असा राहिला भारतीय बुद्धिबळ संघाचा सुवर्णपदकाचा प्रवास

Chess Olympiad

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये (Chess Olympiad) भारताने (India) मिळवलेले सुवर्णपदक (Gold medal) हे फार मोठे यश मानले जात आहे; कारण ही स्पर्धा म्हणजे बुद्धिबळाची जवळपास विश्वचषक स्पर्धाच मानली जाते. ज्याप्रमाणे टेनिसमध्ये डेव्हिस कप, बुद्धिबळात सुदिरामन कप त्याचप्रमाणे बुद्धिबळात ऑलिम्पियाड ही सांघिक स्पर्धा असते आणि ती दर दोन वर्षांनी आहे. आतापर्यंत आपली या स्पर्धेत कामगिरी फारशी चांगली नव्हती. २०१४ मधील कांस्यपदक ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती; मात्र यंदा पहिल्यांदाच ऑनलाईन खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत आपण पहिल्यांदाच अंतिम फेरीत खेळलो आणि योगायोगाने आपल्याला संयुक्त विजेत्याचाही मान मिळाला.

निश्चितपणे बुद्धिबळात भारताची ताकद वाढल्याचे यातून दिसून आले आहे; पण अजूनही रशिया, अमेरिका व चीनच्या तुलनेत आपल्याला बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. ही सांघिक स्पर्धा असल्याने जरी नॉर्वेकडे मॕग्नस कार्लसनसारखा विश्वविजेता असला तरी ते या स्पर्धेवर आपली फारशी छाप पाडू शकलेले नाहीत. त्यामुळे आघाडीच्या बुद्धिबळपटूंचेही ऑलिम्पियाडपेक्षा इतर वैयक्तिक स्पर्धांना अधिक प्राधान्य असते. माजी विश्वविजेते विश्वनाथन आनंद हे यंदा या स्पर्धेत खेळले; मात्र यापूर्वी त्यांनी ऑलिम्पियाडपेक्षा विश्व अजिंक्यपद स्पर्धेलाच प्राधान्य दिलेले आहे. १६३ संघांच्या सहभागासह ऑलिम्पियाड ही जगातील सर्वांत मोठी बुद्धिबळ स्पर्धा असते. अमेरिका व रशियाच्या शीतयुद्धादरम्यान ऑलिम्पियाडकडे लोकांचे सर्वाधिक लक्ष राहायचे. सोव्हिएत रशियाने सर्वाधिक १८ वेळा ऑलिम्पियाड जिंकले आहे आणि विघटनानंतरही रशियाने आणखी सहा वेळा सुवर्णपदक जिंकले आहे. रशियाच्या वर्चस्वाला सोव्हिएत संघातील त्यांचीच भावंडे अर्मेनिया व युक्रेन हे आव्हान देऊ लागले आहेत.

ऑलिम्पियाडमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धक असतात म्हणून रॕपीड पद्धतीने यातील डाव खेळले जातात. ऑनलाईन पद्धतीने खेळताना यात १५ मिनिटांचे डाव होतात. त्यात प्रत्येक चालीला पाच सेकंदांचा वाढीव वेळ असतो. पारंपरिक पटावरच्या डावांना २५ मिनिटे आणि १० सेकंद अशा या वेळा असतात. संघात १२ खेळाडू असतात. त्यापैकी निम्मे खेळाडू महिला व निम्मे ज्युनिअर गटाचे असायला हवेत. यंदापर्यंत चार सर्वोत्तम खेळाडू व एक राखीव खेळाडू असायचा; पण आता खेळात विविधता आणण्यासाठी ‘फिडे’ने हा बदल केला आहे.

मात्र त्याच्याने अमेरिका व इराणसारख्या संघांची अडचण झाली आहे; कारण त्यांच्याकडे त्या प्रमाणात तसे खेळाडू नाहीत. दुसरे असे की, यामुळे ऑलिम्पियाडची स्पर्धात्मकता कमी झाल्याचे काहींचे मत आहे. मात्र ज्युनिअर खेळाडूंच्या सहभागाने भारताचा फायदाच झाला आहे. विशेषतः चीनविरुद्ध भारताला ज्युनिअर खेळाडूंनीच विजय मिळवून दिला होता. आर. प्रज्ञानंद व दिव्या देशमुख हे विजयाचे शिल्पकार ठरले होते. या स्पर्धेनिमित्ताने विश्वनाथन आनंद, कोनेरु हम्पी, विदित गुजराथी, हरिका द्रोणावल्ली अशा सिनिअर खेळाडूंसोबत प्रज्ञानंद, निहाल सरीन, दिव्या देशमुख अशा ज्युनिअर खेळाडूंना खेळायला मिळाले. त्यामुळे आता हे यश नव्या खेळाडूंना प्रेरणा देण्याचे काम करेल. या स्पर्धेसाठी भारताला २४१९ रेटिंगसह सातवे मानांकन देण्यात आले होते.

यासह भारताला ‘अ’ गटात स्थान मिळाले होते. या गटात चीन, जॉर्जिया, जर्मनी, इंडोनेशिया, इराण, मंगोलिया, व्हिएतनाम, उझबेकिस्तान व झिम्बाब्वे हेसुद्धा होते. यात चीन, जॉर्जिया व जर्मनी हे बलाढ्य प्रतिस्पर्धी होते. उपांत्यपूर्व लढत अर्मेनियाने त्यांचे अपील फेटाळले गेल्यावर सोडून दिली तर उपांत्य फेरीत टाय ब्रेकरमध्ये कोनेरु हम्पीने पोलंडचे आव्हान संपवले. ऑनलाईन ऑलिम्पियाडच्या प्रत्येक लढतीत सहा सदस्य खेळले. त्यात किमान दोन महिला खेळाडू असणे आवश्यक होते. आणि दोन खेळाडू (एक पुरुष व एक महिला) २० वर्षांपेक्षा कमी असायला हवे होते.

प्रत्येक गटातून पहिले तीन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार होते आणि भारतीय संघ ‘अ’ गटातून १७ गुणांसह सर्वप्रथम बाद फेरीसाठी पात्र ठरला होता. सुवर्णपदक विजेता भारतीय संघ असा-विदित गुजराथी (कर्णधार), विश्वनाथन आनंद, कोनेरु हम्पी, हरिका द्रोणावल्ली. राखीव- पी. हरिकृष्ण, अराविंद चिदंबरम, भक्ती कुलकर्णी, आर. वैशाली. ज्युनिअर गट- निहाल सरीन, आर. प्रज्ञानंद, दिव्या देशमुख व वांतिका अग्रवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER