प्राचीन न्यायी राजाच्या थाटात हायकोर्टाचे न्यायदान

Ajit Gogateदोन हजार वर्षांपूर्वी दक्षिणेत होऊन गेलेल्या ‘मनु निधी चोलन’ या चोला वंशातील न्यायी राजाचा दाखला देत मद्रास उच्च न्यायालयाने एका प्रकरणात केलेल्या न्यायदानाचे निकालपत्र वाचताना कौतूक वाटले. हा राजा एवढा न्यायी होता की त्याच्या शत्रुलाही त्याच्याविषयी आदर वाटे. म्हणूनच इसवी सन पूर्व १६१ मध्ये युद्धात त्याचा ज्याच्या हातून मृत्यू झाला त्या शत्रूने त्याच्या मृत्यूस्थळीच त्याचे स्मारक बांधले. न्यायाचे मूतिर्मंत प्रतिक म्हणून या ‘मनु निधी चोलन’चा पूर्णाकृती पुतळा मद्रास उच्च न्यायालयाच्या प्रांगणात उभारलेला आहे. या न्यायी राजाने आपल्या एकुलत्या एक मुलाला ठार मारून एका गायीला   कसा न्याय दिला याचा उल्लेख प्राचीन शिलालेखांत आढळतो. या राजाच्या राजवाड्याबाहेर एक मोठी घंटा बांधलेली असे.

ज्याला कोणाला न्याय हवा असेल त्याने ती घंटा वाजवावी, अशी प्रथा होती. एक दिवस घंटा वाजली. राजाने बाहेर येऊन पाहिले तर एक गाय घंटा वाजवत होती. चौकशी करता असे कळले की, राजाचा एकुलता एक मुलगा विधी विदंगन याच्या भरधाव रथाच्या चाकाखाली येऊन त्या गायीचे वासरू मृत्यूमुखी पडले होते. राजाने आपल्या मुलालाही तशाच प्रकारे भरधाव रथाच्या चाकाखाली चिरडून ठार करत त्या गायीला न्याय दिला, अशी ती कथा आहे.

सोमवारी २ नोव्हेंबर रोजी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाचे न्यायाधीश न्या. जी. आर. स्वामीनाथन यांनी या ‘मनु निधी चोलन’चा दाखला देत एका प्रकरणात निकाल दिला. हे न्या. स्वामीनाथन मुळचे थिरुवरूर येथील आहेत. थिरुवरूर  ही ‘मनु निधी चोलन’ची राजधानी होती. न्या. स्वामीनाथन यांनी निकालपत्राच्या सुरुवातीस या ‘मनु निधी चोलन’च्या आख्यायिकेचा आदरपूर्वक संदर्भ देत म्हटले की, आता भारत लोकशाही प्रजासत्ताक असल्याने राजाकडून केल्या जाणार्‍या झटपट न्यायदानाला जागा नाही. पण तरीही पूर्वीप्रमाणे अपघात व अन्याय आताही होतच असतात. अन्याय झालेले लाखो लोक न्यायासाठी टाहो फोडत असताना शक्यतो झटपट न्याय देणे हे आपले कर्तव्य ठरते.

२९ऑक्टोबर रोजी सकाळी न्या. स्वामीनाथन न्यायासनावर येऊन बसले तेव्हा त्यांना एक  मध्यमवयीन खेडूत, दीनवाणा माणूस, काखोटीला काही कागदांचे बाड घेऊन कोर्टात उभा कोर्टात उभा असलेला दिसला. चौकशी करता त्या माणसाचे नाव सैंधतीकला पांडियन असल्याचे सांगण्यात आले.  त्याने कोर्टाच्या रजिस्ट्रारकडे एक कैफियत ई-मेलने पाठविली होती. त्याच्या २२ वर्षांच्या, बी.एससी झालेल्या श्रावण या मुलाचा  ७ ऑक्टोबर रोजी स्कूटरवरून घरी येताना वाटेत रस्त्यात खांबावरून तुटून खाली पडलेल्या  वीजेच्या तारेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला होता. त्याबद्दल तो न्यायाच्या अपेक्षेने हायकोर्टात आला होता.

त्या माणसाची दीनवाणी अवस्था पाहून तू एखादा वकील करून रीतसर याचिका दाखल कर किंवा भरपाईसाठी वीज मंडळाविरुद्ध दिवाणी दाखल कर, असे त्याला सांगणे घोर अन्यायाचे होईल, असे न्या. स्वामीनाथन यांना वाटले. त्यांनी त्या माणसाने रजिस्ट्रारला पाठविलेला ई-मेल हिच त्याची याचिका आहे असे मानून त्याच दिवशी दुपारी लगेच ती सुनावणीस घेतली.

खांबावरून तुटलेल्या वीजेच्या तारेचा शॉक लागून श्रावणचा मृत्यू झाला हे वीज मंडळाने नाकारले नाही. त्यांच्या प्रस्थापित धोरणानुसार याबद्दल मंडळाने पांडियन यांना पाच लाख रुपये भरपाई २९ ऑक्टोबर रोजी दिलीही होती. पण मंडळाचे म्हणणे असे होते की, श्रावण याचा मृत्यू आमच्या निष्काळजीपणाने झाला, असे मात्र म्हणता येणार नाही. वीजेच्या खांबांवर खारी चढतात. त्यांच्या शेपट्या तारांना लागून लाईन ‘ट्रिप’ होत व तार तुटून खाली पडते. पण खांबाच्या खाली झुडपे वाढलेली असल्याने तार जमिनीला टेकत नाही. त्यामुळे ‘फीडर लाइन’चा वीज प्रवाह आपोआप बंद होत नाही.

न्या. स्वामीनाथन यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन या सर्व गोष्टींची खात्री करून घेतली. वीज मंडळाच्या निष्काळजीपणाने तार तुटली नाही  हे त्यांना पटले. तरी त्यांनी म्हटले की, विजेसारख्या घातक वस्तुचा जे व्यवहार करतात त्यांनी निष्काळजीपणा झाला नाही, एवढे म्हणून जबाबदारी संपत नाही. त्यांच्या यंत्रणेत अपघाताने झालेल्या चुकीमुळे कोणाचा मृत्यू झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मंडळावरच येते. मोटार अपघातातील मृतांना भरपाई देताना जसा हिशेब करतात तसा हिशेब करून न्या. स्वामीनाथन यांनी वीज मंडळाने पांडियन यांना एकूण १३ लाख ८६ हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला.

याहीपुढे जाऊन न्यायाधीशांनी असे म्हटले की, हातातोंडाशी आलेल्या मुलाच्या मृत्यूने पांडियन यांच्यावर आलेल्या आपत्तीचे निवारण केवळ भरपाई देऊन होणार नाही. त्यासाठी त्यांनी पांडियन यांच्या भारती या  दुसर्‍या वीज मंडळाने कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरी द्यावी, असाही आदेश दिला.

अशा  प्रकारे न्या. स्वामीनाथन यांनी लोकशाहीतही एखाद्या न्यायी राजाच्या थाटात श्रावण  याच्या मृत्यूनंतर अवघ्या २६ दिवसांत त्याच्या वडिलांना आपल्या परीने न्याय दिला. या न्यायावर व तो देण्याच्या पद्धतीवरही काही लोक नाके मुरडतील. पण असलेले अधिकार वापरण्याची माणुसकी व कणव त्यांनी दाखविली यातच त्यांचे खरे मोठेपण आहे.

अजित गोगटे

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER