालिनीही एकमेकांवर प्रेम करू लागलेले होते. त्यामुळे धर्मेंद्रने एक दिवस जितेंद्रची गर्लफ्रेंड शोभाला घेऊन मद्रास गाठले. जितेंद्र तेव्हा तेथे हेमा मालिनीसोबत ‘गहरी चाल’ सिनेमाचे शूटिंग करीत होता. तेथे शोभाने चांगलाच गोंधळ घातल्याने जितेंद्र आणि हेमा मालिनीचे लग्न होऊ शकले नाही. त्यानंतर हेमा मालिनीने धर्मेंद्रशी लग्न केले. मात्र या प्रकरणानंतरही या तिघांमधील संबंध बिघडले नाहीत. आजही हे तिघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

जितेंद्रने जरी बॉलिवूडमध्ये यश मिळवले असले तरी त्याचा मुलगा तुषार मात्र नायक म्हणून तसे यश मिळवू शकला नाही. मुलगी एकताने मात्र छोट्या पडद्याची ताकद लक्षात घेऊन तेथे काम करण्यास सुरुवात केली आणि टीव्ही क्वीन म्हणून नाव कमावले. त्यानंतर एकताने सिनेनिर्मितीसही सुरुवात केली. जितेंद्र आज घरी बसून एकताचे यश पाहात आहे. जितेंद्रला वाढदिवसानिमित्त आमच्या खूप खूप शुभेच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button