जुईने पिळले कान

सोशल मीडिया (Social media)हे माध्यम कलाकारांच्या हाती आलं की ते नेहमी त्यांचे नव्या स्टाइलमधले फोटो किंवा व्हिडिओच पोस्ट करतात असे नाही. किंवा त्यांच्या नव्या प्रोजेक्टचे प्रमोशन करण्यासाठीच सोशल मीडियाचा वापर होतो असेही नाही, तर अनेक कलाकार समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींवरही भाष्य करत असतात. यापूर्वी सुयश टिळक, सुबोध भावे, हेमांगी कवी, शंतनु मोघे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर असे ताशेरे ओढले आहेत. यामध्ये आता अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) हिनेही कोरोना नियमावली पाळली जात नसणाऱ्यांवर कारवाई होताना प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या दुजाभावावर भाष्य केले आहे.

काही दिवसांपूर्वी जुई कर्जतमार्गावरून मुंबईकडे जात असताना तिला वाटेतील एका हॉटेलच्या लॉनवर विवाहसोहळा होत असताना दिसला. त्या हॉटेलबाहेर असलेली गर्दी, पार्किंग केलेल्या वाहनांच्या संख्येवरून हे स्पष्ट दिसत होते की त्या विवाहसोहळय़ाला दोनशेपेक्षा जास्त लोक असतील. यावरूनच जुईने सरकारी यंत्रणा व प्रशासनाचे कान पिळले. याबाबत सोशल मीडियावर एक खरमरीत पोस्ट करून जुईने समाजात एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय या कार्यप्रणालीवर भाष्य केले आहे.

या पोस्टमध्ये जुईने असे म्हटले आहे की सर्वसामान्यांनाच फक्त नियमांची सक्ती केली जाते आणि राजकारणी, बडे उद्योजक यांच्या घरातील विवाहसोहळा होत असताना अधिकारी दुर्लक्ष करतात. इतकेच नव्हे तर मॉल मध्ये प्रवेश करायचा असेल तर तुम्ही कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र आहे का ? असं तुम्हाला विचारलं जातं पण तेच सरकारी कार्यालयांमध्ये होणाऱ्या गर्दी वर कुठेही नियंत्रण नाही. सर्व बसेसमध्ये प्रवाशांची गर्दी आहे. तिथे सुरक्षित अंतर पाळले जात नाही. यावर सरकारचा अंकुश नाही. एकीकडे सरकार अशा पद्धतीने एकाला एक आणि एकाला दुसरा न्याय करत असतानाच दुसरीकडे कोरोनाची दुसरी लाट आल्याचा गवगवा केला जात आहे. निश्चितच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत हे जरी खरे असले तरी परिस्थिती अजूनही नियंत्रणात आहे. परंतु कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा होता त्यावेळी एका रुग्णामागे दीड लाख रुपयांचे अनुदान रुग्णालयांना मिळत होतं. हे अनुदान बंद झाल्यामुळे पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याचा गवगवा केला जात आहे का ? असाही प्रश्न मनात डोकावत आहे. सर्वसामान्यांच्या घरातील छोट्या कार्यक्रमांना वीस माणसं जरी आल्याचे दिसले तरी त्यांच्यावर दंडाचा आसूड ओढला जातो. अर्थात कारवाई करणे हे गरजेचे आहेच. पण ही कारवाई श्रीमंतांच्या लग्नांमध्ये होताना दिसत नाही. राजकीय नेत्यांच्या घरातील लग्नाला हजारो माणसे उपस्थित असतात. त्यावेळी प्रशासनाचे डोळे कसे काय बंद होतात हा देखील अस्वस्थ करणारा प्रश्न आहे.

जुईने तिच्या सोशल मीडियावर ही पोस्ट केल्यानंतर तिच्या मताला सहमती दर्शवणाऱ्या अनेक प्रतिक्रिया तिच्यापर्यंत आल्या आहेत. जुईची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून तिने तिच्या पोस्टमध्ये व्यक्त केलेली मतं तसेच निरीक्षणे ही खरोखरच भ्रष्ट यंत्रणेवर बोट ठेवणारी आहेत.

एरवी आपलं काम शांतपणे करणारी कलाकार मंडळी जेव्हा अशा सामाजिक विसंगतीवर भाष्य करतात तेव्हा त्यांच्या फॅन फॉलोइंग मुळे असे विषय मोठ्या प्रमाणात वायरल होतात. समाजातील चुकीच्या गोष्टी बदलण्यासाठी कलाकार मंडळींचे असं व्यक्त होणं चांगले असल्याचेही जुईच्या चाहत्यांकडून बोलले जात आहे.

पुढचं पाऊल या मालिकेमध्ये सोज्ज्वळ सुनेची भूमिका करणाऱ्या जुईने आजपर्यंत विविध मालिका, सिनेमा, नाटक यामध्ये तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. वर्तुळ या मालिकेतील तिची भूमिका ही खूप गाजली होती. जुई वैयक्तिक जीवनात अतिशय संवेदनशील अशी मुलगी असून प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक सामाजिक संस्थांशी जोडली गेलेली आहे. केवळ अभिनयाच्या माध्यमातूनच जुई प्रसिद्ध नाही, तर प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्या घटकांची घटकांची जागृती करण्यासाठी ज्या संस्था काम करतात त्यांचा एक भाग म्हणून तिचं नाव घेतलं जातं. म्हणूनच सध्याच्या कोरोना नियमावली बाबत प्रशासनाची जी दुटप्पी भूमिका दिसत आहे त्यावर जुईने केलेलं भाष्य हे नक्कीच विचार करायला लावणारे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER