गृहमंत्र्यांच्या चौकशीसाठी नेमलेली न्यायालयीन समिती निव्वळ धूळफेक : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis - Anil Deshmukh - maharastra Today

मुंबई :- परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशीसाठी नेमलेली न्यायालयीन समिती म्हणजे निव्वळ धूळफेक आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. कोणतेही अधिकार नसताना उच्च न्यायालयाचे एक निवृत्त न्यायाधीश विद्यमान गृहमंत्र्यांविरोधात चौकशी कशी करणार, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. “राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधातील आरोपांची चौकशी करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या न्या. के. यू. चांदीवाल समितीला साध्या समितीचा दर्जा देण्यात आला असून, न्यायालयीन आयोगाचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. कमिशन्स ऑफ इन्क्वायरी अ‍ॅक्ट १९५२ अंतर्गत ही समिती गठित  करण्यात आलेली नाही, ना त्यांना या कायद्यानुसार अधिकार प्रदान केले. आमच्या काळात न्यायालयीन झोटिंग समिती गठित करताना त्यांना या कायद्यांतर्गत सर्व अधिकार प्रदान करण्यात आले होते.” असे फडणवीस म्हणाले.

त्यामुळे ही समिती म्हणजे निव्वळ धूळफेक आहे आणि या प्रकरणातील आरोपांची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेता, त्यातून कोणताही हेतू साध्य होणार नाही. आता प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे कोणतेही अधिकार नसताना उच्च न्यायालयाचे एक निवृत्त न्यायाधीश विद्यमान गृहमंत्र्यांविरोधात चौकशी कशी करणार? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button