जयंती झाली, साधी राहणी कधी जमणार…

Shailendra Paranjapeकरोना संसर्गाच्या काळात महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांची जयंती विविध उपक्रमातून साजरी करण्यात आली. आपल्याकडे जयंती साजरी केली जाते आणि पुण्यतिथी पाळली जाते. दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमांचं स्वरूप भिन्न असलं तरी उद्देश एकच असतो तो म्हणजे अशा थोरामोठ्यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेणं आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवणं.

अनेक शाळांमधून संस्थांमधून गांधीजयंती आणि शास्त्रीजयंतीचे कार्यक्रम करण्यात आले. करोनामुळे (Corona) बहुतांश कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने झाले. मुख्यमंत्र्यांपासून ते महापौर, गावचे सरपंच हे सारे जयंती कार्यक्रम करतात. पण हे जयंती-पुण्यतिथीचे कार्यक्रम म्हणजे रिच्युअल किंवा औचारिकता झालीय का, याचा विचार आता करायची वेळ आलीय.

महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा आणि मानवतेच्या मूल्यांसाठी आयुष्य वेचले. शेतामधे कष्ट करून साऱ्या जगाचं पोट भरणाऱ्या शेतकऱ्याला जय जवान जय किसान हा नारा देऊन लाल बहादूर शास्त्रीजींनी राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांचं महत्त्व अधोरेखित केलं. वैयक्तिक जीवनात साधेपणा हा दोघाही महापुरुषांचा सामायिक गुण.

आपल्यापैकी अनेकांना ही गोष्ट माहीत नसेल की मागच्या पिढीतील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक मनोज कुमार उर्फ भारतकुमार यांना लालबहादूर शास्त्री यांनी शेतकऱ्यांचं महत्त्व अधोरेखित करणारा चित्रपट बनवा, अशी विनंती केली होती. त्यानंतर मनोजकुमार यांनी उपकार या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यांनीच तो लिहिला होता. उपकार गाजला त्यातले मेरे देशकी धरती सोना उगले उगले हीरे मोती…हे तर आजही हिट गाणं आहे. अनेक स्वातंत्र्यदिन प्रजासत्ताकदिन याच गाण्याच्या रेकॉर्डने चौकाचौकात साजरे झालेत.

महात्मा गांधी यांनी देशाच्या सीमा ओलांडून जगाला अहिंसेचा मंत्र दिला, असहकाराचं सविनय कायदेभंगाचं नवं अस्त्रं दिलं. मूठभर मीठ उचलून आमच्या समुद्राच्या मिठावर आमचा हक्क आहे, हे गांधीजींनी ब्रिटिशांना ठणकावून सांगितलं. गांधीजींनी स्वच्छतेचं महत्त्व ओळखलं होतं आणि त्यामुळे ते राहतील तो परिसर स्वच्छ असायचा.

स्वातंत्र्योत्तर काळात विशेषतः गेल्या पंचवीस वर्षात संगणकानं क्रांती केलीय पण माणसंही संगणकाच्याच झिरो वन झिरो वन या बायनरी, डिजिटल पद्धतीनं म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही, असं मागू लागलीत. तुम्ही या मताचे नसाल तर त्याच्या विरुद्ध मताचेच असणार, असं गृहीत धरलं जाऊ लागलंय.

गांधीजी आणि शास्त्री या दोघांची जयंती साजरी करताना आपण वैयक्तिक जीवनात साधेपणानं राहतो का, हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारायला हवा. अपरिग्रह हा गांधीजींनी अंगीकारलेला महावीरांचा विचार. कपाटात पन्नास शर्ट कुर्ते साड्या पंजाबी ड्रेस हे सारं जमवून त्याचा हव्यास आपण बाळगतोय का…हा विचार गांधीजयंतीदिनी नको का करायला….

शेतकरी आणि शेतीचे प्रश्न केवळ आणि केवळ मतांच्या राजकारणाच्या चष्म्यातून बघायचे की शेतकरी कायमचा सुखी होईल, हे बघायचे… नव्या शेतकरी कायद्यांवरून पुरेसे राजकारण सुरू आहेच पण शास्त्रीजींची जयंती साजरी करताना किमान येत्या दशकात तरी शेतकरी आत्महत्त्या आपण शून्यावर आणू शकलो, तर ती शास्त्रीजींना आजरांजली ठरेल.

शेतकरी स्वाभिमानीच आहे पण त्याच्या नावावर विविध सवलती मागून किंवा त्याचा माल महाग विकून श्रीमंत होणारे मध्यस्थ दलाल, बँन्का आणि त्याला नाडणारे खासगी सावकार, हे सारं बंद व्हायला हवं. शेतकरी अर्थव्यवस्थेत किती हिस्सा उचलतो यापेक्षा तो नीट राहिला तर आपण सारे किमान उपाशी झोपणार नाही, हे लक्षात घ्यायला हवं. किडलेलं धान्य वेगळं काढलं जातं तसं शेतीक्षेत्रातून सारे गैरव्यवहार, भ्रष्टाचार दूर झाले तर शेतकरी आणि देशही सुखी होईल.

गांधीजी आणि शास्त्रीजी यांची जयंती केवळ त्यांच्या प्रतिमेला हार घालून करण्यापेक्षा वैयक्तिक जीवनात त्यांच्या साध्या राहणीची पद्धत जरी अनुसरली तरी ती त्यांना आदरांजलीच ठरेल. साधी राहणी जमली की विचारसरणीवर परिणाम होईलच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER