रमझानमध्ये जुम्मा मशिदीत नमाजाची परवानगी नाकारली

Jumma Masjid Trust-High Court
  • हायकोर्ट म्हणते तुमचा एकट्याचा अपवाद करता येणार नाही

मुंबई :- बुधवारपासून सुरु झालेल्या मुस्लिमांच्या पवित्र रमझान महिन्यात भाविकांना मशिदीत येऊन दिवसातून पाच वेळा नमाज पढण्याची परवानगी मिळावी यासाठी मुंबईतील जुम्मा मशिद ट्रस्टने (Jumma Masjid Trust) केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.

न्या. रमेश धानुका व न्या. व्ही. जी. बिश्त यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने ही याचिका फेटाळताना नमूद केले की, कोविडचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्यातील सर्वच धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने काढलेला असताना एकट्या मुस्लिम समाजासाठी असा अपवाद करता येणार नाही.

राज्यातील धार्मिक स्थळे आधीपासूनच बंद आहेत. त्यातच राज्य  सरकारने बुधवारपासून राज्यभर नवे कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार दिवसा सर्वत्र जमावबंदी व रात्री संचारबंदी असणार आहे. या पार्श्वभूमीवर ही याचिका करण्यात आली होती.

इतर धर्मियांप्रमाणे आमची मशिदही गेले कित्येक दिवस बंद आहे. परंतु रमझान हा इस्लामचा सर्वात पवित्र महिना असल्याने निदान तेवढ्या काळापुरती तरी भाविकांना मशिदीत येऊन नमाज पडण्याची परवानगी दिली जावी, अशी मशिदीच्या ट्रस्टने याचिकेत विनंती केली होती. नमाजाच्या वेळी सामाजिक अंतराचे बंधन कठोरतेने पाळलले जाईल, असे त्यांचे म्हणणे होते. गेल्या वर्षी देशव्यापी ‘लॉकडाऊन’ लागू झाल्यावर जैन धर्मियांना पर्यूषण पर्वात मुंबईतील त्यांच्या दोन मंदिरांमध्ये येऊन धामिक पूजा-पाठ करण्यास परवानगी दिली गेली होती, याचाही याचिकेत दाखला दिला गेला होता.

सरकारी वकिलांनी याचिकेस विरोध केला. न्यायालयाने म्हटले की, यापूर्वी इतर कोणाला परवानगी दिली हा आता तुम्हाला परवानगी देण्याचा आधार ठरू शकत नाही. शिवाय तुम्हाला परवानगी दिली की इतर मशिदीही तशीच मागणी करतील.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button