
जुही चावलाने (Juhi Chawla) बॉलिवुडमध्ये (Bollywood) प्रवेश आमिर खानच्या (Aamir Khan) नायिकेच्या रुपात कयामत से कयामत तक या सिनेमातून केला होता. प्रेक्षकांना ही जोडी खूपच आवडली होती. त्यानंतरही जुहीने आमिरसोबत काही चित्रपट केले. पण तिची खरी जोडी जमली ती शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan). ही जोडी एवढी चांगली जमली की नंतर त्यांनी व्यावसायिक भागिदारी करून चित्रपट निर्मिती तर केलीच, आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स ही टीमही तयार केली. हे दोघे आता चित्रपटात दिसत नसले तरी त्यांचे व्यावसायिक संबंध अजूनही टिकून आहेत. मात्र याच शाहरुख खानला तिच्या एका सिनेमात नायक बघून जुहीला आश्चर्य वाटले होते.
शाहरुख आणि जुही सर्वप्रथम ‘राजू बन गया जंटलमॅन’ सिनेमातून प्रेक्षकांसमोर आली. हा चित्रपट हिट झाला आणि ही जोडीही प्रेक्षकांना खूपच आवडली होती. परंतु खूप कमी जणांना ठाऊक आहे की, या सिनेमातील नायकाच्या भूमिकेसाठी निर्मात्याची पहिली पसंद होती आमिर खान आणि आमिर खानला साईनही करण्यात आले होते. कयामत से कयामतमुळे आमिर खान आणि जुही चावलाची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती आणि प्रेक्षकांनी तो सिनेमाही डोक्यावर घेतला होता. त्यामुळे निर्मात्यांनी आमिर आणि जुहीचीच जोडी प्रेक्षकांसमोर आणण्याचा विचार केला होता. परंतु काही कारणाने आमिर खानने हा सिनेमा करण्यास नकार दिला आणि त्याच्या जागी शाहरुख खानला साईन करण्यात आले. परंतु नायकाच्या या बदलाची जुही चावलाला काहीही कल्पना नव्हती. त्यामुळे आमिरच्या जागी शाहरुखला बघून जुही चकित झाली होती. विशेष म्हणजे जुही चावला या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी स्थापित नायिका होती तर शाहरुख खान संघर्ष करीत होता. सिनेमात नाना पाटेकर आणि अमृता सिंह यांच्याही महत्वाच्या भूमिका होत्या.
शाहरुखच्या पहिल्या भेटीबाबत बोलताना जुहीने एकदा सांगितले होेते, आमिर खानसारख्या दिसणाऱ्या नव्या तरुणाला नायक म्हणून साईन करण्यात आल्याचे मला निर्माता दिग्दर्शकांनी सांगितले. परंतु जेव्हा मी शाहरुखला बघितले तेव्ह तो तर आमिरसारखा बिलकुल दिसत नव्हता. त्यामुळे प्रथम मी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. परंतु सेटवर काम करताना आम्ही गप्पा मारू लागलो आणि आमची लवकरच गट्टी जमली. हा सिनेमा हिट झाला आणि प्रेक्षकांनाही ही जोडी आवडल्याने त्यानंतर या दोघांनी ‘डर’, ‘डुप्लीकेट, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘वन टू का फोर’ असे काही चित्रपट केले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला