न्यायाधीशांना लैंगिक संवेदनशीलतेचे धडे देऊन मर्यादा ठरविणे गरजेचे

‘राखी’ जामिनावर अ‍ॅटर्नी जनरलचे प्रतिपादन

KK Venugopal iyer & SC

नवी दिल्ली :- महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर करताना कोणत्या अटी घालाव्यात व कोणत्या घालू नयेत याच्या मर्यादा ठरविण्यासोबतच न्यायाधीशांना लैंगिक संवेदनशीलतेचे धडे देणेही गरजेचे आहे, असे प्रतिपादन अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ (K. K. Venugopal) यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात केले. एका महिलेवर तिच्या घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या उज्जैन येथील आरोपीस मध्यंतरी जामीन मंजूर करताना मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने त्या आरोपीने राखीपौर्णिमेच्या दिवशी फिर्यादी महिलेच्या घरी जाऊन बहीण म्हणून तिच्याकडून राखी बांधून घेण्याची अट घातली होती.

अशी अट घालणे म्हणजे त्या महिलेस सोसाव्या लागलेल्या शारीरिक व मानसिक क्लेषांची थट्टा करणे आहे, असा आक्षेप घेत ही अट रद्द करण्यासाठी नऊ महिला वकिलांनी याचिका केली आहे. गेल्या तारखेला न्या. अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने याविषयी मत जाणून घेण्यासाठी अ‍ॅटर्नी जनरलना नोटीस काढली होती.त्यानुसार अ‍ॅटर्नी जनरल वेणुगोपाळ आले व त्यांनी आपले म्हणणे थोडक्यात मांडले. तसेच एका ९५ वर्षांच्या निवृत्त हाययकोर्ट न्यायायाधीशाने व एका ८४ वर्षांच्या ज्येष्ठ वकिलानेही या सुनावणीस सहभागी होण्यासाठी अर्ज करून खंडपीठाने काही तरी नक्की मर्यादा ठरवून द्याव्या, अशी  विनंती केली. न्यायामूर्तींनी सर्व पक्षकारांना असे सांगितले की, अशा बाबतीत कोणते व कशा प्रकारचे आदेश दिले जाऊ शकतात यावर एक लेखी टिपण सादर करण्यास सांगून सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली.

या निमित्ताने न्यायाधीशांना लैंगिक संवेदनशीलतेचे धडे देण्याची संधी आहे व तसे ते दिले जावेत, असे सांगून वेणुगोपाळ म्हणाले की, उच्च न्यायालयाचा प्रस्तुतचा आदेश हा निव्वळ ‘फिल्मी ड्रामा’ आहे. न्यायाधीश महाशय भावनेच्या भरात भलतेच वाहवत गेल्याचे प्रथमदर्शनी तरी वाटते. त्यामुळे जामिनासाठीअटी घालताना कोणत्या मर्यादा पाळाव्यात याच्या मर्यादा ठरवून देण्यासोबतच  सेवेत असलेल्या न्यायाधीशांना न्यायिक प्रशिक्षण अकादमींमध्ये आणून त्यांच्यात लैंगिक संवेदनशीलता बाणविण्याचीही गरज आहे.

ही बातमी पण वाचा : सरन्यायाधीशांच्या नियुक्तीचा विषय ऐरणीवर

अजित गोगटे 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER