
“अरे संसार संसार , जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके , मग मिळते भाकर” ही बहिणाबाईंची कविता संसाराचे वास्तव चित्र उभं करीत असली तरीही वास्तव इतकेही तापदायक नाही. म्हणूनच जेव्हा हे ‘शुभमंगल सावधान’ असे म्हणण्याची वेळ येते त्या वेळेला तसं घाबरण्याचं म्हणून काही कारण नसतं.
परंतु दोन कधी न भेटलेल्या किंवा थोड्या परिचयाच्याही व्यक्ती जेव्हा एकत्र येतात, तेव्हा सगळं काही छान छान असं सुरुवातीला वाटतं. नंतर मधुचंद्राच्या कला छोट्या व्हायला सुरुवात होते. घरोघरी मातीच्या चुली आणि भांड्याला भांडे लागायचेच. थोडक्यात रोज रोज कसरत तारेवरची आता सुरू होते.
खरंच विवाह म्हणजे आयुष्यातला खूप महत्त्वाचा निर्णय आहे. आणि तो जेव्हा घ्यायला लागतो तेव्हा खरोखरीच अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण होतात. थोडी भीती ! थोडी काळजी ! थोडी हुरहुर !
कसा असेल तो किंवा ती ? मनाप्रमाणे असेल का? मनाप्रमाणे म्हणजे मला नेमके हवे तरी काय? यासाठी मुळात ,यात मी कसा किंवा कशी आहे ? नवीन घरांमध्ये मी मिसळू शकेन का ? किंवा कसे आहे घरातले लोक ? काय आहे त्यांचे गुणदोष ? येणारी व्यक्ती माझ्या घरात सामावली जाईल का ?
माझ्यासाठी कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि कुठल्या गोष्टींमध्ये मी तडजोड करू शकतो किंवा शकते ? बापरे ! आणि मग एवढे प्रश्न पडत असतील तर लग्न खरंच गरजेचे आहे का? करावं का ? कि मग लिव्ह इन रिलेशनशिप योग्य ?
एखादा मुलगा किंवा मुलगी ज्यावेळी आपल्याला आवडू लागते /लागतो तेव्हा हा खरंच योग्य जोडीदार आहे का, हा प्रश्न आपल्याला सतावत असतो. आपली निवड योग्य आहे ना ? निर्णय चुकीचा तर ठरणार नाही?
फ्रेंड्स ! तसं बघितलं तर खरंच १०० टक्के परफेक्ट ,पूरक लक्ष्मीनारायणाचा जोडा किंवा ‘टेलर मेड’ नवराबायको ही पूर्णपणे कविकल्पना आहे . मग हो किंवा नाही. माझी योग्य जोडीदार आहे का, त्याऐवजी तो किंवा ती योग्य जोडीदार करण्यासाठी दोघांनी मिळून काय केलं पाहिजे हेही बघणं गरजेचं असतं.
यासाठी आपल्या संकल्पना क्लिअर आहेत का ? आपल्याला कोणी अपेक्षा विचारल्या तर तो समजूतदार हवा, अशी जर आपण अपेक्षा सांगणार असू तर ही घासून गुळगुळीत झालेली अशी आहे.
१) आपले दोघांचे स्वभाव व विचार परस्परपूरक आहेत का ?
२) आयुष्य जोडीने घालवण्यास त्याची /तिची वेळ देण्याची किंवा तसे प्रयत्न
करण्याची तयारी आहे का?
३) नातं जपण्यासाठी, फुलवण्यासाठी माझ्याइतकाच तो किंवा ती उत्सुक आहे का ? याची उत्तरे समाधानकारक असतील तर निवड नक्कीच योग्य आहे असे समजावे.
त्यानंतर येते सुखी संसाराची/ घराची माझी कल्पना :
१) माझ्या व माझ्या जोडीदाराच्या बौद्धिक, भावनिक, शारीरिक ,मानसिक ,आध्यात्मिक गरजा कोणत्या ?
२) जोडीदाराच्या भूतकाळात मला अनावश्यक रस नाही ना ? किंवा सुतावरून स्वर्ग गाठण्याची घातक प्रवृत्ती आहे का?
३) ज्या कोणत्या गोष्टी परस्परपूरक नाहीत, त्यापैकी कोणत्या गोष्टी स्वीकारण्याची माझी तयारी आहे .(उदाहरणार्थ त्याला व्यायामाची आवड असणे – तिला नसणे, तिचा अति व्यवहारी स्वभाव आणि त्याचा हळवा किंवा vice- versa.)
४) लग्नानंतर एकत्र राहणार की विभक्त ? हे दोघांनीही स्पष्ट करणे आवश्यक. तसेच लग्नानंतर आपापल्या सासू-सासऱ्यांचा किती हस्तक्षेप आपल्याला चालेल.
५) सुखी घर म्हणजे माणसं की फर्निचर व सर्व सुखसोई असं माझं संकुचित स्वप्न आहे का ?
६) धार्मिक पारंपरिक रूढी पाळणारे घर मला हवे की पारंपरिक विचारांचा प्रभाव असणारे घर हवे?
७) आदर्श कुटुंब म्हणजे सत्ताधारी कर्तापुरुष , गृहकृत्यदक्ष त्यागी स्त्री, आज्ञाधारक मुले अशी कल्पना आहे की समानतेने सर्वांना वागवणारे कुटुंब असावे असे वाटते ?
८) स्त्री-पुरुषांच्या भूमिकांबाबत माझ्या चौकटीतल्या अपेक्षा आहेत का ?
९) स्त्रीचे करिअर हे पुरुषाच्या करिअर इतकेच महत्त्वाचे आहे हे मला मान्य आहे का ?
१०) नोकरी आणि करिअर करणाऱ्या स्त्रीने मिळवलेला पैसा नेमका कसा आणि कुठे? त्याचा विनियोग करायचा त्याचं स्वातंत्र्य तिला आहे का ?
११) दोघे मिळून एकत्रितपणे येणाऱ्या पैशाचे नियोजन करणार का ?
१२) घरातले कुठलेही निर्णय असोत एकत्रित विचारविनिमयाने केले जाणार का ?
जोडीदाराच्या अपेक्षा विचारून स्पष्ट करून घेणे, कुठल्याही गोष्टींवरून तर्क, गृहीतक ,अंदाज केवळ या आधारावर निर्णय घेऊ नये. संसारात बुद्धिमत्तेपेक्षा मानसिक आणि भावनिक परिपक्वता महत्त्वाची असते. लग्नानिमित्ताने मानसिकतेत दोघांनाही काही बदल करणे आवश्यक असते. वेळापत्रक , दिनक्रम बदलणार असतो. मनाला व सवयींना मुरड घालावी लागते. व्यक्तिस्वातंत्र्य परस्पर विरोधी असणे नव्हे तर परस्पर पूरक आहे. म्हणजेच यापुढे ‘मी माझं’ याऐवजी ‘आम्ही आमचं’ या शब्दप्रयोगांचा वापर वाढणार आहे. वैयक्तिक स्पेस घेण्याबरोबरच वैवाहिक हा जीवनाचा समतोलही राखला जातोय की नाही हे बघावे लागेल.
तरच या जुळून येणाऱ्या गाठी खरंच रेशीमगाठी बनतील हे नक्की !
मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला